शैलाकाकू व मंदा वहिनी भिकाऱ्याला जेवण द्यायला निघाल्या. रात्रीचे आठ वाजले होते. रस्ता ओलांडताच समोर भिकारी बसलेलाच होता. दोघींनी आणलेले जेवण त्या भिकाऱ्याच्या पुढ्यात ठेवले. त्याला बोललेले काही समजत नव्हते. त्यावरून तो मुका किंवा बहिरा असण्याची शंका वाटत होती. जेवण देऊन दोघी मागे वळणार एवढ्यात राजे वाहिनी समोर आल्या. म्हणून शैलाकाकू व मंदावहिनी तिथेच उभ्या राहिल्या.
” काय म्हणता शैलाकाकू—-? बऱ्याच दिवसांनी दिसली तुमची जोडी—-” राजे वाहिनी हसत हसत म्हणाल्या.
” नाही हो—आम्ही तर हा भिकारी आल्यापासून रोज येतो या भिकाऱ्याला जेवण द्यायला—” शैलाकाकू म्हणाल्या.
” बरं आहे या भिकाऱ्याचे—मी रोज बघते या भिकाऱ्याला—कधी इकडे तर कधी आमच्या इथे तर कधी चहाच्या टपरीवर बसलेला असतो. काय करणार बिचारा—-? लोकं रोज त्याला हाकलवून लावतात. सकाळचं जेवणाचे पाकीट एक पोलीस आणून देतो. काय करणार—? लोकडाऊन उठवला असलातरी सर्व हॉटेल्स , दुकाने बंद आहेत न—उपासमार होते बिचाऱ्याची —-” राजे वाहिनी म्हणाल्या.
” काय हो तुमच्याकडे जी मुलगी काम करत होती ती आता सुद्धा येते कां—-? तुमचं बरं आहे चोवीस तास तुमच्या मदतीला आहे कोणी—नाहीतर या करोनामुळे आम्हालाच सर्व घरातले काम करावे लागते—-” शैलाकाकू म्हणाल्या.
” परंतु आता ती सुद्धा सोडून गावी जाणार आहे असे म्हणत होती. दुसरी कोणी चोवीस तास राहील अशी कोणी विश्वासू मुलगी तुमच्या नजरेत आहे कां—-? ” राजे वाहिनी म्हणाल्या.
” एक आहे—-तिला मी विचारून बघते—-” मंदावाहिनी म्हणाल्या.
” चला लवकर जायला हवे. घरात एकटीच कामवाली आहे. बाहेरून दाराला कडी लावून आले आहे. म्हटलं जरा पाय मोकळे करून यावे—-” राजे वाहिनी गळ्यावरचा घाम रुमालाने पुसत पुसत म्हणाल्या. तेवढ्यात मंदा वहिनींचे लक्ष राजे वहिनींच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे व हातातील बांगड्याकडे गेले.
” नवीन मंगळसूत्र केले वाटते—-” मंगळसूत्राला हात लावत मंदावाहिनी म्हणाल्या.
” हे नवीन नाही हो—-गणपती होते म्हणून चांगले मंगळसूत्र व बांगड्या घातल्या होत्या. आता उद्या काढून ठेवीन. घरात मी छोटंसं हलकं मंगळसूत्र घालते. हे भारी वजनदार मला रोजच्याला झेपत नाही. तसेच हल्ली आपल्या इथे चोऱ्या सुद्धा फार व्हायला लागल्या आहेत. त्या आपल्या गुलमोहर मधल्या सावंत काकूंच्या घरी चोरी झाली नं—-मुलाचं लग्न ठरलं होतं म्हणून घरात सोन-नाणं, बरीच मोठ्ठी कॅश होती. सगळं चोराने भूल घालून लंपास केलं. या गोष्टीला पंधरा दिवस झाले तरी चोर सापडत नाही—-” राजे वाहिनी म्हणाल्या.
” काय हो या चोरांना मागमूस तरी कसा लागतो—-” शैलाकाकू म्हणाल्या
” ओळखीमधलाच चोर असणार हो—-त्याने सर्व माहिती काढली असणार कि या घरात लग्न कार्य आहे म्हणजे इथे जबरदस्त मालपाणी मिळण्यासारखा आहे—-” राजे वाहिनी म्हणाल्या.
” चला आता, नाहीतर गप्पा मारता मारता इथेच सकाळ व्हायची. या भिकाऱ्याचे जेवण सुद्धा झाले तरी आपण इथेच आहोत. शैलावहिनी म्हणाल्या. ” माझं मात्र कामवालीचे काम आठवणीने करा—-” राजे वाहिनी म्हणाल्या.
“तुमचा रूम नं. मला लक्षात नाही हो—-” मंदावाहिनी म्हणाल्या.
” आम्रपाली २०४, लक्षात राहील नं—-?” राजे वाहिनी हसत हसत म्हणाल्या आणि घाई घाईने निघून गेल्या.
रोजच्या नियमानुसार विशू भाऊ व गोविंद भाऊ सकाळचे प्रभात फेरीला निघाले. वॉचमन गेटवर उभाच होता.
” गुड मॉर्निंग—-” वॉचमन म्हणाला.
” गुड मॉर्निंग—-” विशू भाऊ व गोविंद भाऊ एकाच सूरात म्हणाले आणि हसत हसत वोचमनच्या पाठीवर थाप मारली.
” काय मग आठ दिवसात चोरीची काही बातमी दिली नाही. चोर चोरी करून थकला कि चोर पसार झाला—-? ” विशू भाऊ म्हणाले.
” चला आम्ही जरा प्रभात फेरी मारून येतो—-आपल्या राम भवन ची नीट काळजी घे—-” गोविंद भाऊ म्हणाले.
दोन तासाने प्रभात फेरी करून दोघेही घरी परतले. गोविंद भाऊ घरात पाय ठेवताच मंदावाहिनी म्हणाल्या ” अहो ऐकलंत कां—-? बाहेरून आलात म्हणजे समजलेच असेल—-”
“अग , आम्हाला येताना वोचमन भेटला नाही. नाहीतर काहीतरी न्यूज ऐकायला मिळते—-” गोविंद भाऊ चप्पल काढतंच म्हणाले.
” सुनीलचा फोन आला होता. त्यांच्या घरी म्हणे चोरी झाली. राजे वहिनींचे दागिने व रोख कॅश चोरीला गेली. आठ दिवसापूर्वीच मी त्यांच्या गळ्यात नवीन मंगळसूत्र व बांगड्या बघितल्या होत्या आणि आज ऐकते कि चोरी झाली म्हणून—-”
“ तुम्हा बायकांना सोनं म्हणजे त्यापाठी वेड्या होऊन जातात आणि आपल्या सोन्याच प्रदर्शन करता—-गोविंद भाऊ म्हणाले.
” अहो पण या चोऱ्या एकाच पद्धतीने झाल्या आहेत. गुंगी देऊन दिवसा ढवळ्या चोरी केली जाते. अविनाशकडे सुद्धा तशीच चोरी झाली. कधी बीएमसी कडून ऑक्सिजन टेस्टिंगसाठी आलो आहोत तर कधी स्प्रे करायला आलो आहोत असे म्हणून चोर घरात घुसतात आणि चोरी करतात. घरात राहूनही आता जीवाला धोका निर्माण झाला आहे.—-”
दहा पंधरा दिवस झाले तरी चोर सापडला नव्हता. परंतु अचानक कुठे चोरी झाल्याचे कानावर आले नव्हते. त्यामुळे सर्व निवांत झाले होते. सकाळची वेळ होती. शैलाकाकू व मंदावहिनी त्या भिकाऱ्याला कपडे द्यायला निघाल्या होत्या. तेवढ्यात एक पोलीस जेवणाचे पार्सल घेऊन तिथे आला आणि भिकाऱ्याला पार्सल देत म्हणाला ” या करोना काळात तुम्ही बाहेर का पडता—-? घरात राहा सुरक्षित राहा. आम्ही आहोत नं या भिकाऱ्यांची काळजी घ्यायला—-”
” तुमचंही बरोबर आहे म्हणा—-आमच्या सारख्या वयस्करांनी बाहेर पडायला नको. परंतु काय करणार—-आमचा गॅस नोंदवून पंधरा दिवस झाले तरी गॅस आला नाही. म्हटलं कुठे गॅसवाला दिसतो कां बघावं—-आणि त्याचबरोबर हे कपडे या भिकाऱ्याला द्यायला आलो.बिचारा फटाके कपडे घालतो. याला कोणी नाही कां—-? याची बायका-मुले आहेत कि नाही—-? शैला काकू पोलिसांशी बोलत गॅसवाल्यासाठी इकडे तिकडे नजर टाकत होत्या.
” अहो, याची बायको होती. ती याची सेवा करत होती. परंतु ती सुद्धा करोनाची लागण होऊन मरून गेली. म्हणूनच हा असा गुमसुम असतो. कोणाशी काही बोलत नाही. माझ्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी मी त्याला मदत करतो—-” पोलीस म्हणाला.
” तुम्ही चांगले आहात म्हणून त्याची काळजी तरी घेता नाहीतर अशा भिकाऱ्यांना कोण विचारतो—-? ” असे म्हणून शैला काकू व मंदावाहिनी आपल्या सोसायटीकडे वळल्या.
” काय काकू या उन्हाचं कुठे फिरता—-? ” वोचमन म्हणाला.
” इथेच गेलो होतो, गॅसवाल्याला बघायला—-हल्ली गॅस सुद्धा वेळेवर येत नाही. शैला काकू म्हणाल्या.
” तुम्ही वर जा—-मी बघतो, दिसला कि पाठवून देतो—-” वोचमन म्हणाला.
दुसऱ्या दिवशी दुपारी सिलेंडर घेऊन एक मुलगा आला. त्याने शैला काकूंचे दार ठोठावले तसे शैला काकूंनी दारातूनच विचारले ” किसका सिलेंडर है—-?
” आपकाही है—-चलो जल्दी करो—-खाना खानेको जाना है—-” सिलेंडरवाला म्हणाला.
” अरे तेरा युनिफॉर्म कहा है—-” शैला काकू म्हणाल्या.
” आपको सिलेंडर चाहिये कि वापस लेके जाऊ—-?” सिलेंडरवला घाई घाईतच बोलत होता.
” अरे बाबा पंधरा दिनसे मैं सिलेंडरकी राहू देख रही हू—-चल अंदर आ और रख दे—-”
” पैसा —-जल्दी करो—-
शैला काकू आत जाऊन कपाट उघडून पैसे काढत होत्या. तेवढ्यात पाठीमागून कोणीतरी नाकावर रुमाल दाबल्यासारखे वाटले. त्यानंतर काय झाले काहीच कळले नाही. शैला काकू शुद्धीवर आल्या तेव्हा बघितले तर त्यांना थोडंसं गरगरल्यासारखे वाटत होते. म्हणून थोड्यावेळ त्या बसूनच राहिल्या. ” मला चक्कर आली होती कां—-अचानक काय झाले काहीच कळत नाही—-” त्यांनी इकडे तिकडे बघितले. विशू भाऊ दुपारी झोपलेले ते हि उठलेले नव्हते.शैला काकूंनी त्यांना आवाज दिला. परंतु विशुभाऊ झोपेतच होते. कसे बसे तोल सावरत शैला काकू उभ्या राहिल्या. त्यांनी कपाटाकडे बघितले तर सर्व कपडे उलथा पालथ केले होते.हे बघून शैला काकूंना संशय आला. तो सिलेंडरवाला कोणी भामटा तर नव्हता—-? जागेवर सिलेंडर नव्हते तर कपाटातले दागिने, घड्याळ, रोख कॅश सर्व काही चोरीला गेले होते.शैला काकूंना एकदम शोक बसला आणि रडत रडतच त्या मंदावहिनींकडे गेल्या.
” अहो काय झालं—-? विशू भाऊ ठीक आहेत नं—-? ” मंदावहिनी घाबरून विचारत होत्या.
” अहो आमच्या घरी चोरी झाली—-? ” शैला काकू रडत रडत सांगत होत्या.
” कशी काय—-? तुम्ही घरातच होत्या नं —? ” मंदा वाहिनी.
” नेहमी सारखीच झाली हो—-गुंगी घातली आणि सर्व कपाट विस्कटून सर्व दागिने, पैसे घेऊन गेला—-विशू भाऊ सुद्धा गुंगीतच झोपलेले आहेत—-”
” ते आता उठले कि पोलीस कम्प्लेंट करा—-वोचमन कुठे आहे—-? सोसायटी मध्ये चोरी होते तरी त्याला माहित पडत नाही म्हणजे काय—-? ” रागारागाने मंदा वाहिनी वोचमनच्या नावाने ओरडत होत्या. तेवढ्यात वोचमन आला.
” काय झालं वाहिनी—-? ”
” अरे दुपारची चोरी झाली तरी तुला माहित नाही—-? तू कुठे होतास—-?
” मी रूमवर जेवायला गेलो होतो—- ” वोचमन म्हणाला.
” तू सिलेंडरवाल्याला पाठवले होते कां—-? काल तू म्हणाला होतास नं कि सिलेंडरवाला दिसला कि पाठवून देतो, म्हणून मला वाटले कि तूच त्याला पाठवले. त्याचा युनिफॉर्म सुद्धा नव्हता तेव्हाच मला संशय आला होता. परंतु पंधरा दिवसांनी सिलेंडर आले या खुशीत माझी बुद्धीच चालली नाही—- ” शैला काकु म्हणाल्या.
थोड्या वेळाने विशू भाऊ सुद्धा उठले. आज आपण दुपारपासून संध्याकाळ पर्यंत झोपून कसे राहिलो—-आज शैलाने सुद्धा उठवले कसे नाही—-? ” या गोष्टीचे विशुभाऊंना नवल वाटले. डोकं सुद्धा जरा भारी भारी वाटत होते. थोडा चहा घेतला कि बरं वाटेल असा विचार करून ते हॉलमध्ये आले तेव्हा घडलेला सारा प्रकार त्यांना शैला काकूंकडून समजला. तेव्हा त्यांनी डोक्याला हात लावला आणि म्हणाले ” अगं, एवढी तू मूर्ख कशी गं—-? त्याचा युनिफॉर्म नाही हे बघून तरी त्याचे आयकार्ड तरी चेक करायचे होते—-नाहीतर मला उठवायचे होते. तुम्हा बायकांच्या या मूर्खपणामुळेच चोरांचे फावले आहे—-” विशू भाऊ रागारागाने बोलत होते.
” अहो, पंधरा दिवसांनी सिलेंडर आल्याच्या खुशीत मी त्याला आत घेतले. म्हणतात नं , विनाश काले विपरीत बुद्धी—-तसेच मला झाले. माझी बुद्धीच चालली नाही—-” शैला काकू रडत रडत बोलत होत्या.
” आता रडून काय उपयोग आहे—-? हल्ली दिवसा- ढवळ्या चोऱ्या होतात हे माहित असूनही हा तू मूर्खपणा केला आहेस—-चल आता , मी पोलीस कम्प्लेंट करून येतो—-” असे म्हणून विशू भाऊ निघून गेले.
थोड्या वेळातच पोलीस येऊन सर्व कायदेशीर पाहणी करून पोलिसांनी विशुभाऊंना विचारले कि तुम्ही चोराला बघितले तर ओळखू शकाल कां—-? ”
” नाही—-” शैला काकू म्हणाल्या.
” कां—-? ” पोलीस.
” कारण म्हणजे एक तर त्याने मास्क म्हणून तोंडाला रुमाल बांधला होता. तसेच त्याच्या डोक्यावर टोपी होती तसेच हातात ग्लोव्हज घातलेले होते. शिवाय हा मुलगा नेहमीचा नव्हता. त्याने युनिफॉर्म घातलेला नव्हता. गळ्यात मात्र आयडी कार्ड घातलेले होते. परंतु पंधरा दिवसांनी सिलेंडर बघून मी खुश झाले होते. त्या खुशीत मला त्याचे आयकार्ड बघायचे लक्षात आले नाही—-शैला काकू भाबडेपणाने बोलत होत्या.
” आम्ही बघितले आहे कि या बायकांच्या भाबडेपणा आणि हलगर्जीपणामुळे या दुपारच्या चोऱ्या होत आहेत—तर -” ” ठीक आहे—-तुमचा आणि कोणावर संशय आहे कां—-? ”
” संशय असा कोणावर सांगता येत नाही. करोना काळ असल्याने कामवाली सुद्धा येत नाही—-शैला काकू म्हणाल्या.
चौकशी करून पोलीस निघून गेले.
शैला काकू आपल्या डोक्याला हात लावून बसल्या होत्या. माझ्याकडून केवढी मोठी चूक झाली. त्या सिलेंडरवाल्याला घरात घेतलेच नसते तर एवढी मोठी चोरी झालीच नसती. दिवसाच्या एवढ्या चोऱ्या होत असताना सुद्धा माझी बुद्धी कशी काय भ्रमिष्ट झाली—-? परंतु हा चोर कोण असणार—-? माझ्या गॅस सिलेंडरची माहिती ज्याला असणार तोच हि चोरी करू शकतो. एक तर तो भिकारी आणि तो पोलीस यांना माहित होते. परंतु तो पोलीस व भिकारी कसे चोरी करू शकतील—-? पोलीस तर जनतेचे सेवक असतात. हा काय प्रकार आहे काही कळत नाही—-शैला काकू मंदा वहिनींना रडत रडत बोलत होत्या.
” शांत व्हा काकू—-” मंदा वाहिनी म्हणाल्या.
” कशी शांत होऊ वाहिनी—-या चोऱ्या सुद्धा नं आपल्याच मुर्खपणामुळे होत असतात—-”
चोरी होऊन चार दिवस होऊन गेले. शैला काकूंच्या लक्षात आले कि इथे रोज बसणारा भिकारी दिसत नाही. तो पोलिसही दिसत नाही. म्हणजे काहीतरी गडबड आहे. हि गोष्ट शैलकाकूंनी विशू भाऊंना सांगितली.
” म्हणजे चोर हा आपल्याच आसपास आहे आणि पोलीस चोराला शोधण्यात असमर्थ होतात. मी आत्ताच पोलीस स्टेशनला जाऊन सांगून येतो—-” असे म्हणून विशू भाऊ पोलीस स्टेशनला निघून गेले. पोलीस स्टेशनला पाय ठेवताच विशू भाऊंनी आवाज चढवला—
” काय तुमचं काय चाललंय—-? एवढ्या दिवसा-ढवळ्या चोऱ्या होतात तरी तुम्हाला त्याचा पत्ता सुद्धा लागत नाही म्हणजे काय—-? तुमच्या भरवशावर आम्ही लोकं श्वास घेत असतो आणि तुम्ही हातावर हात ठेऊन बसले आहात .तुम्हाला त्याचे काय—-? जातं ते आमचं जातं नं—-” विशू भाऊ रागारागाने ओरडून ओरडून बोलत होते.
” शांत व्हा सर, आमचं काम चालू आहे—-” इन्स्पेक्टर म्हणाले.
” दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या घरी चोरी झाल्यापासून मी बघतो तर तो भिकारी व तो पोलिसही दिसत नाही—-आमचा संशय त्या भिकार्यावर आहे—-विशू भाऊ म्हणाले.
दुसऱ्या दिवशी तो भिकारी चहाच्या टपरीवर बसला होता. रोजच्या प्रमाणे ते तिघेजण हसत हसत चहा प्यायला टपरीवर आले. एकदम खुश दिसत होते. एकमेकाला टाळी देत गमतीने त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. भिकारी चहा पीत पीत त्यांच्याकडे एकटक बघत होता. त्यांच्या रोजच्या गप्पांवरुन त्याला त्यांचा संशय येत होता. म्हणून त्या भिकाऱ्याने पिशवीतून मोबाईल काढून गपचूप पणे फोन लावला. पाच मिनिटातच पोलिसांनी धाड घालून त्यांना ताब्यात घेतले व त्यांची तपासणी केली. त्यात त्यांना सोनं व कॅश सापडली. त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यावर पोलिसांनी विशू भाऊंना फोन करून बोलावून घेतले व मिळालेले दागिने दाखवले. विशू भाऊ हे बघून चिकीतच झाले. कारण ते दागिने शैला काकुंचेच होते. परंतु आपला वोचमन चोरी करेल असे स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. दुसरा चोर हा आम्रपाली सोसाटीचा वोचमन होता आणि तिसरा चोर म्हणजे एसी रिपेरिंगवल्याचा हेल्पर होता. एक महिन्यापूर्वीच विशू भाऊंनी एसी रिपेर करून घेतला होता. त्यानेच सिलेंडरवाला बनून शैलाकाकूंना चकमा देऊन घरात शिरून चोरी केली होती आणि त्याला वोचमनने साथ दिली होती.विशू भाऊंना हे सारे बघून आश्चर्यच वाटत होते. आजकाल कोणावर विश्वास ठेवायचा असा त्यांना संभ्रम पडला होता. त्या तीन चोरांबरोबर त्या भिकाऱ्याला बघून विशू भाऊ म्हणाले कि ” इन्स्पेक्टर , मी म्हणालो होतो नं कि आमचा या भिकार्यावर संशय आहे म्हणून—-”
” नाही सर , हा कोणी चोर नाही तर यांच्यामुळेच हे चोर सापडले. हे आमचे जुने अनुभवी खबरी पोलीस आहेत. चोऱ्या वाढत होत्या म्हणून ते वेषांतर करून चोराचा शोध घेत होते—–”
” सॉरी हं—-मी तुम्हाला नको ते बोललो—-”
” असू देत, त्यात काय—? वेशांतर करून चोराला पकडणे हे आमचं कामच आहे. फक्त तुम्ही वाजवी पेक्षा कोणावरही विश्वास ठेऊ नका-सतर्क रहा–सुरक्षित रहा.
- शोभना कारंथ
- ८७६७५२२५९९