मध्ययुगात (बाराव्या शतकात) भारतातील सामाजिक सुधारणा आणि परिवर्तनासाठी लढा देणाऱ्या विविध समाज सुधारकांमध्ये महात्मा बसवेश्वर यांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल.मानवतावादी समाजाची उभारणी आणि समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे. समाजातील अनिष्ट प्रथा,रूढी, परंपरा आणि बुरसटलेल्या विचारांना मूठमाती देण्यासाठी त्यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला होता.प्रस्थापितांच्या विरोधातील हेच बंड तद्दनंतरच्या काळातील समाज सुधारकासाठी प्रेरणास्त्रोत आणि पथदर्शक ठरले आहे.अगदी बालपणापासून सुधारणेचा वसा आणि परिवर्तनाची कास उराशी बाळगणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी या गावी अक्षयतृतीयेच्या दिवशी झाला आहे.मादलांबीका आणि मादीराज हे त्यांचे माता-पिता.वडील मुळातच श्रीमंत अन अग्रहाराचे प्रमुख असल्याने गरिबाचे जिने त्यांच्या वाट्याला फारसे आले नाही.मात्र समाजातील गरिबीने त्यांना कधी स्वस्थ बसू दिले नाही.म्हणूनच त्यांनी समाजातील दारिद्र्य, सामाजिक/आर्थिक विषमतेची उतरंड,स्पृश्य-अस्पृश्य भेदाभेद, स्त्रियावरील कडक आणि तितकेच जाचक बंधने,शोषणाची वाढती प्रवृत्ती,इत्यादीचे विरोधात रणशिंग फुंकले होते.त्यांच्या बंडाचे प्रतिबिंब वयाच्या अवघ्या आठव्या वर्षीच समाजाने अनुभवलेले आहे.अर्थातच स्वकुटुंबापासूनच त्यांनी परिवर्तनाचा लढा आरंभला होता. कारण त्याकाळी स्वतः बसवेश्वरांच्या घरी सुद्धा अंधश्रद्धा व कर्मकांडाला बळ देणारे कार्यक्रम होत असे.त्यांचा दैवापेक्षा कर्मावर अधिक विश्वास होता.स्त्री-पुरुषातील भेदभाव करणारे धार्मिक संस्कार त्यांना अजिबात मान्य नव्हते.
महात्मा बसवेश्वर ब्राह्मण कुटुंबातील आणि लिंग पूजक विरशैव संप्रदायाशी संबंधित होते. त्यामुळे त्यांना धार्मिक व अन्य संस्कार कुटुंबातूनच प्राप्त झाले आहे.परंतु ते ब्राह्मण कुटुंबातील असले तरी कर्मठ नव्हते.महात्मा बसवेश्वर यांचे वडील अग्रहार प्रमुख.अग्रहारातील मुलांना संस्कृतचे धडे अर्थात वेद, पुराण,खंडकाव्य,व्याकरण, तर्कशास्त्र इत्यादीचे धडे दिले जात असे.महात्मा बसवेश्वर सुद्धा त्यास अपवाद नव्हते.ब्राह्मण धर्म परंपरेनुसार असे धडे गिरविण्यासाठी उपनयन व अन्य संस्कार करवून घेणे बंधनकारक असे.परंतु बुद्धीच्या कसोटीवर न उतरणाऱ्या परंपरेला मानणाऱ्या पैकी महात्मा बसेश्वर नक्कीच नव्हते.म्हणूनच वयाच्या अवघ्या आठव्या वर्षीच अशा परंपरेला त्यांनी कडाडून विरोध दर्शवित आपल्या पुढील कार्याचे संकेत दिले.इतकेच नव्हे तर स्वउपनयनापेक्षा त्यांच्या ज्येष्ठ भगिनी नागम्माचा विधी करण्याचा आग्रह करीत घरातूनच महिला सक्षमीकरण व महिला स्वातंत्र्याला बळ देण्याचे कार्य केले.तत्कालीन स्थितीत घट्ट ब्राह्मण परंपरेला विरोध करणे वाटते तितके सोपे नक्कीच नव्हते.पण बसवेश्वरांनी हे आव्हान स्वीकारले आणि लिलया पेलले सुद्धा.तत्कालीन वेळी स्त्री-पुरुष समानतेसाठी त्यांनी जोरकसपणे समर्थन केले.बसवेश्वरांच्या बंडखोर वृत्तीने त्यांच्यातील व आई-वडीलातील मतभेदाची दरी वाढविण्यास कारणीभूत ठरली असली तरी परिवर्तनाची लढाई मात्र थांबविली नाही.
मध्ययुगात धर्म व समाज व्यवस्थेमध्ये समाजिक आर्थिक विषमता तसेच कर्मकांड,दैववाद, यज्ञप्रथा,स्रीदास्यत्व, स्पृश्य-अस्पृश्य भेदाभेद,अनिष्ट प्रथा,रूढी परंपरा आणि गोरगरीब शेतकरी शेतमजुराचे/शूद्रांचे शोषण अशा प्रचंड समस्या असलेल्या काळात महात्मा बसवेश्वरांनी प्रस्थापितांना कडाडून विरोध दर्शविला.समाजासाठी न्यायसंगत आणि हितकारक ठरेल अशा बाबीच्या समर्थनासाठी पूर्ण ताकदीनिशी पुढे सरसावले.सर्वव्यापक समतेसाठी स्वधर्मियांच्या विरोधातच बंडाचे निशाण फडकविण्याचे धाडस त्यांनी दाखविले.अशा प्रकारचे धाडस केवळ एक क्रांतिकारकच करू शकते.समाज क्रांतिकारक म्हणून एकाच वेळी अनेक पातळ्यांवर लढलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याचे विविध पैलू दृष्टिपटलावर येतात.त्यातील विविध दृष्टिकोनापैकी आर्थिक दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा आहे.महात्मा बसवेश्वरांनी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र स्वरूपात मांडणी केली नसली तरी त्यांच्या कार्यातून आर्थिक दृष्टिकोनाची/प्रभावाची स्पष्टपणे जाणीव होते. अनुभव मंटपातील व्यवहार,राजा ब्रिजवलाच्या संस्थानांमध्ये कोषाधिकारी म्हणून केलेले कार्य,तसेच कायकवे कैलास सिद्धांत आणि दासोह सिद्धांत हे त्यांच्या आर्थिक चिंतनाची साक्ष देण्यास पुरेसे आहे.महात्मा बसवेश्वरांना सामाजिक न्याय व समतेबरोबरच आर्थिक समता ही प्रस्थापित करावयाची होती.बसवकाळातही भारत हा कृषिप्रधान देश होता.अधिकांश व्यक्तीच्या उदरनिर्वाहाचे/उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत हे कृषीक्षेत्रच होते.त्याकाळी सत्ताधीश, राजे-महाराजे,त्यांचे सरदार, मांडलिक,सामंत महाजन,शेटे, जमीनदार,दंडनायक,जहागीरदार इत्यादींनी कृषी क्षेत्रावर मक्तेदारी मिळविली होती.ही मंडळी सुख चैनीच्या जीवन शैलींना प्राधान्य देत कष्टकरी,शेतकरी,शेतमजूर आणि शूद्र इत्यादी कडुन मोबदल्याविना किंवा अल्पशा मोबदल्यात कामे करवून घेत असे.त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास फारसा वाव नव्हता.राब राबूनही त्यांच्या वाट्याला दुःख,वेदना,यातना आणि दारिद्र्यशिवाय काही नव्हते.अज्ञान अंधश्रद्धा, कर्मकांडावर आधारलेले विधी व तत्वज्ञान तसेच जातीय कनिष्ठ पणाची भावना व धार्मिक दुर्बलता इत्यादी घटक त्यांच्या शोषणासाठी कारणीभूत ठरत असे.आजही तीच स्थिती कायम आहे.त्यातूनच त्यांच्यात नैराश्य व न्यूनगंडाची भावना जन्म घेत असे.समाजसुधारणेचा वसा घेतलेल्या बसवेश्वरांच्या सद्सदविवेकबुद्धीला असा व्यवहार नक्कीच पटत नव्हता.महात्मा बसवेश्वरांनी सर्वसामान्याच्या/बहुजन समाजाच्या दुःखाची व दारिद्र्याची कारणे हेरली होती.म्हणूनच त्यांनी लोककल्याणकारी दृष्टिकोन स्वीकारून व्यक्ती व समाजाचे दारिद्र्य निर्मूलन आणि समानतेवर आधारित अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी आपल्या उदात्त कार्याला कृतिशील प्रयत्नांची जोड दिली. उच्च-नीच,श्रेष्ठ-कनिष्ठ, गरीब-श्रीमंत,शोषित-शोषक अशी वर्गवारी राहणार नाही अशा मानवतावादी समाजाची उभारणी करण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता.गरिबी हीच गरिबीचे कारण आणि परिणाम आहे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.आधुनिक अर्थतज्ञ प्रा.नर्क्स यांनी सुद्धा गरीबी बाबतचे विश्लेषण असेच केले आहे.त्याच अनुषंगाने महात्मा बसवेश्वरांनी आपल्या कार्याची योग्य अशी दिशा ठरविली होती.
स्वकर्तृत्व व मामाच्या सहकाऱ्यांने राजा बिज्वल दरबारातील नोकरीच्या माध्यमातून आपल्या संकल्पाला/कार्याला मूर्त रूप देण्याची संधी प्राप्त होताच त्यांनी संधीचे सोने करून दाखविले.कलचुर्या राज्याची राजधानी असलेल्या मंगळवेढा पासून त्यांनी आपल्या क्रांतिकारी कार्याची मुहूर्तमेढ रोवली.राजदरबारी कार्य करताना त्यांनी सर्वप्रथम प्रशासनाची व्यवस्थित अशी घडी बसविण्यावर भर दिला.भ्रष्ट, अकार्यक्षम कर्मचारी/अधिकारी यांच्यावर नियंत्रणे आणलीत.अनावश्यक खर्चाला पायबंद घातला.महसूल,कर,इत्यादी वसुलीसाठी सोईस्कर अशी प्रशासकीय रचना अस्तित्वात आणली.दरम्यानच्या काळात राज्यात खोदकामाचे कार्य सुरू असताना ताम्रपट सापडला. ताम्रपटावरील अधोरेखित उल्लेख आपल्या अद्वितीय बुद्धीमत्तेच्या जोरावर वाचन करून (राजसिंहासना खाली सोन्याच्या नाण्याचे चार हंडे) राज्याच्या अडचणीच्या वेळी,सुरक्षेच्या दृष्टीने राखून ठेवलेला खजिना मिळवून दिला.त्यामुळे राजकोषात वृद्धी होण्यास हातभार लागला.राजकोष समृद्ध करणे आणि त्याचा वापर जनहितार्थ करणे किती आवश्यक आहे हे त्यांनी आपल्या कुशलतेने प्रत्यक्ष कृतीतून दाखविले.राज्याकडे असलेल्या वाढीव उत्पन्नातून जनउपयोगी कार्य आणि गरजवंतांना वेळोवेळी आर्थिक साहाय्य करण्यावर त्यांनी भर दिला.त्यांचे हे कार्य आजच्या लोकशाहीप्रधान देशासाठी सुद्धा तितकेच उपयुक्त आणि पथदर्शक आहेत.आजही लोकशाहीप्रधान देशात आर्थिक प्रश्न जसे व्यापारचक्र,साठेबाजी,भ्रष्टाचार काळा पैसा,करचुकवेगिरी असे विविध प्रश्न आ वासून उभे आहेत.या व अन्य समस्येवर उपाय महात्मा बसवेश्वरांच्या तत्वज्ञानात मिळते.तत्कालीन काळातही (बाराव्या शतकातील) आजच्या काळातील प्रश्नांची नावे भिन्न असली तरी स्वरूप मात्र कदाचित समान असावेत.एका वचनात महात्मा बसवेश्वर म्हणतात,
- “सामान भरल्यानंतर जकात दिल्याविना
- चुकवेगिरी करून आत जाता न येई
- खोटे नाणे मुळीच स्वीकारले जात नाही
- भक्ती रुपी सामानास जंगमच जकातदार कुडलसंगमदेवा.”
उपरोक्त वचनांवरून प्रशासकीय व्यवस्था जनहितार्थ बनविणे आणि जनतेलाही सरकार प्रति असलेल्या कर्तव्यची जाणीव करून देणे महत्वपूर्ण असल्याचे वचनावरून प्रकर्षांने दिसून येते.
महात्मा बसवेश्वरांना सामाजिक न्याय व समता अपेक्षित होती.त्यासाठी आर्थिक विषमतेचे समूळ उच्चाटन व्हावे असा त्यांचा आग्रह होता.मानवी समाजाच्या विकास,सुख-शांती आणि समाधानासाठी आर्थिक विषमता आणि गरीबी त्यात प्रामुख्याने अडसर ठरत आहेत याची त्यांना जाणीव होती.आर्थिक विषमतेचे मूळ हे लोकांची आळशी प्रवृत्ती,दैववादी विचारांचा पगडा,गरीबी,कर्मकांड इत्यादींमध्ये दडलेले आहे असे त्यांच्या निदर्शनात आले.त्यावर उपाययोजना करण्याच्या हेतूने त्यांनी “कायकवे कैलास सिद्धांत” आणि “दासोह सिद्धांत”मांडलेला आहे.प्रामाणिकपणा,निष्ठा आणि समर्पित भावनेने करण्यात आलेले शारीरिक श्रम म्हणजे कायक होय.सामाजिक श्रम,परिश्रम,सेवाकार्य बांधिलकीने अर्पित केलेले कार्य म्हणजे कर्म होय.कैलास म्हणजे शाश्वत आनंद होय.प्रामाणिक कष्ट केल्यास जीवनात शाश्वत आनंद मिळू शकतो यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता.यालाच “कायकवे कैलास सिद्धांत”असे म्हटले आहे.कर्मातच विश्वास,श्रमातच स्वर्गप्राप्ती आणि कर्तव्यपूर्ती हीच ईश्वर पुर्ती असल्याचे बसवेश्वरांचे मत आहे. महात्मा बसवेश्वरांनी सर्व कल्याणाचे मूळ त्यांनी कायकांना मानले आहेत.प्रत्येक व्यक्ती वा व्यक्ती समूहाद्वारे निष्ठापूर्वक आणि प्रामाणिकपणाने करण्यात आलेल्या कार्याने गरिबी,दारिद्र्य, बेकारी दूर होईल.समाज समृद्ध होईल.समाजात संपन्नता, समाधान आणि शांतता नांदेल. असा त्यांचा विश्वास होता.म्हणून त्यांनी अशाप्रकारचा दंडक सुद्धा घालून दिला होता.कायकाचे महत्त्व विशद करताना शरणी आयदकी मारय्या यांचे पुढील वचन उद्बोधक ठरते.
- “कायकात मग्न झाल्यावर गुरूदर्शनही विसरावे लिंग पूजा ही विसरावे
- लिंग पूजा ही विसरावी,
- जंगम समोर ठाकल्यावरही पर्वा करू नये
- कायकाचे कैलास झाल्या कारणे
- अमरेश्वरलिंग असले तरी कायकाच्या अधीन.”
व्यक्ती वा व्यक्ती समूहाने ठरवून दिलेले कार्य/कर्म निष्ठापूर्वक आणि प्रामाणिकपणाने करण्यावर त्यांनी भर दिला आहे.”कर्म हीच खरी ईश्वर सेवा आहे”असा आदर्श त्यांनी घालून दिला.मनुष्य समाजाने दैववाद,कर्मकांड,अंधश्रद्धा स्वतःवर हावी न होऊ देता कार्य केल्यास उत्पन्न वाढण्यास मदत होईल.पर्यायाने समाजातील दारिद्र्य/गरिबी दूर होईल असा दूरदृष्टीचा विचार त्यांनी मांडला. यासंदर्भात आयदकी लक्कम्माचे वचन पुढील प्रमाणे आहे;
- “जयाचे मन शुद्ध नसे
- तयासी द्रव्याचा अभाव भासे
- शुद्ध चित्ते कायकमग्न सद्बभक्तास
- पहावे तिथे लक्ष्मीचा आपसूकच वास
- मारय्याप्रिय अमरेश्वर लिंगाच्या सेवेत
- सतत असतो निरव.”
मनुष्य समाजाने प्रामाणिक व निष्ठापूर्वक कष्ट केल्यास शास्वत आनंद मिळविण्यास मदत होऊ शकते यालाच त्यांनी कायकवे कैलास सिध्दांत असे म्हटले आहे.सामाजिक,राजकीय व आर्थिक स्थिती या सर्वांमध्ये समारसता,एकता जोडण्याची शक्ती ही धर्मात आहे असा त्यांचा विश्वास होता.धर्माच्या आधारे त्यांनी कायक सिद्धांताची मांडणी केली.कायक सिध्दांत ते केवळ इतरांना सांगून थांबले नाही तर स्वतःही या सिद्धांताचे पालन करण्यास विसरले नाहीत.म्हणून त्यांना खर्या अर्थाने कर्ते सुधारक म्हणावे लागेल.
महात्मा बसवेश्वरांच्या काळात श्रमविभागणी ही मुख्यता जातीय श्रमकौशल्यावर आधारित होती.बौद्धिकतेचे,संरक्षणाचे, व्यापाराचे आणि सेवेचे श्रम हे अनुक्रमे ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य आणि शूद्र यांनी करावेत असा पायंडा होता.निर्मित कौशल्य श्रमात वर्गवारी बदलण्याची अजिबात सोय नव्हती.बौद्धिक व अन्य श्रमाच्या तुलनेत कष्टाला/अंगमेहनतीच्या श्रमाला अजिबात प्रतिष्ठा वा महत्त्व नव्हते.अहोरात्र कष्टाचे काम करून ही त्यांना प्रतिष्ठा तर नव्हतीच उलट दारिद्र्य,दुःख,यातना आणि उपेक्षा त्यांच्या माथी चिकटून बसल्या होत्या.त्यामुळे श्रमिकामध्ये आलेले नैराश्य निवारण आणि श्रम प्रतिष्ठेसाठी त्यांनी “श्रमसमानतेचा सिद्धांत” मांडला आहे.समाजाच्या आवश्यक गरजा भागविण्यासाठी करण्यात आलेले प्रत्येक श्रम/कार्य महत्वाची आहेत अशी त्यांची धारणा होती.परंतु बौद्धिक श्रमाच्या तुलनेत शारीरिक कष्टाचे काम करणाऱ्यांना मिळणारा कमी मोबदला त्यांना अजिबात मान्य नव्हता.प्रत्येक व्यक्ती हा ईश्वराचा अंश असल्याने प्रत्येकाचे कार्य/कर्म प्रथम दर्जाचे,दुय्यम दर्जाचे असूच शकत नाही. म्हणजेच ब्राह्मण क्षत्रिय,वैश्य यांनी केलेले कार्य श्रेष्ठ आणि शूद्रांनी (शेतमजुर-शेतकरी) केलेले कष्टाचे/सेवेचे काम हे कनिष्ठ दर्जाचे होऊच शकत नाही असे त्यांचे प्रभावी मत होते.मानव निर्मित विषमता नष्ट करण्याचा ध्यास घेतलेल्या बसवेश्वरांनी व्यवसाय कर्मा वरून उच्च-नीचतेचा दर्जा ठरविण्याच्या प्रवाहाविरुद्ध प्रखर भूमिका घेतली होती.प्रत्येकाकडून करण्यात येत असलेले कार्य/कर्म उद्योग-व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक आहेत असे त्यांचे मत होते.धर्माचा,दैवी आशीर्वाद,भांडवल किंवा सत्तेच्या माध्यमातून स्वतःश्रम न करता इतरांच्या श्रमावर तसेच लोकांकडून दक्षिणा घेऊन किंवा त्यांची लुबाडणूक/शोषण करून वैभव संपन्न जीवन जगणे त्यांना कदापिही मान्य नव्हते.एका अर्थाने महात्मा बसवेश्वरांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य केले आहे.परंतु आजही श्रममुल्याची स्थिती तशीच कायम आहे.यावरून श्रम प्रतिष्टेबाबतीत असलेली त्यांची तळमळ प्रकर्षाने दिसून येते.
महात्मा बसवेश्वरांनी उत्पन्न वाढीसाठी कायक सिद्धांत तर वाढीव उत्पन्न व संपत्तीचे वितरणासाठी दासोह सिद्धांत सांगितलेला आहे.अहंकार विरहित दान म्हणजे दासोह होय.
प्रामाणिक प्रयत्नातून प्राप्त केलेल्या मिळकतीचा काही हिस्सा हा समाजातील गरजू व्यक्ती वा समूहासाठी खर्च करण्याचे सूचविलेले आहे.त्यास दासोह सिध्दांत असे म्हटले आहे. त्यातून सामाजिक व आर्थिक विषमता दूर करून समताधिष्ठित समाज निर्मिती करणे हा त्या मागील मुख्य हेतू आहे.महात्मा बसवेश्वरांनी त्रिविध दासोह सांगिलेला आहे.व्यक्तीचा सर्वांगीण विकास व जडणघडणीमध्ये गुरु,लिंग आणि जंगम (समाज) यांचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा वाटा असतो.या त्रयीचे ऋणफेड म्हणून व्यक्तीने गुरूला तण,लिंगाला मन आणि जंगमास (समाजात)धन अर्पण करणे म्हणजे त्रिविध दासोह होय.त्रिविध दासोहाच्या माध्यमातून ज्ञानप्राप्ती,मानसिक सामर्थ्य आणि समाजहित साध्य करणे शक्य असल्याचा विश्वास त्यांना होता.मिळविलेल्या उत्पनाचा काही हिस्सा समाजऋण फेडण्यासाठी खर्च करण्याचे महात्मा बसवेश्वर केवळ सुचित करतात असे नाही तर स्वतःही या सिद्धांताचा अंगीकार करतात.त्यांनी संपूर्ण आयुष्यात कमाविलेल्या सर्व संपत्तीचा हिस्सा हा समाजाच्या कल्याणासाठी वापरला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी (गंगाबिका-मामा बलदेव ची मुलगी आणि निलांबिका-राजा बिज्वलाची मानस भगिनी व महामंत्री सिध्दरस यांची एकुलती एक मुलगी) कडून मिळालेली संपत्तीही त्यांनी स्वकल्याणासाठी वापरण्या ऐवजी समाजहित,जन कल्याणासाठी अर्पण केली आहे.यावरून जनकल्याणा प्रती त्यांना असलेली आस्था आणि कर्तव्येतत्परता दिसून येते.परंतु स्वार्थाने प्रेरित या जगामध्ये असे होताना दिसत नाही.म्हणूनच स्वार्थाने बरबटलेल्या व्यक्ती वा व्यक्ती समूहांना उद्देशून म्हणतात;
- “भाताचे शित पाहता कावळा
- हाक न मारी का आपुल्या परिवारास?
- घासभर अन्न दिसता कोंबडी,
- न जमवी का आपूल्या कुलबांधवास?
- शिवभक्त होऊन भक्ती पक्षविहीन असल्यास
तो कावळा कोंबडीहून हीन कुडलसंगमदेवा.”
अर्थात कावळा कोंबडी सारख्या पक्षांना आपले स्वकीय समजतात.पक्ष्यांना इतराप्रती असलेला कळवळा तथाकथीत बुद्धीजीवी म्हणून समजूत करून घेतलेल्या मानव प्राण्याला कळू नये याबाबतीत आश्चर्य व्यक्त करतात.सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून गरजवंतांना प्राप्त मिळकतीतील काही हिस्सा समाजऋण फेडण्याची जाणीव करून देण्यास ते विसरत नाही. सोबतच अनैतिक मार्गाने मिळविलेले धन,व्याजाच्या बदल्यातून मिळविलेले धन, धाक-धपडशाहीच्या बळावर मिळविलेले धन; हे दान करण्यासाठी योग्य नसल्याचा निर्वाळा देण्यासही ते विसरले नाहीत.त्यांचा हा सल्ला आजचे तथाकथित राज्यकर्ते आणि स्वार्थाने प्रेरित भ्रष्ट लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.
धन साठा,परधन आणि भ्रष्टाचारा बाबतीतही त्यांचे परखड असेच मत होते.गरजेपेक्षा जास्त संपत्ती गोळा करणे त्यांनी चोरी करण्या समान मानले आहेत.याबाबतीत एका वचनात म्हणतात
“करू नका धनसंग्रह
केल्यास नाही चुकणार येणारे भव (दुःख)
अर्थात गरजेपेक्षा जास्त संपत्ती गोळा करणे म्हणजे दुःखाना आमंत्रण देण्यासारखे आहेत.भ्रष्टाचार,काळा पैसा या बाबतीतही असेच काहीसे मत आहेत.एका वचनात म्हणतात
- “आयुष्य आहे,मृत्यू नाही म्हणून धन गाडून ठेवतात
- आयुष्य संपून मृत्यू येता,त्या धनाचा उपयोग कोणाला
- जमीन गाडू नको,जमिन परत देणार आहे?
- दहा एक्कर जमीन,दुपती गाय, नंदादीप देतो
- असा नेम चालविला आहे
- असे म्हणणाऱ्याचे तोंड पाहू नये,
- त्याचे बोलणेही ऐकू नये
- अंडज,स्वदेज, उदभिज,जरायुज प्राण्यांना
- भवितव्य कोणी दिले
- मालकाला लाडू मोडून वाढणाऱ्या सेवकास
- माझ्यामुळेच गेले
- असे म्हणणाऱ्याच्या तोंडात माती घातल्याशिवाय
- राहील का कुडलसंगदेव.”
गरीबाची लुबाडणूक/शोषणाद्वारे मिळविलेल्या उत्पन्नातून रुबाबात/ऐटीत मिळविणारे,दिखाऊ कार्य करणारे,गोरगरिबांना अल्पशी मदत करून सुधारक असलेल्यांचा बडेजाव/बागुलबुवा करणाऱ्यासाठी त्यांचा हा सणसणीत इशारा आहे.आजही समाजामध्ये असे तथाकथित आणि नाटकी समाजसुधारकाचे जणू पेवच फुटले आहे!.काही न करता केलेल्या कामाचा केवळ गवगवा करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.तसेच त्यांनी काळ्याबाजारावरही प्रखरतेने प्रहार केला आहे.त्यांचे हे विचार आजही तितकेच प्रासंगिक वाटते.
महात्मा बसवेश्वरांनी व्यक्तीच्या विशेषता महिलांच्या आर्थिक स्वावलंबनावावर तसेच उद्योगा-धंद्यावरही अधिक लक्ष केंद्रित केले होते.त्याकाळी भारतामध्ये जमीन,व्यापार आणि उद्योगाची स्थिती बऱ्यापैकी होती. परंतु सामाजिक विषमतेची दरी अधिक रुंदावली होती.शोषक-शोषित,अर्थात “आहे रे” आणि “नाही रे”अशा दोन वर्गात समाजाची विभागणी झाली होती.”नाही रे/शोषित वर्गाची” स्थिती तर अत्यंत दयनीय होती.त्यातच जातीय व्यवस्थेची बळकटी आणि जाचक बंधने त्यात अधिक भर घालणारी होती.महात्मा बसवेश्वरांनी जातीय बंधनाच्या शृंखला खंडित करण्यासाठी पुढे सरसावले होते. जातीविरहित स्वातंत्र्य,समता, बंधुत्व,न्याय व समानतेवर आधारित समाजाची उभारणी करण्याचा ध्यास घेतला होता. वर्णव्यवस्था,जातिभेद,अस्पृश्यता,स्त्री दास्यत्व व सामाजिक अन्याय आणि अत्याचाराच्या उच्चाटनासाठी अनुभव मंडपाची स्थापना करण्यात आली होती. अनुभव मंडपात स्त्री-पुरुषांना अन्य संस्कारासोबतच व्यवसाय/ उद्योगाचे कौशल्य वृद्धीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे सुरू केली होती.सर्वात महत्वाचे म्हणजे प्रस्थापितांनी बहुजन समाजाला नाकारलेल्या व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालविले होते.अनुभव मंटपात असे स्वातंत्र्य बहाल केले जात असे.तसेच व्यवसाय उद्योगाच्या माध्यमातून स्त्रियांनाही स्वावलंबी कसे करता येईल यावर त्यांचा कटाक्ष होता.एकंदरीत त्याकाळातही त्यांनी उद्योग व्यवसायाची कास धरली होती.यावरून त्यांनी बाराव्या शतकातच व्यवसाय उद्योगाचा खऱ्या अर्थाने पाया रचला होता असे म्हणण्यास हरकत नाही.एकंदरीत महात्मा बसवेश्वरांनी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध आघाड्यांवर कार्य केले असुन आजच्या स्थितीतही प्रासंगिक आणि उपयुक्त आहे.
अठराविश्व दारिद्र्यात खितपत पडलेल्या वंचित, उपेक्षित बहुजन समाजातील दारिद्रय,गरिबी आणि आर्थिक विषमता मोडीत काढन्यायासाठी तसेच आर्थिक दृष्ट्या समृद्ध भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी महात्मा बसवेश्वरांनी केलेले कार्य हे अद्वितीय असेच आहे.आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून समानतेच्या तत्त्वावर अर्थव्यवस्थेची उभारणी करण्याचे त्यांचे कार्य लक्षात घेता,ते मध्ययुगातील पहिले समतावादी/समाजवादी अर्थतज्ञ आहे असे म्हणावे लागेल.
- प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
- अर्थशास्त्र विभाग प्रमुख
- श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय,
- पिंपळखुटा ता.धामणगाव रेल्वे, जि.अमरावती
- भ्रमणध्वनी- ९९७०९९१४६४