अमरावती : शासकीय अधिकारी -कर्मचाऱ्यांकरिता असलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोना आजाराचा अंतर्भाव करणारा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे . कोरोना बाबतच्या उपचाराचा वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीत स्पष्टता आणण्यासाठी हा निर्णय २ सप्टेंबर २०२० पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आला असून दिनांक १७-१२-२०२० ला सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत शासन निर्णय जाहीर केला आहे . राज्य शिक्षक संघाच्या मागणीवरून आ. सुलभाताई खोडके यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कडे हा मुद्दा रेटून धरल्याने हा विषय मार्गी लागला असून आकस्मिक आजारामध्ये कोविड -१९ या नवीन आजाराचा समावेश झाल्याने शासकीय कर्मचाऱ्यांसह शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे .
राज्य सरकारने मार्च २००५ मध्ये जाहीर केलेल्या शासन निर्णयात २७ आकस्मिक आणि ५ गंभीर आजार निश्चित केले आहे .ज्यामध्ये शासकीय अधिकारी – कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आकस्मिक तसेच गंभीर आजारावर खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यावर होणाऱ्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती दिली जाते . दरम्यान गेल्या २५ सप्टेंबर २०२० रोजी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री ना. राजेशजी टोपे हे अमरावती जिल्ह्यातील कोरोनाची सद्य:स्थिती व उपाययोजना यासंदर्भातील आढावा बैठकीला आले असता कोरोना संकट पार्श्वभूमीवर आकस्मिक प्रसंगी औषधोपचाराकरिता मान्यता प्राप्त आजारांमध्ये कोरोना (कोविड -१९ ) या आजाराचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप कडू यांनी निवेदनाद्वारे केली होती . दरम्यान आढावा बैठकीत आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी कोविड संदर्भातील विविध उपाययोजनांबाबत आरोग्यमंत्र्याचे लक्ष वेधले होते . अशातच आकस्मिक प्रसंगी खाजगी रुग्णालयात आंतर रुग्ण म्हणून घेतलेल्या औषधोपचाराच्या खर्चाचा प्रतिपूर्तीसाठी मान्यता दिलेल्या आजारांच्या यादीमध्ये कोविड १९ या नवीन आजाराचा समावेश व्हावा व शासकीय अधिकारी – कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा लाभ मिळावा , हा मुद्दा आ. सुलभाताई खोडके यांनी बैठकीत मांडला होता . शासकीय सुविधा असलेल्या रुग्णालयामध्ये जागा उपलब्ध न झाल्यास अशा कर्मचाऱ्यांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात . व अशा खाजगी रुग्णालयातील खर्च कर्मचाऱ्यांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे कोरोना( कोविड -१९ ) या आजाराचा समावेश प्रतिपूर्ती मान्यता दिलेल्या आजारामध्ये करावा . अशी विनंती सुद्धा आ. सुलभाताई खोडके द्वारे बैठकीदरम्यान ना. राजेश टोपे यांना करण्यात आली होती . नामदार राजेश टोपे यांनी सदर बाबीची गंभीरतेने दखल घेऊन या बैठकीला हजर आरोग्य खात्यातील सचिव व उपसचिव यांना नोंद घेऊन कामकाज करण्याची सूचना केली . अशातच आता आकस्मिक आजारांमध्ये कोविड १९ चा समावेश करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला असून याबाबत आता १७ डिसेंबर २०२० रोजी महाराष्ट्र सार्वजानिक आरोग्य विभागाने शासन निर्णय जारी केला आहे . त्यानुसार वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोना आजाराचा समावेश झाल्याने शासकीय अधिकारी – कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी हृदय , फुफ्फुस सारख्या आकस्मिक तसेच गंभीर आजाराबरोबरच कोविड आजाराचा खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यावर होणाऱ्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळणार आहे . कोरोना काळात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा दिलासादायक निर्णय घेतल्या बद्दल आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांचे आ. सौ . सुलभाताई खोडके समवेत राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप कडू , सरचिणीस भोजराज काळे , जिहाध्यक्ष अनिल भारसाकळे , जिल्हा कार्यवाह श्रीकांत लाजूरकर , महानगराध्यक्ष नंदकशोर नवरे ,महानगर कार्यवाह प्रदीप नानोटे , कार्याध्यक्ष अविनाश कडू , कोषाध्यक्ष दादाराव टवलारे , ज्ञानेश्वर टाले ,सौ निशा गोसावी यांनी आभार मानीत अभिनंदन केले आहे .
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024