आज काही बौद्धवस्तीत डोकावून पाहिले की, सद्धम्माचे पालन नाही. विहारात जाण्यासाठी कुणाजवळ वेळ नाही. महिलांना टीव्ही सिरीयल पासून फुरसत नाही. बौद्ध संस्कृती अर्थात भारतीय शालीन संस्कृती आपल्या पायाखाली तुडवित फॅशनेबल युगाने झपाटलेल्या तरुणी ज्येष्ठांचा मान राखीत नाहीत.क्रिकेट, मोबाईल, इंटरनेट आणि टीव्हीपासून कोणता तरुण अलिप्त असेल, असे वाटत नाही. लहान मुलांवर धम्माचे संस्कार नाहीत. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची, अभ्यासाची आवड दिसत नाही. दारुवाल्यापासून त्रस्त नसेल असे गाव शोधूनही सापडणार नाही. नशेच्या आहारी जात असलेल्या तरुणाईला कोणी आवरायला मागत नाही. कोणी कोणाचा गुरू नाही, कोणाचा चेला नाही.वस्तीवर अंकुश ठेवणारे नेतृत्व दृष्टीस पडत नाही. परिणामी गावात एकीकरण नाही. बाप-लेकात मेळ नाही. भावा-भावात पटत नाही. माय-लेकीत बनत नाही, सून-सासचे ऐकत नाही, सासूही आपल्या वजनाने राहत नाही. पती-पत्नीत समन्वय नाही. शेजाऱ्या शेजाऱ्यातून विस्तव जात नाही.कलहाशिवाय कुठेच काही दिसत नाही. अशा बौद्ध वस्तीची फक्त पाटीच आहे. एकतानगर नावालाच आहे. शांतीनगर दिसायलाच आहे.समतानगर आणि भीमनगर शोभेलाच आहे.
या वस्तीतील कलह शांत कधी होणार?, समाज एका ठिकाणी कसा येईल?, तो गुण्यागोविंदाने कधी नांदेल?, या वस्तीचे होईल तरी कसे?, असा विचार करून दुःखी होणारी, चिंता करणारी, अंत: करणाच्या आतल्या आत तुटणारी काही मंडळी समाजात असते जी काळजी करण्यापलीकडे काही करू शकत नाहीत. त्यांनी अशी हिम्मत सोडून चालणार नाही. त्यांनी तथागत बुद्धांनी सांगितलेल्या अनित्य सिद्धांताकडे सम्यकदृष्टीने पहावे. बुद्ध म्हणतात, ‘सर्वच गोष्टी अनित्य आहेत.म्हणून आज जे काही आहे ते सुद्धा बदलणारे आहे. ते हातावर हात देऊन बसल्याने बदलणारे नाही, तर ते आपल्यालाच बदलावे लागणार आहे. त्यासाठी काही ठोस कृती करावी लागेल. हिम्मत न हारता पुढे जावे लागेल. समाज आपला आहे, आपण समाजाचे आहोत. समाजात असणारे आपल्याच रक्तामांसाच्या गोतावळ्यातील आहेत. त्यांना असे वाऱ्यावर सोडून चालणार नाही. जे समाजाची अशी दिशाहीन अवस्था पाहून मनातल्या मनात मेणबत्तीसारखे जळतात, अशा मंडळींनी एकत्र आले पाहिजे आणि आपले समविचारी सहकारी जोडले पाहिजेत. समाजात वाईट लोक जास्त असतात आणि चांगले लोक कमी असतात, हे ध्यानात ठेवले पाहिजे.असत्य हे सत्यापुढे जास्त दिवस तग धरीत नसते आणि शेवटी विजय सत्याचाच होत असतो. हे सूत्र लक्षात ठेवून समाजासाठी विधायक कार्याला सुरुवात करावी. अन्यथा बौद्धवस्ती तर झपाट्याने अधोगतीला निघालीच आहे.
सर्वप्रथम एक रजिस्टर घेऊन आपण राहतो त्या वस्तीतील प्रत्येकाच्या घरी जाऊन घरातील लहान मोठ्यांची यादी करावी. याबाबत लोक विचारणा करतील तर त्यांना सांगावे की, संध्याकाळी विहारात या म्हणजे कळेल की, ही यादी कशासाठी आहे. संपूर्ण गावाची अथवा वार्डाची यादी पूर्ण झाल्यावर आपल्याला कळेल की, विद्यार्थी किती आहेत? ते कोणकोणत्या वर्गात आहेत? गावात नोकरवर्ग किती आहे? मजूरवर्ग किती, व्यावसायिक किती आहेत? जमिनजुमल्यावाले सधन किती आहेत? हे सर्व कळेल. सर्व लोक ठरल्या वेळेवर रात्री विहारात आले म्हणजे त्यांना सांगावे की, २४ नोव्हेंबर, १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी शेवटचे भाषण केले होते. त्या भाषणात त्यांनी सांगितले की, प्रत्येक बौद्धाने आपले आद्यकर्तव्य समजून दर रविवारी आपल्या कुटुंबासह बुद्धविहारात गेलेच पाहिजे. डॉ. बाबासाहेबांच्या या आदेशाचे पालन करण्यासाठी तुम्हाला दर रविवारी आपल्या कुटुंबासह बुद्धविहारात आलेच पाहिजे, असे स्पष्ट सांगावे.आणि त्याची सुरुवात आपण स्वतः करावी. पहिल्या रविवारी विशेष असा प्रतिसाद मिळणार नाही, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या रविवारपासून बुद्धविहारात येणाऱ्यांची संख्या वाढेल आणि पाहता पाहता एक दिवस विहार तुडुंब भरून जाईल.ज्या दिवशी असे होईल, त्या दिवशी बुद्धविहारातून लहान मुलांसाठी धम्मसंस्कार वर्ग चालविणे किती गरजेचे आहे, हे उपस्थितांना पटवून द्यावे.आणि आपल्या मुला-मुलींना दररोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत बुद्धविहारात पाठविण्यासाठी सूचना द्याव्यात.
आपल्याकडे यादी असतेच त्यातून ४ थी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या दिवशी पासून धम्मसंस्कार वर्ग सुरू करावा. या एका तासाच्या धम्मसंस्कार वर्गाने मुलांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही.उलट अभ्यास करण्यासाठी लागणारी एकाग्रता त्यांना धम्मसंस्कार वर्गातून शिकविल्या जाणाऱ्या आनापान शिक्षणातून मिळेल.त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा मानसिक, बौद्धिक आणि वैचारिक विकाससुद्धा धम्मसंस्कार वर्गातून होईल. विद्यार्थी वर्ग सतत बुद्धविहारात येत राहिल्याने त्यांच्यात बुद्धविहाराप्रती श्रद्धा वाढीस लागेल आणि हे काम सर्वात महत्त्वाचे होईल. त्याचप्रमाणे त्यांच्यात एकमेकांप्रती मैत्री दृढ होईल.पर्यायाने त्यांच्यात संघटनशक्ती निर्माण होईल.
धम्मशिक्षणाबरोबरच महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करीत राहिल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडून त्यातून उमदे वक्ते निर्माण होतील. दररोज बुद्धधम्माची माहिती सुद्धा त्यांना मिळत राहील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघायनाने त्यांची पूजा-वंदना सुद्धा लवकर पाठ होईल. त्याचप्रमाणे लोकसुद्धा दर रविवारी बुद्धविहारात येत राहिल्याने त्यांचे आपसी मतभेद, गैरसमज निवळण्यास फार मोलाची मदत होईल.असे झाले की, त्यांचे चित्त निर्मळ झाले की मैत्री भावना वाढीस लागेल. मैत्री भावना वाढीस लागली की, संघटनशक्ती आपोआप मजबूत होते. हाच मंत्र तथागतांनी वज्जी लोकांना दिला होता, म्हणून त्यांचे राज्य एक आदर्श राज्य होते. त्यांच्या राज्यात सुख, समाधान, समृद्धी, वैभव आणि आनंद ओसंडून वाहत होता. तो मंत्र असा, ज्या गावचे लोक सतत एका ठिकाणी येतात त्याच गावाची उन्नती होते, हानी कधी होतच नाही.ज्या गावचे लोक सतत एका ठिकाणी येऊन सतत परिषदा घेतात त्याच गावाची उन्नती होते, हानी कधी होतच नाही.ज्या गावचे लोक आपल्या हितासाठी, कल्याणासाठी, मंगलासाठी आणि रक्षणासाठी एक नियम बनवितात आणि त्याच नियमाने मार्गक्रमण करतात त्याच गावाची उन्नती होते, हानी कधी होतच नाही.ज्या गावचे लोक आपल्या गावातील वयोवृद्धांचा आदर करतात आणि त्यांचे मार्गदर्शनाखाली आपला जीवनक्रम चालवितात त्याच गावाची उन्नती होते, हानी कधी होतच नाही.
ज्या गावचे लोक आपल्या गावातील कुलीन स्त्रियांचे रक्षण करतात, त्यांचे सतीत्व नष्ट करीत नाहीत, त्याच गावाची उन्नती होते, हानी कधी होतच नाही. ज्या गावचे लोक आपल्या गावातील लहान मुलांवर धम्माचे योग्य संस्कार टाकतात, त्यांना धम्ममय मार्गावर जीवन जगण्याची कला शिकवितात त्याच गावाची उन्नती होते, हानी कधी होतच नाही. ज्या गावचे लोक आपला धम्म टिकवून ठेवतात त्याच गावाची उन्नती होते, हानी कधी होतच नाही.ज्या गावचे लोक आपल्या गावात येणाऱ्या श्रमणांचा, संतांचा आदर करतात, त्यांना मानतात, त्यांना पूजतात, त्यांना दान देऊन संतुष्ट करतात, त्याच गावाची उन्नती होते, हानी कधी होतच नाही. आणि ज्या गावचे आपल्या चैत्यांची पूजा करतात त्याच गावाची उन्नती होते, हानी कधी होतच नाही. तथागतांच्या या उपदेशाची ज्या गावाने आजही अंमलबजावणी केली ते गाव, ते शहर, ते महानगर आजही वज्जी लोकांसारखे सुखासमाधानाने नांदू शकते. कारण बुद्धवचन हे त्रिकाल सत्य असते.
इतके करूनही काही लोक बुद्धविहारात येणार नाहीत किंवा आपल्या मुलांनासुद्धा धम्मसंस्कार वर्गाला पाठविणार नाहीत, असे लोक ग्रामीण भागातही असतात आणि शहरी भागासुद्धा असतात. मग सर्वानुमते अशा लोकांसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. ते विहारात येत नसल्याने त्यांना काही येत नसते.मग त्यांच्या घरी कुठला संस्कारविधी असेल अथवा अन्य धाम्मिक कार्यक्रम असेल तर तिकडे कुणी जाऊच नये.सार्वजनिक कामासाठी किंवा धाम्मिक कामासाठी त्यांच्याकडून कुठली वर्गणीच घेऊ नये.त्यांच्याशी जास्तीचा सामाजिक संबंधच ठेवू नये. त्यांना कुठल्याच कार्यक्रमामध्ये मानपान देऊ नये.असे केल्याने एक ना एक दिवस ते भानावर येतील. समाजाची क्षमा मागून समाजात मिसळण्याचा प्रयत्न करतील. मग त्यांना आपल्यात सामील करून घेण्यास काही एक हरकत नाही. हा उपाय बऱ्याच गावातून यशस्वी झाला आहे आणि जेथे तो यशस्वी झाला, ते गाव खऱ्या अर्थाने संघटित होऊन धम्ममार्गावर आरूढ झाले आहे.
- भन्ते अश्वजित
- मो. ९६७३२९२२९७
- सं.: दै. सम्राट