नगर : संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार येथील तत्कालीन सरपंचाने ग्रामसेवकाला हाताशी धरून आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात दोघांनी मिळून तब्बल १0६ वेळा स्वत:च्याच नावाने धनादेश काढले. त्यातून विविध सरकारी योजनांतील सुमारे २६ लाख रुपयांचा अपहार केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर माजी सरपंच व सध्याचे उपसरपंच प्रशांत गवराम फटांगरे व ग्रामसेवक सुनील शंकर शेळके यांच्याविरोधात घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत:च्या नावाने चेकने पैसे काढून अपहार करण्याचा वेगळाच नमुना या गावात पाहायला मिळाला.
हा प्रकार २0१२ ते २0१३ ते २0१७ ते २0१८ या काळात घडला. याची कुणकुण लागल्याने एका दक्ष ग्रामस्थाने जानेवारी २0२0 मध्ये तक्रार केली. त्यानुसार या प्रकाराची चौकशी सुरू झाली.
गटविकास अधिकार्यांनी चौकशीसाठी नोटीसा पाठविल्या. सरपंचाने नोटीसांकडेही दुर्लक्ष केले. ग्रामसेवकाने मात्र उत्तर दिले. चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात आली. गटविकास अधिकार्यांना चौकशीचा अहवाल सादर करण्यात आला. त्यातून या दोघांनी केलेला अपहार उघड झाला. ग्रामपंचायतीचा निधी खर्च करण्यासाठी पद्धत ठरलेली आहे. त्या सर्वांना फाटा देत या दोघांनी वेळोवळी स्वत:च्या नावाने धनादेश देऊन निधी उचलला असल्याचे आढळून आले.
फटांगरे यांनी तब्बल ८२ वेळा, तर ग्रामसेवक शेळके यांनी २४ वेळा आपल्या नावाने चेकद्वारे ग्रामपंचायतीच्या खात्यातून पैसे काढल्याचे आढळून आले. सरपंच फटांगरे यांनी सुमारे साडेसोळा लाख तर ग्रामसेवक शेळके यांनी सुमारे ९ लाख रुपये अशा पद्धतीने काढल्याचे आढळून आले. या प्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील गुलाबराव माळी यांनी घारगाव पोलिस ठाण्यात सारोळे पठारचे तत्कालीन सरपंच तथा विद्यमान उपसरपंच प्रशांत फटांगरे व ग्रामसेवक सुनील शेळके या दोघांविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी त्या दोघांविरुद्ध फसवणूक व अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. आता शेळके यांच्या पदासंबंधी पंचायत समितीकडून काय कारवाई केली जाते, याकडेही लक्ष लागले आहे.
Related Stories
October 14, 2024