समाज जागृती व समाज परिवर्तनाचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणजे वृत्तपत्र .लोकांवर होणा-या अन्याय-अत्याचाराला वाचा फोडणे व जनतेला आपल्या हक्कांची जाणीव करून देण्याचे काम वृत्तपत्रे करीत आहेत. वृत्तपत्रांमुळे ज्ञान, माहिती, रंजन व प्रबोधन होते. ते लोकशाहीचा चौथा खांब आहे.कोणत्याही चळवळीमध्ये वर्तमानपत्रे खूप महत्त्वाची भूमिका फार पाडीत असतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या निश्चित भुमिकेतूनच पत्रकारितेकडे वळले होते. १९१७ साली विविध जाती जमातींच्या मतदानाच्या अधिकारांच्या संदर्भात काही कर्त्या व्यक्तींच्या साक्षी काढण्यासाठी शासनाने साऊथबरो कमिशन नेमले होते. या कमिशनच्या निमित्ताने अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी झगडण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यांना अस्पृश्यांचे म्हणणे जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी आपल्याजवळ नेहमीसाठी एखादे साधन असावे असे वाटले. ”पंखाशिवाय जसा पक्षी त्याप्रमाणे समाजात विचार प्रवृत्त करण्यासाठी वृत्तपत्राची गरज असते”, हेही त्यांना तीव्रपणे जाणवत होते आणि उपलब्ध वृत्तपत्रे तर विशिष्ट जातींचीच चाकरी करणारी, अस्पृश्यांवर अन्यायच बहुतांशी करणारी होती. याचा अर्थ वृत्तपत्राविना अस्पृश्य समाज अनाथ होता. त्यांच्याजवळ विलक्षण अशा करुण कहाण्या होत्या. म्हणून या मूक समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी एखाद्या प्रकाशनपीठाची गरज होती. या गरजेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारितेकडे वळले.
बहिष्कृत वर्गाच्या लोकांना जर त्यांना संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी मिळाले नाही, तर त्यांच्या उन्नतीची इतिश्री झाली असेच समजावे. कारण ब्रिटिश सरकारचे नि:पक्षपाती धोरण आमच्या वरिष्ठ समाजाकडून ठरवले जाईल, इतकी त्यांची मनोभूमिका शुद्ध व सात्विक बनलेली नाही. हा घोर प्रसंग टाळावयाचा असेल तर, आतापासूनच चळवळीला सुरुवात केली पाहिजे या विचारांनी बाबासाहेब प्रेरीत होते.
बाबासाहेब हे सव्यसाची पत्रकार होते. सामाजिक प्रबोधन आणि सामाजिक न्याय ह्या तत्वांचा पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी आग्रह धरलेला होता. त्यांची सर्व पत्रे याच ध्येयवादाने भारलेली होती. नैतिकता हा तर त्यांनी वृत्तपत्रसृष्टीचा कणाच मानला होता. वृत्तपत्र हे जर जनकल्याणाचे साधन असेल तर मग पीत पत्रकारिता ही निषेधार्हच मानली पाहिजे.
महाराष्ट्रात एक ध्येयशील पत्रकारितेची परंपरा आहे आणि म्हणून व्यथित अंत:करणाने पण परखडपणे आपल्या ध्येयापासून वंचित होणाऱ्या पत्रांना त्यांनी आपल्या मूळ बैठकांची जाणीव दिली. वृत्तपत्रांनी आचारसंहिता पाळली नाही आणि तंत्र स्वैर असले तर अज्ञजन रानभेरी होतील असे त्यांना वाटत होते.
भडक, विकृत आणि भावनांना आवाहन करणारे लेख लोकमानस घडवू शकणार नाहीत. लोकजीवनाला नवे परिणाम देऊ शकणार नाही, अशी त्यांची खात्री होती. वृत्तपत्राचा खप वाढणे म्हणजे लोकमनाला संस्कारित करणारी विधायकता नव्हे. नि:पक्षपातीपणाचा अभाव आणि न्यायोचित लेाककल्याणाच्या विचारांशी फारकत, लोकमनाची व लोकमताची अविकृत जडणघडण करु शकत नाही, असा त्यांचा ठाम विचार होता वृत्तपत्र हे शोषणाचे माध्यम बनविणाऱ्या प्रवृत्तींना त्यांनी धारेवर धरले.
बाबासाहेबांच्या मते व्यक्तिपूजा ही भारतातील अनेक पत्रांना लागलेली कीड आहे. व्यक्तिपूजा आंधळी असते. त्यामुळे नितिमत्ता ढळते ; म्हणून वृत्तपत्रांनी नितीमत्तेला बाधा येणार नाही आणि सत्यापलाचा सूर बदलणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे. वृत्तपत्र प्रपंच म्हणजे नितिमत्तेचा प्रपंच अशी त्यांची धारणा होती. ‘ जाहिराती शिवाय वृत्तपत्रे जगू शकत नाही, हे खरे असले तरी वृत्तपत्रांनी जाहिरातीच्या आहारी जावे का ? आणि कितपत जावे ? आर्थिक सवलतीसाठी जाहिराती आवश्यक असल्या तरी कोणत्या जाहिराती प्रकाशित कराव्यात यासंबंधीची संहिता पाहायला हवी, ‘ असे ते म्हणत. जाहिरातीची उद्दिष्टे आणि जाहिरात करण्याची पद्धती यात विरोध निर्माण झाला की, जाहिराती करण्यामागील तत्व भ्रष्ट होते असा त्यांचा दावा असे. जाहिरात आणि नितिमत्ता यांचा अन्योन्य संबंध बाबासाहेबांना अपरिहार्य वाटे. समाज उन्नतीचे साधन म्हणून त्यांनी वृत्तपत्राकडे पाहिले. लौकिक ऋण फेडण्यासाठी त्यांनी वृत्तपत्राचा प्रभावीपणे वापर केला.
आजच्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या कमी जाहिरातीच जास्त असल्याचे दिसून येईल.जाहिरातीच्या माध्यमातून मिळकत हे आजच्या वृत्तपत्राचे। वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल.जाहिरात कोणती व किती असावी..हा ही प्रश्न तितकाच महत्वाचा.आज वर्तमान पत्रांमधील जाहिराती बघितल्या तर डोळे मिटल्या शिवाय राहणार नाही.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून मांडलेले विचार, भूमिका आजही तंतोतंत लागू पडते, यावरुनच त्यांची दूरदृष्टी आणि विचारांची खोली दिसून येते.
डॉ. आंबेडकर यांच्या मते, कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्रांची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते. हे गृहीत धरून दीनदुबळय़ांचा आवाज शासन व जनतेपर्यंत पोहोचविणे हा मूळ उद्देश डोळ्यांसमोर ठेवून समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी त्यांनी ३१ जानेवारी, १९२० रोजी ‘मूकनायक’ या साप्ताहिक वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित केला. या वृत्तपत्रासाठी राजश्री शाहू महाराज यांनी अडीज हजार रुपयांचे आíथक सहकार्य केले होते. या पत्रातून त्यांनी प्रथमच पददलितांच्या समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. याचे काही अंक निघाल्यानंतर ते उच्चशिक्षणासाठी लंडनला गेल्यावर त्याची धुरा भटकर व घोलप यांनी वाहिली. पण लवकरच ते बंदही पडले. परदेशात उच्चशिक्षण घेऊन भारतात परतल्यावर त्यांनी ३ एप्रिल १९२७ रोजी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केले. २९ जून १९२८ रोजी ‘समता’ हे पत्र सुरू केले. या वृत्तपत्राचा मूळ उद्देश समाज सुधारणा होता. त्यांनी समता वृत्तपत्राचे संपादक म्हणून देवराम नाईक यांची नियुक्ती केली होती. २४ नोव्हेंबर १९३० रोजी जनता वृत्तपत्र सुरू केले. यात मूलभूत प्रश्न व विलायतेहून पाठविलेली पत्रे प्रकाशित केली होती. मात्र याचे काम पंचवीस वष्रे चालले. त्यानंतर ४ फेब्रुवारी १९५६ रोजी नावात बदल करून प्रबुद्ध भारत असे केले. या अंकाच्या पहिल्या पानावर अखिल भारतीय दलित फेडरेशनचे मुखपत्र छापले होते. डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर हे पाक्षिक बंद पडले असले तरी त्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. इतके महान कार्य बाबासाहेबांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून केले आहे. सर्व अंकातील लेखांचा विचार केल्यास लेख अधिक धारधार व आक्रमक आहेत.
आजच्या पत्रकारितेचं स्वरूपच एकंदर बदलले आहे.आज पत्रकारितेला व्यवसायाचं स्वरूप आलं आहे.बातम्या कमी जाहिराती जास्त.चाळीस टक्के बातम्या वंतर साठ टक्के जाहिराती अस एकंदर जाहिरातीचं चित्र आज वर्तमान पत्रांमधून बघायला मिळते.वर्तमान पत्रांची किंमत कमी असल्यामुळे व कागद महाग असल्यामुळे वर्तमानपत्र छापणे अशक्य होतं असल्याची ओरड संपादक करतात.हे सत्य असलं तरी आज वर्तमान पात्रांना बाजारू स्वरूप आल्याचं नको त्या जाहिराती छापून वर्तमान पत्रे अमाप पैसा कमवित आहे.त्यामुळे वृत्तपत्रांचा दर्जा खालावत आहे.स्वतंत्र व निःपक्षप बाण्याचे वृत्तपत्र अशी शेकी वृत्तपत्रांचे संपादक मिरवीत असले तरी आज कुठलेच वृत्तपत्र स्वतंत्र, नि:पक्ष व पारदर्शी नाही.वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यां या सखोल नसतात, वरवरच्या असतात.ग्रामीण भागापेक्षा शहरी भागांना जास्त प्राधान्य आजचे इलेक्ट्रॉनिक मीडिया देत असल्याचे दिसून येते.वृत्तपत्रांचे काम लोकजागृती व लोकशिक्षण व प्रबोधन मात्र आजच्या पत्रकारिता ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करणारी आहे.ग्रामीण भागातील अन्याय व अत्याचाराच्या बातम्या चव्हाट्यावर येत नाही.मुद्रित माध्यमे शहरी भागांना जास्त प्राधान्य देत असल्यामुळे ग्रामीन भाग दुर्लक्षित राहतो.शहरी व ग्रामीण भाग अशा प्रकारचा दुजाभाव आजच्या पत्रकारितेत बघायला मिळतो.प्रेस मीडिया व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आपला टीआरपी वाढवा म्हणून एकच बातमी वारंवार दाखवितात.
शोध पत्रकारिता आजच्या पत्रकारितेच महत्वाचं वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल.शोध पत्रकारितेमुळे अनेक प्रकरणे उघडकीस आली असली तरी या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करण्याचे अनेक प्रकार समोर आलेली आहेत. डिझायनर पत्रकारांची संख्या आज मोठया प्रमाणात वाढल्यामुळे आजची पत्रकारिता पेंड न्यूज मध्ये अडकल्याची दिसून येते.मराठी वृत्तपत्रांसह अन्य भाषेतील वृत्तपत्रे पेंड न्यूज मुळे बदनाम झाली आहेत.त्यामुळे वृत्तपत्रांच्या विश्वसार्हतेवर प्रश्न निर्माण झाला आहे.
आजची वृत्तपत्रे किती निर्भीड व नि:पक्ष आहेत,काय.. हाही प्रश्न तितकाच महत्वाचा वाटतो.वृत्तपत्रांमधील बातम्यांचा संबंध जसा अर्थकारणाशी जोडला जातो तसाच संबंध वयक्तिक संबंधाशी जोडला जातो.यासाठी विदर्भात घडलेल्या दोन वृत्तपत्रांच्या संपादकांच्या प्रकरणाचा इथं उल्लेख करणे अत्यंत गरजेचे आहे.विदर्भातील हि दोन्ही वृत्तपत्रे मोठी आहेत.एका वृत्तपत्र संपादकांवर हत्येचा आरोप होता तर दुसऱ्या संपादकांच्या शाळेतील लैंगीक अत्याचारांचे प्रकरण होते.विदर्भातील एक दोन वृत्तपत्रांनी या बातम्या समोर आणल्या.मात्र बाकीच्या वृत्तपत्रांनी या दोन्ही घटनांची दखल पण घेतली नाही.ज्या वृत्तपत्रांनी आधी बातम्या दिल्या नंतर त्या वृत्तपत्रांनी या प्रकानांकडे पूर्णपणे डोळेझाक केले.नंतर या दोन्ही संपादकांच्या बातम्या प्रकाशित झाल्याचं नाही.यापार्श्वभूमीवर आजची वृत्तपत्रे खरंच निपक्ष ,निर्भिड व विश्वासार्स आहेत काय….? असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही. निर्भीड, निःपक्षपातीपणा व विश्वसार्हता ही कालच्या (प्राचीन वृत्तपत्रांची ) ओळख होती.मात्र आजच्या वृत्तपत्रांनी ही विश्वसार्हता गमावली असं खेदाने म्हणावे लागते.
एकंदरीत, वृत्तपत्रे किती निर्भीड, किती स्वतंत्र व निरपेक्ष आहे यावर त्या वृत्तपत्राची विश्वसनीयता टिकून राहते.हे सत्य च आहे.आजची वर्तमानपत्रे किती निःपक्षपाती आहे, हे वाचकांनी म्हणजेच समाजानेच ठरवायचे आहे.वृत्तपत्रांच्या निःपक्षपाती पणावर टीका होत असली तरी वृत्तपत्र हे समाजमानाचे दर्पण आहे, वृत्तपत्रांना समाजमन कळते,लोकांना जागृत व शिक्षित करण्यासह लोकांमध्ये मनोधैर्य वाढविण्याचे कार्य वृत्तपत्रे करतात.वृत्तपत्र हे अभिव्यक्तीचं एक सशक्त माध्यम असल्यामुळे लोकशाहीत वृत्तपत्रांची मुस्कटदाबी होता कामा नये.
- -प्रा डॉ सुधीर अग्रवाल
- सेठ केसरीमल पोरवाल
- महाविद्यालय,कामठी नागपूर
- भ्रमणध्वनी : ९५६१५९४३०६