- *पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांची रक्ततुला
- * कोरोना योद्ध्यांचा हृद्य सन्मान
- * ‘माझी कन्या भाग्यश्री’च्या धनादेशांचे वितरण
तिवसा, : राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आपले वडील लोकनेते, माजी आमदार स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त मुलगा यशवर्धन व मुलगी आकांक्षासमवेत रक्तदान करून तरुणाईला रक्तदानासाठी पुढे येण्याचा संदेश दिला. मंत्री श्रीमती ठाकूर यांची रक्ततुलाही यावेळी करण्यात आली.लोकनेते, माजी आमदार स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त आज तिवसा येथे कृतज्ञता सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी तिवसा शासकीय ग्रामीण रुग्णालयात आपल्या कुटुंबियांसह रक्तदान करून आपल्या वडिलांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पालकमंत्र्यांची रक्ततुलाही करण्यात आली. आमदार बळवंतराव वानखडे,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, तिवसा येथील नगराध्यक्ष वैभव वानखडे, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, किशोर बोरकर, माजी महापौर विलास इंगोले, सुधीर सूर्यवंशी यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- रक्तदान चळवळ वाढवा : पालकमंत्री
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेनेही स्वतः पुढे येऊन रक्तदान चळवळ वाढविण्याचे आवाहन मंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.गेल्या 9 वर्षांपासून माजी आमदार स्व. ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमरावतीच्या तिवसा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते. आज यावेळी दीडशेपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी वडिलांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह त्यांची मुलगी आकांक्षा व मुलगा यशवर्धन यांनीही रक्तदान केले.
- रक्तदानातून बंधुतेचा संदेश
गेल्या अनेक वर्षांपासून वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यांच्यानंतरही ही विधायक परंपरा त्यांच्या जयंतीनिमित्त पाळली जाते. रक्तदान शिबिराला दरवर्षी प्रतिसाद वाढत आहे. मागील वर्षापासून आम्ही कुटुंबासह रक्तदान करतो. रक्ताच्या नात्यातून प्रेमाचे, बंधुतेचे नाते जुळविण्याचा हा प्रयत्न आहे. रक्तदानाला प्राणदानाचे मोल आहे. ते श्रेष्ठ दान मानले जाते. रुग्णालये, दवाखाने, रक्तपेढ्या येथे गरजूंसाठी पुरेसा साठा आवश्यक असतो. साथीच्या काळात तर ही गरज प्रकर्षाने जाणवते. कोरोनाकाळातही ही अडचण जाणवली होती. मात्र, दक्षतापूर्वक शिबिरांचे आयोजन करून रक्ताचा पुरवठा करण्यात आला. नागरिकांनी विशेषतः तरुणांनी नियमित रक्तदान करावे, असे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.लोकनेते स्व. ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराबरोबरच भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीर तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आरोग्य सेविकांचा सन्मान व सत्कार अशा अनेकविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.
- कोरोना योध्दांचा हृद्य सत्कार
आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना काळात अहोरात्र रुग्णसेवा करणाऱ्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका, पोलीस आदी कोरोना लढवय्यांचा सन्मान पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते आज करण्यात आला.जिल्ह्यातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका, पोलीस, वैद्यकीय पथकांनी जिवाची पर्वा न करता अविरत काम केले आहे. जनसेवेलाच प्रथम प्राधान्य देत त्यांनी आपले कर्तव्य चोख बजावले आहे. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी कोरोना महामारीच्या काळात शहरी व ग्रामीण भागात घरोघरी जाऊन कोरोना संक्रमण, बाधित व्यक्ती, आजारांचे लक्षण आदी बाबींचे सर्वेक्षण करुन त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविल्या आहेत. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान होत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
- माझी कन्या भाग्यश्री
माझी कन्या भाग्यश्री या योजनेच्या लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप यावेळी करण्यात आले. मुलींचे शिक्षण, आरोग्य यात सुधारणा करणे, बालिका भ्रूणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजात सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आदींसाठी ही योजना राबवली जाते. प्रशासनाने अधिकाधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.