चांदूरबाजार : तारुण्यात येताच दोघांचे प्रेम जुळले. प्रेमाला घरच्यांचा विरोध. परंतु विरोधाला न जुमानता दोघेही, विवाह न करताच लिव्ह अँन्ड रिलेशनशिपमध्ये पती-पत्नीप्रमाणे राहायला लागले. हे युवतीकडील मंडळींना आवडले नाही. यातून झालेल्या वादात कथित जावयाने व्हॅलेंटाईन डे ला सासरा व साळ्याची धारदार शस्त्राने हत्या केली. यात कथित जावयाचा आजे सासरा ही गंभीर जखमी झाला असल्याचे कळते. ही घटना तालुक्यातील कुरळ पूर्णा येथे, रविवार दिनांक १४ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसात वाजता घडली. प्रकरणातील आरोपी रवी सुरेश पर्वतकर (वय २३) राहणार महावीर कॉलनी अमरावती.हा आपल्या लिव्ह अँण्ड रिलेशनशिपमधील पत्नीला घेऊन फरार झाला आहे. पोलिस आरोपीच्या शोधात आहेत.
प्राप्त माहितीनुसार सदर प्रकरणातील आरोपी व त्याची कथित पत्नी हे दोघेही अमरावती येथे राहत होते. तेथे राहत असतांनाच दोघांचेही प्रेम जुळले. लग्नाच्या आणा-भाका झाल्या. परंतु दोघांचा समाज वेगळा-वेगळा असल्याने, युवतीच्या घरच्यांकडून लग्नाला विरोध झाला. लग्नाला विरोध झाल्यामुळे दोघांनीही, लग्न न करताच लिव्ह अँन्ड रिलेशनशिप मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते राहायला लागले. दोघेही सज्ञान असल्यामुळे कायद्यानुसार याला कोणालाही विरोध करता आला नाही. परंतु युवतीच्या घरच्यांकडून या दोघांना वेगळे करण्याचा प्रयत्न होतच राहीला. काही दिवसांनंतर युवतीकडील मंडळी युवतीला आपल्या घरी कुरळ पूर्णा येथे घेऊन आले. त्यानंतर सदर युवतीला तिच्या घरच्यांनी परत आरोपीकडे जाऊ दिले नाही. तसेच लिव्ह अँन्ड रिलेशनशिपमध्ये राहणार्या कथित पती-पत्नीची सोडचिठ्ठी घेण्याची तयारी युवतीकडील मंडळींनी केली. याचदरम्यान व्हॅलेंटाईन डे ला प्रकरणातील आरोपी, आपल्या कथित पत्नीला घ्यायला कुरळ पूर्णा येथे आला. यावेळी युवतीकडील मंडळींनी आरोपीला, आधीच लिहून ठेवलेल्या घटोस्फोटाच्या स्टॅम्प पेपर वर सही करण्यासाठी दबाव आणला. परंतु त्यांच्या या दबाला बळी न पडता,आरोपी आपल्या लिव्ह अँन्ड रिलेशनशिप मधील पत्नीस बळजबरीने घेऊन जाण्यास निघाला. आरोपी युवतीला घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असताना आरोपी व युवतीकडील मंडळीत जोरदार वाद झाला. या वादानंतर ही आरोपी दुचाकीवरून सदर युवतीला घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असतांना, युवतीचे आजोबा, वडील व भाऊ हे तिघे मोटर सायकलला थांबवायला आडवे आले. यादरम्यान आरोपी व युवतीकडील तिघांमध्ये चांगलेच भांडण जुंपले. युवतीकडील तिघेही आरोपीस युवतीला घेऊन जाण्यास वारंवार मज्जाव करीत होते. यावरून आरोपीने आपल्या जवळील धारदार शस्त्राने (चाकूने) तिघांवरही जोरदार हल्ला केला. आरोपीच्या या हल्ल्यात, युवतीचे वडील बंडू साबळे, धनंजय साबळे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.तर युवतीचे आजोबा विश्वनाथ साबळे हे गंभीर जखमी झाले. अशा परिस्थितीत संधीचा फायदा घेऊन घटनास्थळावरून आरोपी आपल्या लिव्ह अँन्ड रिलेशनशिपमधील पत्नीस (वय २२) ला घेऊन स्पेलंडर दुचाकी क्रमांक एमएच २७-बीयु-१८६६ वरून फरार झाला आहे. या प्रकरणी मयत बंडू साबळे यांची पत्नी मीरा साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक ६५/२0२१ कलम ३0२,३0७,३६४ भा.द.वी.नुसार चांदूरबाजार पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविला आहे. पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.या प्रकरणातील आरोपी आढळून आल्यास, चांदूरबाजार बाजार पोलिसांना माहिती देण्याचे आव्हान स्थानिक पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024