अमरावती : जिल्हा नियोजनात नमूद कामे विहित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. पूर्वनियोजनात काही बदल आवश्यक असेल तर १४ फेब्रुवारीपूर्वी निधीसाठीचे परिपूर्ण नियोजन सादर करावे. त्यानंतर मात्र प्राप्त निधीतून सर्व कामे वेळेत पूर्ण होतील याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी. निधी अखर्चित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. खासदार रामदास तडस, माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार सुलभाताई खोडके, आमदार प्रताप अडसड, बळवंतराव वानखडे, राजकुमार पटेल, देवेंद्र भुयार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, महापौर चेतन गावंडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, अपर आदिवासी विकास आयुक्त विनोद पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्यासह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना साथीच्या प्रादुभार्वामुळे सुरुवातीला निधीत काही प्रमाणात कपात करण्यात आली होती. मात्र, मिशन बिगेन अगेननंतर ती वाढविण्यात आली आहे. शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार यंदा २१९ कोटी १८ लाख रुपये प्रस्तावित नियतव्यय आहे. आदिवासी क्षेत्रातील उपयोजनांसाठी ७८ कोटी व सामाजिक न्याय योजनांसाठी १0१ कोटी रुपयांची तरतूद आहे. गतवर्षी २७१ कोटी ४0 लाख रुपये निधी मंजूर होता. त्याप्रमाणे सर्व विभागांकडून विहित वेळेत पूर्ण होणार्या आवश्यक कामांचे प्रस्ताव प्राप्त करून घेऊन निधी वाढविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. जिल्ह्यात निधीची कमतरता पडू देणार नाही. मात्र, निधी अखर्चित राहिल्यास ती संबंधित विभागप्रमुखाची जबाबदारी असेल. त्यामुळे सर्व विभागांनी परिपूर्ण नियोजन १४ फेब्रुवारीपूर्वी देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण
कोरोना महामारी लक्षात घेता विविध ठिकाणी यंत्रणा उभी राहिली. जिल्ह्यातील आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध सुविधांसाठी २२ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणावर भर असेल, असेही त्यांनी सांगितले.
आमझरी होणार मँगो व्हिलेज
जिल्ह्यातील आमझरी हे मँगो व्हिलेज म्हणून विकसित करण्यात येईल. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव येथे जिल्ह्यातील प्राचीन, ऐतिहासिक बाबींची माहिती देणारे प्रदर्शन व संग्रहालय उभारण्यात येईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जीवनचरित्र नव्या पिढीपयर्ंत पोहोचावे यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टरस या संस्थेकडून विशेष प्रकल्प उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जलप्रकल्प व तेथील नैसर्गिक संपदा लक्षात घेता इनलँड वॉटर टुरिझमवर भर देण्यात येईल. जिल्ह्यात गारमेंट हब निर्माण करण्याचेही नियोजन आहे. त्यासाठी आवश्यक निधी देऊ, असेही त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्यांचा नियोजनात समावेश व्हावा. विहित वेळेत सर्व यंत्रणांनी कामे करावीत व विभागांच्या नियोजनाचे अंतिम प्रारूप सादर करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी पत्रकार बांधवांशीही संवाद साधला.
Related Stories
November 30, 2023
November 28, 2023