रुपेश वाळके दापोरी प्रतिनिधी:
वरुड मोर्शी तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून वरुड मोर्शी तालुक्यामध्ये ४५ हजार हेक्टरवर संत्रा पिकविल्या जातो मात्र यावर्षी संत्रा उत्पादक शेतकरी संत्रा दरातील घसरणीमुळे संत्रा उत्पादक हवालदिल झाले आहेत. सद्या संत्रा विक्री पद्धत शेतकऱ्यांच्या व ग्राहकांच्या हिताची नसून त्यामधून व्यापाऱ्यांचाच मोठ्या प्रमाणात फायदा होतांना दिसत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या संत्रा मालाला 8 ते 12 रुपये किलो भाव मिळत आहे त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. अशातच प्रगतीशील संत्रा उत्पादक शेतकारी चिन्मय फुटाणे यांनी ग्राहकांना चविष्ट आणि उत्तम दर्जाचा माल मिळाला पाहिजे या दृष्टीने संत्र्याचे थेट मार्केटिंग करून संपूर्ण खर्च काढून सरासरी ४० रुपये किलोचा दर मिळविला आहे. या वर्षी त्यांच्या संत्राला चांगला दर आणि ग्राहकांचा प्रतिसाद मिळाल्याने पुढील वर्षी जास्तीत जास्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा संत्रा ग्राहकांना थेट विक्री करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्रा उत्पादकांवर या वर्षी दराअभावी उत्पादन खर्चाची भरपाई निघणे कठीण झाले आहे. देशाच्या इतर राज्यांतून मागणी नसणे, प्रक्रिया उद्योगाचा अभाव अशी कारणे त्यामागे दिली जात आहेत. त्यामुळेच ३५ ते ४० रुपये किलो असलेल्या संत्र्याची विक्री या वर्षी अवघ्या सात ते आठ रुपये किलो दराने करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. हा संत्रा तोडणीस देखील महाग असल्याने अनेक शेतकऱ्यांनी बागेतील फळे तशीच ठेवली आहेत. परंतु पुढील वर्षी आंबिया बहर घ्यायचा असल्यास या फळांची तोडणी गरजेची ठरते. फळांची तोड करून डिसेंबर महिन्यात बाग ताणावर सोडली जाते. त्यानंतर दहा जानेवारीच्या पुढे बागेचे पाणी व्यवस्थापन केले जाते. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेता व्यापाऱ्यांकडून मनमानी दरात बागेतील फळांची मागणी केली जात आहे.
या सर्व संकटांवर मत करून रवाळा येथील प्रगतिशील संत्रा उत्पादक शेतकरी चिन्मय फुटाणे यांनी थेट सातारा,अंबाजोगाई, पुणे, नाशिक, गोंदिया, वर्धा, अमरावती, अकोला, मुंबई या शहरांमध्ये संत्रा पाठवून मार्केटिंगच्या माध्यमातून खर्च वजा जाता चाळीस रुपये किलोचा दर मिळविला आहे. संत्रा उत्पादक शेतकरी चिन्मय फुटाणे यांची पाच एकर संत्रा लागवड केली आहे. त्यातील अडीच एकर हलकी, तर अडीच एकर भारी जमीन. या वर्षी पावसाची संततधार सुरू असल्याने हलक्या जमिनीवरील बागेत आंबिया बहराची फळधारणा झाली. साडेसहा टन फळांची उत्पादकता अडीच एकरांतून झाली. चिन्मय फुटाणे हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यासोबतच त्यांचे वडील वसंतराव फुटाणे हे गेल्या ३८ वर्षांपासून सेंद्रिय शेतीमाल उत्पादन करतात. संत्रा बागेचे व्यवस्थापनदेखील गेल्या ३८ वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने होत आहे. त्यामुळे त्यांची सर्वदूर सेंद्रिय शेतीमाल उत्पादक अशी ओळख आहे.
सोशल मीडियावर देखील फुटाणे कुटुंबीय सक्रिय असून आपल्या बागेतील सेंद्रिय संत्रा उत्पादनाची माहिती त्यांनी सोशल मीडियावर पसरविली. त्या माध्यमातून ईतर शेतकऱ्यांना सुद्धा योग्य मार्गदर्शन मिळाले असून त्यांना सेंद्रिय शेतीबद्दल माहिती प्राप्त झाली, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना सहज ग्राहक प्राप्त झाले. चिन्मय फुटाणे यांच्या शेतातील उत्कृष्ट संत्रा फळाचा दर्जा पाहून ९० ते ६० रुपये किलो याप्रमाणे संत्रा विक्री करण्यात आली. खर्च वजा जाता त्यांना ४५ ते ५० रुपये सरासरी मिळाले. एसटी पार्सल, रेल्वे तसेच खासगी बस या माध्यमांतून संत्रा वाहतूक करण्यात आली. त्याचा खर्च ग्राहकांकडून घेण्यात आला विशेष म्हणजे ग्राहकांना पारंपारिक पद्धतीने लाकडी बॉक्समधून संत्रा प्याकिंग करून पाठविण्यात आला.
या वर्षी ग्राहकांचा थेट मार्केटिंगला मिळालेला प्रतिसाद पाहता पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात संत्रा देशाच्या विविध भागांत पाठवण्याचा संकल्प प्रगतिशील संत्रा उत्पादक शेतकरी चिन्मय फुटाणे, विनय फुटाणे यांनी व्यक्त केला.
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संत्राला चांगला दर मिळावा ग्राहकांना दर्जेदार संत्रा उपलब्ध व्हावा, यासाठी उत्पादक ते ग्राहक थेट संत्रा विक्री उपक्रम आम्ही राबविला असून
आमच्या संत्रा बागेतून अडीच एकरामधून साडेसहा टन उत्पादन झाले. पाच टन १७० किलो फळांची विक्री थेट केली आहे, त्या माध्यमातून दोन लाख ४० हजार रुपये उत्पन्न झाले. बाजारात दहा रुपये किलोचा दर असताना आम्हाला मात्र थेट मार्केटिंगच्या माध्यमातून खर्च काढून सरासरी ४० रुपये किलोचा दर मिळाला आहे. संत्रा शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर न करता उत्तम दर्जाचा चविष्ट संत्रा ग्राहकांना मिळवून देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. – चिन्मय फुटाने, प्रगतिशील संत्रा उत्पादक शेतकरी,
Contents
hide
Related Stories
December 8, 2024
December 8, 2024