कवी व्यासंगाच्या उद्यानात विचारांची फुले वेचून मौनाच्या गुंफेत बसून त्याचे गजरे करीत असतो. अगदी याचप्रमाणे कवीची कविता कागदावर उतरत असते. कविता हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नाही, तर वास्तवाला स्पर्श करुन मानवी भावभावनांचा कल्लोळ आपल्या काळजापर्यंत पोहोचवण्याचे एक सकस आणि सशक्त माध्यम असते. कविता समाजदृष्ट्या प्रभावी तेव्हाच होते जेव्हा तिला वैचारिकतिचे तात्त्विक अधिष्ठान लाभते. कवीच्या वाट्याला आलेले संघर्षमय आयुष्य जेव्हा एखादा कवी नेमक्या, मार्मिक, भाषाशैली द्वारे मांडतो तेव्हा ती कविता सामाजिक उद्रेक घेऊन जन्माला येते. सामाजिक विषमतेविरुद्ध बंड पुकारते. याच प्रगल्भ जाणिवेतून डॉ विशाल इंगोले यांचा *माझा हयातीचा दाखला* हा कवितासंग्रह आकारास आला आहे.प्रस्तुत काव्यसंग्रहाच्या समीक्षा लेखनास विलंबच झाला कारण शब्दसृष्टीतील नेमकी कोणती शब्दफुले संग्रहास अर्पण करावीत या प्रश्नाच्या आवर्तात माझी साहित्यबुद्धी कित्येक दिवस अडकून होती.असो…
- लेखणीतून उतरत जाते मी आटवलेले रक्त
- कागदाच्या शोभेसाठी मी शब्द सजवत नाही
अत्यंत ताकतीचा मुक्तछंद डॉ विशाल इंगोले लिहतात. तसे पाहिले तर विं.दा. करंदीकर, शरच्चंद्र मुक्तिबोध, वसंत बापट, कवी अनिल यांनी मुक्तछंद काव्य प्रकार मराठी कवितेत रूढ केला. आज मुक्तछंद लिहिणारे अगदी बोटावर मोजण्याइतकेच कवी आहेत. अलीकडच्या काळात मुक्तछंदाचा इतिहास लिहिताना डॉ विशाल इंगोले यांचे नाव वगळून तो लिहिता येणार नाही. कारण नसानसात निखारे भरणारे मुक्तछंदकाव्य त्यांनी लिहिले आहे.
आपल्या कवितेच्या एका तरी ओळीने वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतला पाहिजे तरच ती कविता,मात्र इथे हा संपूर्ण संग्रहच प्रत्येकाला आतून बाहेरून ढवळून काढतो. रोजच्या जगण्यातले पेच घेऊन व कष्टाचे डोंगर पार केल्याशिवाय ज्यांना जगणे अशक्य असते अशा समूहाच्या वंचित माणसाच्या दुःखाच्या आरशात कवी स्व:ताला पाहात असतो, तेव्हाच अस्सल काव्य निर्मिती होते. याचे प्रत्यंतर हा संग्रह वाचताना येते. विजेच्या लोळा प्रमाणेच डॉ विशाल इंगोले यांच्या प्रतिभेची चमक डोळे दिपवून टाकते. म्हणूनच त्यांच्या दाखल्याची दखल महाराष्ट्राला घ्यावी लागली. काव्य रसिकांनी अक्षरशः हा संग्रह डोक्यावर घेतला आहे. अनेक चर्चासत्रे, परिसंवाद या संग्रहावर घेण्यात आले. आजपावेतो अठरा मानाचे पुरस्कारही या संग्रहाला मिळाले आहेत. चोखंदळ वाचकांच्या पसंतीला हा काव्यसंग्रह पडण्याचे कारण म्हणजे त्यांची कविता. त्यांच्या लेखणीत अन्याय, अत्याचार विरोधात बंड करून उठायची ताकत आहे. ते जेव्हा स्वतःच्या भाव विश्वाला कवटाळतात तेव्हा अत्यंत दुर्मिळ अशा ताणतणावाची गुंफण करण्याचा निर्भीडपणा तिच्यात आहे. प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरोधात *हे कोणते धर्म* या कवितेत पोटतिडकीने काही प्रश्न ते उपस्थित करतात.
- कोणते धर्म पाळतो आम्ही
- चौकात माणसे जाळतो आम्ही
- ती राहिली माय घरी उपाशी
- दगडावरी असे भाळतो आम्ही”
धर्माच्या नावाखाली विकृती निर्माण होते, तेव्हा अराजकता माजते. तेव्हा माणसाला आणि माणुसकीला सुरूंग लागल्याची खंत ते व्यक्त करतात. मानवी संवेदना मांडत असताना अंधश्रद्धेवरही ते प्रहार करतात. आजच्या विज्ञान युगात देखील अनेकांची मानसिकता रानटी जनावरापेक्षा भयानक आहे. हेच कवी सांगतात. त्यांच्या कवितेमध्ये चिंतनशीलता आहे. लोणचे मुरल्यानंतर जसे अधिक रुचकर लागते अगदी तशीच! एखादा विचार सुचल्यानंतर अनेक दिवस तो मनात खोलवर मुरावा लागतो. प्रतिमा- प्रतिके यांचा चपखलपणे वापर करून तो विचार मग कवी सफाईदारपणे व्यक्त करतात.मग *अतिक्रमण* सारखी अजरामर कविता ते लिहून जातात.
- त्या पिंपळ वृक्षाखालचे
- अतिक्रमण काढावे म्हणतो
- बुद्धाला अन् माणसाला
- थेट जोडावे म्हणतो
मराठी काव्य प्रांतात ह्या ओळी मैलाचा दगड ठराव्यात असे मला वाटते. अशा अनेक आशयाचे गर्भाशय असणाऱ्या, मेंदूची घालमेल करणाऱ्या कविता *माझा हयातीचा दाखला* काव्यसंग्रहात आढळतात. जेव्हा आजूबाजूचे वातावरण, माणसं, समाज, राजकारण, विषमता अशा अनेकविध गोष्टींनी कवीचे मन हेलावते तेव्हा आपसूकच त्यांची कविता जन्म घेताना दिसते. ती कल्पनाविलासवर आधारित नाही.तर वास्तववादी प्रसंगातून जन्माला आलेली आहे. माणसाला आणि माणुसकीला केंद्रस्थानी मानणारी आहे.म्हणून ती सर्वसामान्याची कविता झाली आहे. एक प्रतिभावंत कवी, कुंचल्यावर प्रेम करणारा एक कलावंत चित्रकार ही भुमिका बजावत वैद्यकीय व्यवसायातील ज्वलंत अनुभवही त्यांनी ठिकठिकाणी मांडले आहेत. *ओझं* या कवितेत एका पेशंटचा अनुभव मांडतांना, दम्यान पोखरलेल्या बापाच्या मनाची तगमग व्यक्त केली आहे. *फक्त चार महिने चालवा माझी इंधन संपलेली गाडी* ह्या ओळी मन सून्न करणाऱ्या आहेत. महिन्यावर येऊन ठेपलेले मुलीचे लग्न आणि पेशंटचा जगण्याचा भरवसा नाही तेव्हा पेशंटने केलेले हितगूज शब्दात मांडताना ते म्हणतात-
- गोळ्या आणायला गेलेल्या बछडीला काही सांगू नका* *तिच्या मनाच्या वसंताला* *शिशिराची ओळख दावू नका
>
- जीर्ण झालेली श्वासांची माळ
- फक्त चार महिने तुटू देऊ नका
किती अंतर्मुख करणारे हे शब्दचित्र! अंगावर तेजाब शिडकावल्यावर थरकाप व्हावा अगदी तसेच! खरं म्हणजे जीवनाच्या तळाशी बुडी मारूनच अत्यंत अपरिहार्य अशा प्रश्नाच्या गाभ्याला डॉ विशाल इंगोले यांची कविता भिडते. ती जीवनाच्या आणि सुखदुःखाच्या चिंतनात्मक अनुभुतीने बहरलेली आहे. माणसाच्या सांस्कृतिक- भावनिक नात्याचा गोफ गुफतांना ही कविता उत्कटतेचा प्रत्यय देते. अनुभवाची गुंतागुंत अभिव्यक्त करताना मानवी मनाच्या अंतरंगाची समग्रता या कवितेने समर्थपणे पिल्याचे दिसते. माणसाची सनातन अस्वस्थता आणि अपरिहार्य शांतता याचे आव्हान डॉ विशाल इंगोले यांच्या कवितेने नव सर्जनाच्या सामर्थ्यावर सहज पेलण्याचे कारण कवीचे निरीक्षण चिंतनशील आहे. *कविता जगणे* या कवितेत ते लिहितात-
- ठेवावे मेंदू- काळजाच्या दाराला
- बाहेरून कुलूप लावून
- फक्त ऐकत राहावा
- आतुन येणारा आवाज
- उतरून सारा बेगडी साज
निराशा आणि काळोखी साम्राज्य या कवितेत सिद्ध असले तरी जगण्याची जिद्द आणि वास्तवाला सामोरे जाण्याचे शहाणपण त्यांच्या कवितेत स्वाभाविकपणेच अवतरले आहे. विशेष म्हणजे दुःखासोबत सुखाच्या क्षणांना शब्दाच्या चिमटीत पकडून ठेवणारी ही कविता जीवनाची संघर्षात्मक लढाई न हारता परिपक्व जीवन निष्ठेतून जगण्याची उर्मी देणारी आहे.आज डॉ विशाल इंगोले यांची कविता महाराष्ट्रभर मुक्त पक्ष्यासारखी स्वच्छंद विहार करायला लागली आहे. कवीसंमेलनामध्ये त्यांची कविता भाव खाऊन जाते. ती आकाशाला गवसणी घालणारी असली तरी सुद्धा कवी आणि कवितेचे पाय जमिनीशी घट्ट रोवलेले आहेत. कविता लेखन करणे आणि प्रत्यक्ष जगणे या दोन भिन्न गोष्टी असल्याचेही ते बोलून दाखवतात. तत्त्वज्ञानाचे चांदणे व्यवहाराच्या आकाशात व भाकरीच्या नकाशात निव्वळ निष्प्रभ ठरते म्हणून त्यांच्या कवितेला वास्तवतेची किनार आहे. *कविता आणि ती* या रचनेत ते म्हणतात-
- वाटते कधी कधी…
- कविता सवती सारखी
- थकलेल्या उधारीच्या पावतीसारखी
- येते चीड…होतो त्रागा
- असा कसा हा
- जगण्याचा धाग
अवकळा,विफलता, नैराश्य या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जगण्याचा केविलवाणा प्रयोग त्यांच्याही वाट्याला आला नसेल तरच नवल! तरीही बुद्ध, कबीर, तुकाराम, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारधारेचा पुरस्कार ते करतात. *चळवळ* या कवितेतून राजकारणी, कार्यकर्ता आणि सद्यस्थिती त्यांनी मांडली आहे.”
- पेल्यात बुडालेला बुद्ध
- चकण्यात खारटलेला तुकाराम
- सोड्याच्या बुडबुड्यात तरंगणारा फुले
- थंड पाण्यात पडलेला छत्रपत
- अन्… ब्रँडमध्ये वाटलेला आंबेडकर…
ही कवी मनाची सल आहे. हे शाश्वत सत्य कसे नाकारणार? ह्या जखमा कशा विसरणार? सशस्त्र मनू पावलापावलावर विचारातून वर्तनातून आडोशाला जागाच असतो. हे सत्य समाजासमोर आणण्यात कवी यशस्वी झाले आहेत.याबरोबरच *हाडाच्या शेतकर्याने* या कवितेत जगाचा पोशिंदा असलेला बळीराजाचे वास्तव चित्र रेखाटले आहे. शेतकऱ्यांना काहीच कळत नसल्याचा समज पांढरपेशी वर्गात आहे. मातीत न राबता, पावसात न भिजता, जेव्हा एसीत बसून साहेब शेतकऱ्यांना सल्ला देतात तेव्हा उपरोधपणे कवी म्हणतात-
- हाडाच्या शेतकर्याने
- काहीच बोलायचे नसते
- कारण एसीतल्या साहेबा इतकेच
- त्याला काहीच कळत नसते
एकंदरीतच समाजातील आव्हानांना सरळ तोंड देणारी, माणसाच्या बाजूने उभी राहणारी डॉ विशाल इंगोले यांची कविता आहे.त्यांच्या ‘पोस्ट मार्टम’ कवितेत समाजातील निर्लज्जपणावर भाष्य आहे, तर भाड्याच्या खोलीतून एकेक वस्तू बाहेर काढताना सुवासिनीच्या अंगावरचा एक एक दागिणा उतरवल्याची भावना ‘भाड्याची खोली’ या कवितेत अविष्कृत झाली आहे. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर स्वतंत्रपणे, दीर्घपणे लिहिता येईल. परंतु काव्यसंग्रहाच्या समिक्षेच्या दृष्टीने दृष्टीने ते अशक्य आहे. वानगीदाखल काही कवितावर प्रकाशझोत टाकण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामध्ये कविता भिजकी राहते, कविता जगणे, तू इतकेच मांड, कविता जगण्याचा ध्यास, मुखवटा या कविता कवितेचा संदर्भ घेऊन आल्या आहेत. एचआयव्ही सोबत जगताना कवितेतून त्यांनी रक्ताचे नाते उलगडले आहेत. न्याय व्यवस्थेबद्दलची खंत कोर्ट या कवितेतून व्यक्त झाली आहे. जिवंत माणसाला हयातीचा दाखला देण्याची वेळ आणणाऱ्या व्यवस्थेबद्दल कवीने टाहो फोटला आहे. याबरोबरच आपण एवढे करू या, मार्कापूरते फक्त, एल्गार, लोकशाही, हत्या आत्महत्या, तहान, माणसाचा झेंडा, निराधार, दुष्काळी जगणे,ठसठसीत जखम, तेव्हाच स्वतंत्र होता येईल या आणि अशा सारख्या अनेक कविता अंतर्मुख करून मुठी आवळायला भाग पाडतात आणि विद्रोहाची पेरणी करतात. आईबद्दलच्या ह्रदयबंद भावना व्यक्त करताना ते म्हणतात-
- मी मात्र असा अभागी
- नाही देऊ शकलो
- दोन श्वासही… तुझ्या असंख्य श्वासाच्या बदल्यात तुझे श्वास मंदावताना…
कवीच्या मनात आईच्या भावना खोलवर रुजल्यामुळे संग्रहाची अर्पण पत्रिका अतिशय बोलकी झाली आहे. ‘माझा हयातीचा दाखला’ हे अनोखे शीर्षक असलेल्या या कवितासंग्रहात एकूण बहात्तर कविता असून एकेक कविता वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी आहे. काव्याग्रह सारख्या दर्जेदार प्रकाशनाकडून उजेडात आलेला हा संग्रह. त्यातच प्रदीप खेतमर पुणे यांचे देखणे मुखपृष्ट आणि प्राचार्य डाँ गजानन जाधव यांची पाठराखण संग्रहाची उंची अधिक वाढवते. डॉ विशाल इंगोले यांचा हा पहिला वहिला संग्रह असला तरी पहिलेपणाच्या खुणा संग्रहात कुठेही दिसत नाहीत. प्रस्तुत संग्रह वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की कविता म्हणजे काय? प्रतिभा कशाला म्हणावे? संघर्ष, विषमता म्हणजे नेमके काय असते? या प्रश्नाची उत्तरे काव्यसंग्रह वाचनाने मिळतात आणि आपल्या मनात ऊर्जा निर्माण होते. प्रबोधनाची ठिणगी यातूनच जन्म घेते. मगच सामाजिक समतेचा एल्गार उभा राहतो. एकंदरीच मुर्दाड मनाचे ज्वलंत आणि जिवंत चित्रण हा काव्यसंग्रह. तर्तास एवढेच. शेवटी डॉ विशाल इंगोले यांचा साहित्यालेख उत्तरोत्तर असाच बहरत वाढत जावो, यासाठी प्रांजळ शुभेच्छासह समिक्षा विराम.
- डॉ सुनील पवार,
- बुलढाणा
- कवितासंग्रह-माझ्या हयातीचा दाखल
- कवी – डॉ विशाल इंगोले
- काव्यग्रह प्रकाशन, वाशिम
- मूल्य-१४० पृष्ठे-१२८