अमरावती : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत तिवसा शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेस मंजुरी प्राप्त झाली आहे. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अथक प्रयत्नाने या 19 कोटी पाच लक्ष रुपयांच्या महत्वाकांक्षी व बहुप्रतिक्षित योजनेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल तत्वतः मंजुरी प्रदान केली .
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत काल नगरविकास विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली, त्याला पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून उपस्थिती लावली. नियोजन, वित्त,जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव, मजीप्रा सदस्य सचिव, संचालक नगर पालिका प्रशासन, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मजीप्राच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, नगराध्यक्ष वैभव वानखडे, मुख्याधिकारी डॉ पल्लवी सोटे या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत तिवसा शहरासाठीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली आहे. या योजनेच्या मंजुरीमुळे तिवसा शहराचा अनेक वर्षांपासून असलेला पाणी टंचाईचा प्रश्न निकाली निघणार आहे. तिवसा शहरातील नागरिकांना दररोज पाणीपुरवठा होण्याचा मार्ग सुकर झाला आहे, असे समाधान पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केले.
तिवसा शहराला नियमित पाणी पुरवठा व्हावा, पाणी पुरवठा संदर्भातील प्रश्न कायमचा मार्गी लागावा यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने तिवसा शहराला नवीन पाणी पुरवठा योजनेतून रोज पाणीपुरवठा होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
Related Stories
November 28, 2023
November 27, 2023
November 27, 2023