तो व्हँलेंटाईनचा दिवस. त्याच दिवशी ते दोघं भेटले होते. त्याच दिवशी त्यानं आपल्या पत्नीला लाल फुल देवून ओळख करुन दिली होती. तशी त्याला मुलीशी बोलायला खुप भीती वाटायची. पण ते फुल देतांना आज त्यानं धाडस दाखवलं होतं. त्याला काय माहित होतं की तेच लाल फुल……. त्याचा लाल रंग असल्यानं व लाल रंग धोक्याचं प्रतिक असल्यानं तो लाल रंग आपल्याला धोका देईल. त्याच लाल रंगानं नव्हे तर त्या लाल गुलाबानंच त्याच्या जीवनाची राखरांगोळी केली होती.
आज त्याला सगळंच आठवत होतं. सकाळी उठल्यापासूनच तो उदास होता. ती तरुणाईची आठवण आणि तो लाल रंगाचा गुलाब देणं. हीच आठवण त्याला काही स्वस्थ बसू देत नव्हती. कारण आज त्याची पत्नी त्याच्याजवळ नसून त्याला सोडून दूर कुठेतरी राहायला गेली होती.अलिकडे बहुतेक घराघरात असंच घडत असलेलं चित्र दिसतं. पती भ्रष्टाचार करुन किंवा उलटी सीधी कामं करुन पैसा कमवीत असतो आणि तो पैसा आपल्या पत्नीला देत असतो. पण पत्नी काय करते? पत्नी तर त्या पैशानं आपल्या पतीलाही माहित होवू न देता या सर्व पैशाची मालकीण असून सुद्धा चोरुन लपून दागदागीणे बनवते. ते कशासाठी? तर तिच्या तुटक्या संसारासाठी. वेळ पडल्यास एखाद्या वेळी एखादं संकट आल्यास जर पतीजवळ एखाद्या वेळी पैसा नसेल, तर हा पैसा कामात येत असतो. काही महिला याच विचारांच्या असतात. परंतू यातही काही महिला अपवाद असतात. काही महिला असा विचार न करता केवळ स्वार्थीपणानं विचार करतात. त्या पतीला केरकचरा समजत पतीच्याच पैशावर राज करुन पतीलाच नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करीत असतात. हे तेवढंच खरं आहे.
तो तरुणाईचा काळ. त्या कॉलेजात तो व ती शिकत होती. एकाच वर्गात असल्यानं तिची व त्याची ओळख झाली. नुसती ओळखच झाली नाही तर त्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. ही मैत्री पुढील काळात एवढी घट्ट झाली की पुढील काळात त्या मैत्रीचं रुपांतर विवाहात झालं. तो तसा आता नाखुशच राहात होता. तसं आता त्याला म्हातारपण आलं होतं. चेह-यावर सुरकृत्या पडल्या होत्या. चालतांना हातपाय थरथरत होते. हातपायांना मुंग्या आल्यासारख्या वाटत होत्या नव्हे तर आता फिरणं, उठणं, बसणंही जड झालं होतं. आज तो एकमेव आधार म्हणून असलेल्या पेन्शनवर जगत होता, तेही वृद्धाश्रमात राहून.
उमाकांत त्याचं नाव. आयुष्यात सर्वकाही असूनही तो खडतर वाट चालला होता. तसं त्याचं बालपण सुखात गेलं होतं. त्याचबरोबर त्याला लवकरच नोकरीही मिळाली होती. त्यामुळं की काय, त्याला पत्नीही लवकरच मिळाली. ती नोकरीवर नव्हती. तशीच पाहिजे तेवढी श्रीमंत घरातीलही नव्हती. पण जास्त शिकलेली असल्यानं व पाहायला देखणी असल्यानं उमाकांतनं तिच्याशी विवाह केला. तिचं नाव शारदा होतं. शारदाचे मायबाप शेणामातीच्या घरात राहात होते. त्यांचं तुटकं झोपडं होतं. बाराही महिने त्या तुटक्या झोपड्यात हवा खेळती राहायची. तिच्या बापाजवळ पैसा नसल्यानं ते घरावर चांगलं छतही टाकू शकायचे नाहीत. त्यामुळं की काय, पाऊस आलाच तर ते छत गळत असल्यानं त्या छतातून तो पाऊस चक्क घरात प्रवेश करायचा. त्यानं घरात प्रवेश करताच सगळे घाबरुन घरातच धाव घ्यायचे. मग कोणी ताट कोणी गंज आणत त्या गळतूनीवर लावायचे आणि त्या पावसाला थोपवून धरायचे. परंतू त्याही घरात एक मुलगी विलक्षण बुद्धीमत्तेची निघाली होती. ती हुशारच नाही तर महाहूशार होती. असे म्हणायला काहीही हरकत नाही. याउलट उमाकांतचं होतं.
उमाकांत हा नोकरी करणा-या बापाचा मुलगा होता. त्याचं चांगलं घर होतं. घरी भरपूर प्रमाणात पैसापाण्याची रेलचेल होती. पण अशाच या उमाकांतचं शारदेवर प्रेम होवून गेलं नव्हे तर त्याच्या मनात शारदेबद्दल दयाभाव उत्पन्न झाला. ज्या दयाभावनेनं त्याचाच घात केला.
शारदेवर उमाकांतचं लय प्रेम होतं. ती त्याला फार आवडत होती. पण शारदेला तो आवडेल तेव्हा ना. शारदेला काही तो आवडत नव्हता. त्याला मिळालेली सरकारी नोकरी पाहून ती त्याचेवर भाळली होती. तसं पाहता ती त्याची कॉलेजची मैत्रीण असल्यानं अधिकच जीव लागला होता. तशी तिही त्याचेवर प्रेम करायची. पण तिचं हे प्रेम खोटारड्या स्वरुपाचं होतं. ती प्रेमाचं नाटक करुन आपला स्वार्थ साधत असे. उमाकांत सरकारी नोकर. त्याला कार्यालयातही छळास सामोरं जावं लागलं. तरीही तो सर्व अत्याचार सहन करुन व काटकसर करुन त्यानं जो पैसा कमवला. तो पैसा त्यानं मालमत्ता विकत घेण्यासाठी वापरला. तसा तो जीही मालमत्ता विकत घेत असे. ती मालमत्ता तो आपल्या पत्नीच्या नावे करीत असे. कारण तिच्यावर असलेलं त्याचं प्रेम. आज जीही मालमत्ता त्याचेजवळ होती. ती सर्व मालमत्ता तिच्याच नावावर होती.
मध्यंतरीचा काळ चांगला गेला. कारण तो पैसे कमवीत होता. पण जसजसा काळ हळूहळू सरकत गेला. तसतसा तो खंगत गेला. तसा तो निवृत्तही झाला.
आज त्याला पेन्शन मिळत होती. तरीही तो खुश नव्हताच. कारण त्यानं जरी पैसा कमवला असला तरी तो सर्व पैसा त्यानं आपल्या नावावर न करता आपल्या पत्नीच्या नावानं केला होता. आज तीच पत्नी आपल्या मुलाबाळासह त्याला सोडून दुसरीकडे राहायला गेली होती. तिनं पतीच्या एवढ्याशाही मदतीची आठवण ठेवली नव्हती. एवढंच नाही तर तिनं तो राहात असलेलं मकानंही विकून टाकलं होतं, तिच्या नावावर असल्यानं. तो मात्र वृद्धापकाळात वृद्धाश्रमात पेन्शनच्या मिळणा-या पैशानं जगत होता. आज त्याचाच पैसा……त्याचीच मेहनत त्याला बेईमान झाली होती नव्हे तर तो सगळं काही स्वतः कमवूनही भिकारचोट बनला होता, तर त्याची पत्नी स्वतः काही न कमवता करोडपती बनली होती.
- अंकुश शिंगाडे
- नागपूर
- ९३७३३५९४५०