भंडारा : राज्यातील सर्वसामान्य जनता शासकीय रुग्णालयात विश्वासाने येत असून त्यांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही, याची खबरदारी घेतानाच भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेली घटना यापुढे राज्यात कुठेही घडणार नाही तसेच शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे एकाही निष्पाप जीवाचा बळी जाता कामा नये. यासाठी सर्व रुग्णालयाचे फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट सक्तीचे करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी येथे केली.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील आग लागलेल्या शिशू केअर युनिटची पाहणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. या घटनेमधून वाचविण्यात आलेल्या सात बालकांवर सुरू असलेल्या उपचाराची माहिती घेतली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधला. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, परिवहन मंत्री अनिल परब, पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, भंडारा येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून तिच्या कारणांचा शोध घेण्यात येईल. राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट सक्तीचे करण्यात येणार असून यंत्रसामुग्री घेण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्या जाईल. या घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेण्यात येणार आहे. ही घटना कुणाच्या दुर्लक्षामुळे घडली तसेच भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी व्यवस्थेत असलेल्या उणिवा व त्रुटींची सवर्ंकष चौकशी करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. घटनेसंदर्भातील कारणांचा शोध घेतल्यानंतर राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयात आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री डॉ. कदम यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेनंतर वाचलेल्या बालकांवर उपचारासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कुटुंबांना संपूर्ण मदत दिली जात आहे. या घटनेनंतर रुग्णालय बंद राहणार नाही. तसेच ओपीडी नियमित सुरू राहील यादृष्टीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. यासाठी पोलिस दलाची मदत करण्यात येत आहे. उपचारासाठी येणार्या कोणालाही अडवू नका, असे निर्देशही देण्यात आले आहे.
शिशू केअर युनिटला आग लागल्याचे माहिती पडताच फायर एक्स्टींग्विशद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न करणारे सुरक्षा रक्षक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.
Contents
hide
Related Stories
November 4, 2024
November 2, 2024