नागपूर : देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले नागपूर हे देशाचे अभिमान आहे. नागपूर हे राज्याची उपराजधानी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. विदर्भ हा महाराष्ट्राचा एक अविभाज्य घटक असून, तुम्ही विदर्भवासी माझ्या हृदयात आहात. त्यामुळे तुमच्यावर कधीही अन्याय होऊ देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
उपराजधानी नागपुरातील विधानभवन येथे विधिमंडळ सचिवालयाच्या कायमस्वरुपी कक्षाचे सोमवारी लोकार्पण झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री ऑनलाईनच्या माध्यमातून या सोहळय़ात सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हे प्रत्यक्षरित्या उपस्थित होते. तर ऑनलाईनच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे हे सुद्धा व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.
विदर्भातील नागरिक हे नेहमी माझ्या हृदयाजवळ आहेत, त्यामुळे जर त्यांच्यावर कुणी जर अन्याय करत असेल तर आम्ही तुमच्यासाठी ढाल बनून उभे राहू असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राचे हे ६0 वे वर्ष आहे. नागपुरात विधिमंडळाचे कायमस्वरुपी कार्यालय सुरू व्हावे, याकरिता माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी वारंवार प्रयत्न केलेत. आता प्रत्यक्षात हे कार्यालय येथे सुरू झाले आहे. हे कार्यालय वर्षभर सुरू राहणार आहे. अनेक वर्षापासून कार्यालय सुरू करण्याची मागणी होत होती. ती आज पूर्ण झाली याचा मला आनंद आहे, असे सांगतानाच आता खर्या अर्थाने नागपूर आणि मुंबई यांचे नाते अधिक दृढ झाले आहे, यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन येथे घेऊ शकलो नाहीत. ही क्लेषकारक गोष्ट असल्याची खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
Related Stories
October 9, 2024