अमरावती : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेत जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी यापूर्वीच लागू करण्यात आली आहे. दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्रे वगळता इतर ठिकाणची धार्मिक स्थळे, पूजास्थाने खुली करण्यात आली असली तरी गर्दी टाळण्यासाठी यात्रा, महोत्सव यांना प्रतिबंध कायम असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्पष्ट केले आहे. तसा आदेशही जिल्हाधिका-यांनी जारी केला.
गर्दीतून संक्रमण होऊन कोरोनाबाधितांची संख्या वाढू नये यासाठी यात्रा, महोत्सव, मिरवणूका व समारंभांना प्रतिबंध करणारा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात धार्मिक स्वरूपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, स्नेहसंमेलने, महोत्सव आयोजित करता येणार नाहीत. संचारबंदी आदेशानुसार पाच किंवा अधिक लोकांनी एकत्र जमू नये, असा आदेश कायम आहे व तसे आढळल्यास किमान पोलीस उपनिरीक्षक दर्जाहून कमी नसलेल्या अधिकाऱ्यास कारवाईसाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.
यात्रा, उत्सव, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम यामुळे मोठी गर्दी होऊन विषाणूचे संक्रमण होऊ शकते. त्यामुळे हा आदेश जारी करण्यात आला आहे. गर्दी टाळण्यासाठी दक्षता नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिले आहेत.
Related Stories
October 10, 2024
October 9, 2024