अमरावती : गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संक्रमणाने सर्व त्रस्त झाले होते. या काळात आम्ही जीव धोक्यात घालून रूग्णांची सेवा केली. कोरोनाची साखळी तुटावी यासाठी अनेक प्रयत्न केले. वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर लस प्राप्त झाली आहे. आता कोरोनाला नक्कीच हरवता येईल असा विश्वास निर्माण झाल्याची भावना जिल्हा रुग्णालयातील बाहयरूग्ण विभागाचे कर्मचारी ओंकार खाडे यांनी व्यक्त केली. आठवड्यातील निश्चित दिवसांना लसीकरण सुरु झाल्यानंतर कोविड लसीकरण करून घेणारे श्री. खाडे हे आजचे पहिले व्यक्ति होते.
कोरोना वॉरिअर्स कडून लस प्राप्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त होत आहे. आज सकाळी 9 वाजल्यापासून परिचारीका प्रशिक्षण महाविद्यालयातील कोविड लसीकरण केंद्रात नोंदणी झालेले व्यक्ति लसीकरणासाठी येत होते. लसीकरण केंद्रातील नोंदणी कक्षातील, निरीक्षण कक्षातील, तांत्रिक कक्षातील कर्तव्यावर असलेले सर्व चोखपणे आपली जवाबदारी पार पाडत होते.
परिचारीका प्रशिक्षण महाविद्यालयाचे फिजिशीयन व लसीकरण केंद्राचे व्यवस्थापक डॉ. सतीश हुमणे यांनी लसीकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, व्यक्ती लसीकरण केंद्रात आल्यावर, त्यांचे तापमान तपासणे, तसेच हात सॅनिटाईज केल्यावर बसण्यासाठी प्रतिक्षालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. आधारकार्ड तपासून ओळख पटविण्याची व्यवस्था, संगणकाच्या मदतीने माहितीची नोंद करणे व तांत्रिक बाबी सांभाळणारे कर्मचारी ही सर्व व्यवस्था चोख करण्यात आली आहे. त्यानंतर व्यक्तीचे लसीकरण करण्यात येते. लसीकरणानंतर निरिक्षण कक्षात त्यांना अर्धा तास विश्रांती देण्यात येते. या दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद विलेकर त्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्या आरोग्याबाबत निरिक्षण नोंदवित आहेत. निरिक्षण कक्षात सर्व सुविधा पुरविण्यात आल्या असून लसीकरणानंतर काही काळ त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात येते. लसीकरणाचे कुठलेही दुष्परिणाम आठळले नसल्याची माहिती डॉ. हुमने त्यांनी दिली. लसीकरणानंतर 7 दिवस स्वनिरीक्षण व घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात येते.
आयुष बाह्य रुग्ण विभागाच्या मालती सरोदे, अमोल भातकुलकर व संदीप भस्मे यांनी लस घेतेवेळी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा व कोरोनापासून बचाव करण्यास ही लस उपयुक्त असून लस घेतल्यावर कुठलाही त्रास जाणवला नसल्याचे त्यांनी सांगितले.
बाह्य रुग्ण विभागाचे कर्मचारी राहुल थोरात यांनी लसीकरणाने आपला आत्मविश्वास नक्कीच वाढला आणि लसीमुळे कोरोना विरोधातील लढाई आपण नक्कीच जिंकू, असे सांगितले.
अमरावती जिल्ह्यात पंजाबराव देशमुख वैद्यकिय महाविद्यालय, परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, अंजनगावबारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय आणि अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात सर्व वयोगटातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. रोज शंभर व्यक्तिंना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. लसीकरणाबाबत संपूर्ण यंत्रणा सज्ज असून लस घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या संपर्कात आरोग्य यंत्रणा राहणार आहे. 28 दिवसानंतर दुसरा डोस देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सतिश हुमणे यांना दिली.या लसीकरण केंद्रातील परिचारीका श्रीमती. केचे, पाथरकर यांनी लस देतांना आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली. संगणकावर नोंदणी करणारे युनूस शाह नोंदणी कक्षात लस घेण्याऱ्याच्या माहितीची चाचपणी करुन लसीकरणात महत्वाची भूमीका पार पाडत आहे.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024
September 5, 2024