बारामती : मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम हा राज्यशासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून पाच वर्षात एक लाख सूक्ष्म व लघुउद्योग प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगतानाच, या योजनेसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात उद्योजक तयार होतील. रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री आणि पुणे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. बारामती विद्या प्रतिष्ठान येथील ग. दि. मा. सभागृहात मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमाअंतर्गत माझा व्यवसाय, माझा हक्क या उपक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून पाच वर्षात एक लाख सुक्ष्म व लघुउद्योग प्रस्थापित करण्याचे राज्य शासनाचे उदिष्ट आहे. हे उदिष्ट प्राप्त केले तर मोठया प्रमाणात युवक, युवतींना रोजगार मिळणार आहे. अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांना योजनेत सवलत देण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय आढावा व समन्वयन समिती स्थापन करण्यात आली असून उत्पादन, सेवा उद्योग, कृषी पूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, ई-वाहतूक व व्यवसाय, फिरते विक्री केंद्र या व्यवसायांमध्ये युवकांना व युवतींना संधी मिळतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील युवक युवतींना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प उभे राहण्यासाठी ही योजना राबविली जात आहे. राज्य शासनाकडून यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुद करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे व्यवसाय सुरु करु इच्छिणा-या युवक – युवतींनी पुढे यावे.
योजनेचे निकष पूर्ण करणा-या गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यातील युवक, युवतींनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन केले.
कोरोना योध्दांचा गौरव करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानवतेच्या रक्षणासाठी कोरोना कालावधीत तुम्ही केलेले काम कायम स्मरणात राहील. राज्यात कोरोनाचे प्रमाण कमी होत आहे, याचे सर्व श्रेय कोरोना योध्दांना जाते.
कोरोना कालावधीत डॉक्टर तसेच वैद्यकीय सेवा देणारे व सर्वच घटकांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे. कोरोनाचे संकट अजुनही टळलेले नाही. त्यामुळे प्रत्येकाने दक्षता नियमांचे पालन करावे असे आवाहनही केले.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024