संत्रा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर !
संत्र्याचा भाव १० ते १५ रुपये किलो !
दापोरी :मोर्शी तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून संत्र्याला भाव नसल्याने मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक पुन्हा चिंतेत सापडले आहेत. ५० रुपये किलो असलेल्या संत्र्याचा दर केवळ १० ते १५ रुपये प्रतिकिलोवर आला असून २०० रुपये कॅरेट ने शेतकऱ्यांचा संत्रा विक्री होत आहे .
आधीच या वर्षी संताधार पावसामुळे जुलै-ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यामध्ये संत्रा बागांमधील मोठ्या प्रमाणात फळगळ झाली त्यामध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करून संत्रा उत्पादन घ्यावे लागते मात्र संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ, विविध रोगामुळे संत्रा गळती, यासारख्या विविध संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्या संकटावर मात करून शिल्लक राहिलेल्या संत्रा फळावर लाखो रुपये खर्च करून विविध फवारण्या व उपाय योजना करून फळांची शेतकऱ्यांनी योग्य जपणूक करून त्यांना टिकवून ठेवले. मात्र अचानक आता संत्र्याला भाव मिळत नसल्याने मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत सापडले आहेत. ५० रुपये किलो असलेल्या संत्र्याचा दर केवळ १० ते १५ रुपये प्रतिकिलोवर आला असल्यामुळे मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले .
मोर्शी तालुका सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असून घोडदेव, सलबर्डी, पाळा, दापोरी, हिवरखेड, बेलोना, उमरखेड, भिवकुंडी, मायवाडी, भाईपुर, अंबाडा, सायवाडा, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात संत्री उत्पादित होतात. मात्र, यावर्षीच्या सुरुवातीला लॉकडाऊनमुळे सर्वत्र वाहतूक बंद होती. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात संत्री असूनदेखील संत्राला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. यावर्षी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मृग बहाराचा फुटला नसल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. या वर्षी आंबिया बहराची फूट चांगली झाली होती. मात्र, जुलै ते ऑगस्ट महिन्यात संत्राबागांमध्ये मोठ्या प्रमाणात गळ झाली. ३५ ते ५० टक्के संत्री गळून पडली त्यामध्ये मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झल्यामुळे मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे.
यावर्षी अतिपावसामुळे फळांवर काळे व पिवळे डाग पडून फळे मोठ्या प्रमाणात गळून पडली होती. त्यातून वाचलेल्या संत्र्यालाही भाव नसल्याने संत्रा बागायतदारांची कोंडी झाली आहे. १० हजार ते १५ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याचे मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. परराज्यातील बाजारपेठांमध्ये संत्र्याला उठाव नसल्याचे व्यापारी शेतकऱ्यांना सांगत आहेत. संत्राला भाव मिळत नसल्याने संत्राउत्पादक पुन्हा अडचणीत सापडला आहे.
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर फेरले पाणी !
यंदा आंबिया बहाराचे उत्पादन चांगले होण्याची आशा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होती. संत्रा उत्पादनाला चांगला भाव मिळून पैसा हातात येईल, या आशेवर असलेला शेतकरी भीषण दुष्काळ, टोळधाड, संत्र्याच्या गळतीमुळे, संत्रा झाडाची पानगळ, कोरोना, या सर्व संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाला असून नैसर्गिक संकटांमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले . ऐन संत्रा तोडणीला येताच संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संत्राचे भाव पडल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. संत्राचे भाव कोसळल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या आनंदावर दुःखाचे सावट पसरले आहे. यामुळे मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. एकीकडे विविध संकटे तर दुसरीकडे संत्राला मिळणार अत्यल्प भाव, अतिवृष्टीमुळे झालेले पिकांचे नुकसान, यामुळे बळीराजाच्या हातात आलेला तोंडचा घास हरवल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.