पांढरेशुभ्र दात हळूहळू पिवळे पडू लागतात, काळपट दिसू लागतात. यामुळे आपण फार अस्वस्थ होतो. योग्य काळजी घेतली नाही तर दातांच्या रंगावर परिणाम होऊ लागतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे असं होऊ शकतं. अनेक कारणांमुळे दात पिवळे पडतात. अशाच काही कारणांविषयी जाणून घेऊन आपण दातांचं आरोग्य टिकवून ठेऊ शकतो.
सफरचंद, बटाटे, शीतपेय, चहा, कॉफी आणि मद्यामुळे दातांच्या नैसर्गिक रंगावर परिणाम होतो. या पदार्थांमुळे तोंडातली पीएचची पातळी बिघडते आणि दातांवर डाग पडू लागतात.
तोंड आणि दातांशी संबंधित विकारांमुळे आणि त्यावरच्या उपचारांमुळे दातांचा रंग उडू शकतो. गरोदर स्त्रीला जंतूसंसर्गाची लागण झाली तर तिच्या होणार्या बाळाच्या दातांच्या रंगावर याचा परिणाम होऊ शकतो. रेडिएशन, केमोसारख्या उपचारांमुळे दातांच्या रंगावर परिणाम होतो.
दातांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवायचा असेल तर दातांची, तोंडाची योग्य ती काळजी घ्यायला हवी. दररोज दोन वेळा दात घासायला हवेत. खाल्ल्यानंतर चूळ भरायला हवी. दातांच्या पोकळ्यांमध्ये अन्नकण साठू लागल्याने दात पिवळे पडतात आणि त्यांची झीज होते. फ्लोराइडचं प्रमाण जास्त असलेली टूथपेस्ट किंवा पाण्याचा वापर केल्याने दातांचा पांढरा रंग फिका होऊ लागतो. यामुळे फ्लोरोसिस नावाचा विकार होतो. या विकारामुळे दात पिवळट करडे दिसू लागतात. त्यांची झीज होते.
या विकारात दातांवर पांढरट डाग पडतात. औषधांमुळेही दातांवर परिणाम होतो. बेनेड्रिल, प्रतिजैविकं आणि उच्च रक्तदाबावरच्या साध्या औषधांमुळे दात पिवळे पडतात. आयर्न सिरप आणि माउथवॉशमध्ये असलेल्या घातक रसायनांमुळे दातांवर डाग पडतात. वय वाढलं की दात पिवळे पडू लागतात. वाढतं वय दातांवर परिणाम करू लागतं. वाढत्या वयात दातांवरच्या एनामिलचा थर कमी होतो. धूम्रपान आणि मद्यपान करणार्या ज्येष्ठ नागरिकांना दात पिवळे पडण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. तोंडातल्या लाळेमुळे कोणत्याही जंतूसंसर्गापासून संरक्षण मिळतं. लाळेमुळे तोंडातल्या पीएचची पातळीही नियंत्रणात राहते. आजार किंवा जंतूसंसर्गामुळे लाळेची निर्मिती कमी प्रमाणात होत असेल तर दातांवर डाग पडू शकतात. जीवनशैलीत काही बदल करून तसंच तोंडाचं आरोग्य राखून दातांवरच्या डागांची समस्या कमी करता येऊ शकते.