अमरावती : धारणी तालुक्यातील नागुढाणा या गावातील पोल्ट्री फार्ममधील काही पक्षी मृत आढळले. त्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाच्या पथकानेही आज तिथे जाऊन तपासणी केली. त्यावेळी बर्ड फ्लूसदृश लक्षणे आढळून आली नाहीत, असे पथकप्रमुख तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे यांनी स्पष्ट केले.
डॉ. रहाटे म्हणाले की, आज आम्ही येथील पाच पक्ष्यांचे पोस्टमार्टम केले. त्यात पक्ष्यांना श्वसनसंस्थेशी संबंधित आजार आढळून आला. बर्ड फ्लूबाबत लक्षणे सकृतदर्शनी आढळत नाहीत. अद्यापपर्यंत जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्लू सदृश स्थिती आढळली नाही.
पूर्णपणे उकडलेले मांस व अंडी खाणे सुरक्षित आहे. अद्ययावत माहिती व शंकानिरसनासाठी 18002330418 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कुक्कुटपालकांनी जैवसुरक्षा राखावी: जिल्हाधिकारी
जिल्ह्यात अद्यापपर्यंत बर्ड फ्लूसदृश स्थिती आढळलेली नाही. तरीही पूर्वदक्षता घेतली गेली पाहिजे. कुक्कुटपालकांनी फार्म व परिसराची जैवसुरक्षा राखली जाईल, याची काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिले. जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी याबाबत पशुसंवर्धन अधिका-यांची स्वतंत्र बैठक घेऊन आदेश दिले. जिल्ह्यात कुठेही मांस विक्री करणा-या विक्रेत्यांनी मांसाचे अवशेष उघड्यावर न फेकता त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी. मांस व पंख इतरत्र पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. मृत पक्ष्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी. पक्षीघर व आवारातील फवारणीसाठी धुण्याचा सोडा, सोडिअम हायपोक्लोराईट, फोरमॅलिन वापरावे. निर्जुंतकीकरण नियमित करावे. तेथील सर्व व्यक्तींनी स्वत:ही स्वच्छता राखावी. जलाशये, पाणस्थळावर निगराणी ठेवून स्थलांतरित पक्ष्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, आदी निर्देश त्यांनी दिले.
Contents
hide
Related Stories
November 7, 2024
November 4, 2024
November 2, 2024