अमरावती : नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरूस्तीचे महत्व बिंबवण्यासाठी ‘फिट इंडिया’ मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीबाबत चाचणी होणे आवश्यक असून, त्यासाठी शाळांनी नोंदणी करण्याचे आवाहन वारंवार करूनही व दोनदा मुदतवाढ देऊनही बहुसंख्य शाळांनी अद्यापही नोंदणी केलेली नाही. त्यामुळे पुन्हा 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
आता यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही. त्यामुळे 10 जानेवारीपर्यंत नोंदणी न केल्यास शाळा जबाबदार राहतील, असा इशारा जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी दिला आहे.
राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांतून पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची तंदुरूस्तीबाबत चाचणी घेऊन शाळांनी त्याबाबत फिट इंडिया पोर्टल किंवा ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. याबाबत ॲपच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले जाणार आहे. https://schoolfitness.kheloindia.gov.in/staticpage/landingpage.aspx ही संबंधित पोर्टलची लिंक आहे.
शाळांत शारीरीक शिक्षण विषयाचे शिक्षक नसल्यास शाळांनी नियुक्त केलेल्या इतर सहायक शिक्षकांची खेलो इंडिया ॲपवर नोंदणी करावी. विद्यार्थ्यांची क्रीडाविषयक प्रशिक्षणे ॲपच्या माध्यमातून होणार असल्याने नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी न झाल्यास संबंधित संस्था व मुख्याध्यापक जबाबदार राहतील, असा इशारा श्री. जाधव यांच्यासह प्राथमिक शिक्षणाधिकारी ई. झेड. खान व माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. वि. बोलके यांनी दिला आहे.