पुणे : हॉटेलमधील महिलांच्या शौचालयामध्ये एक वेटर मोबाईवर चित्रीकरण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मुंबई-बंगळूर महामार्गावरील सुतारवाडी येथील हॉटेल हॅपी द पंजाबमध्ये घडला. याप्रकरणी संबंधित वेटरला चतु:श्रृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
हाफिज अन्सारी (१८, रा. झारखंड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत हिंगणे येथे राहणार्या एका १८ वर्षीय तरुणीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण येथील सुतारवाडी येथे मुंबई-बेंगलोर महामार्गावर हॉटेल हॅपी द पंजाब नावाचे हॉटेल आहे. संशयित आरोपी हा मुळचा झारखंड येथील असून मागील एक वर्षापासून तो पुण्यात राहत आहे.
सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तरूणी ही त्यांच्या कुटुंबियांसमवेत जेवण करण्यासाठी हॉटेल हॅपी द पंजाबमध्ये आली होती. त्यावेळी ती हॉटेलमधील महिलांच्या शौचालयामध्ये गेली असता त्या ठिकाणी वेटर म्हणून काम करणारा हाफिज अन्सारी मोबाईलमध्ये महिलांच्या शौचालयामध्ये चित्रीकरण करत असल्याचे तरूणीला संशय आला. तिने त्याच्याकडे चौकशी केली असता तिला धक्का देऊन हाफिज अन्सारी तेथून पळून गेला.
यानंतर या तरूणीने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हाफिज अन्सारीला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Related Stories
October 9, 2024