अमरावती : कोरोना साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेता ख्रिश्चन बांधवांनी पवित्र नाताळ सण साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
याबाबत जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सुचनाही जारी करण्यात आल्या आहेत. नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभेचे आयोजन जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत करावे. गर्दी टाळावी व सोशल डिस्टन्स राखावे. चर्चमध्ये सॅनिटायझेशन, मास्क आदी व्यवस्था असावी. नाताळनिमित्त ठेवण्यात येणाऱ्या ख्रिसमस ट्री, देखावे आदी ठिकाणी सोशल डिस्टन्स, स्वच्छता आदी उपाययोजना असाव्यात. चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत गाण्यासाठी जास्तीत जास्त 10 गायकांचा समावेश करण्यात यावा. वेगवेगळ्या माईकचा वापर करुन सोशल डिस्टन्स पाळावे. चर्चबाहेर स्टॉल, दुकाने लावण्यात येऊ नये. 60 वर्षावरील नागरीकांनी व 10 वर्षाखालील बालकांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने सण घरामध्ये साजरा करावा. आयोजकांनी त्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. गर्दी आकर्षित होईल अशा धार्मिक सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. फटाक्यांची आतिशबाजी टाळावी.
31 डिसेंबर रोजी चर्चमध्ये आयोजित करण्यात येणारी प्रार्थना (थॅंक्स गिव्हिंग मास) ही मध्यरात्री आयोजित न करता सायं 7 वाजता किंवा तत्पुर्वी घेण्याचे नियोजन करावे. सर्वांनी साधेपणाने सण साजरा करुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Related Stories
December 4, 2023
December 4, 2023