अमरावती :जिल्ह्यातील 14 तालुक्यांत 537 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज विविध तालुक्यांतील मतमोजणी केंद्रावर सुरळीत पूर्ण पडली, अशी माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली. कोरोना साथ लक्षात घेऊन मतमोजणी केंद्रांवर पुरेशी दक्षता घेण्यात आली. त्याचप्रमाणे, कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रतिबंधात्मक आदेशही जारी करण्यात आला होता. आज सकाळी 10 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीदरम्यान फेरमतमोजणी करण्याबाबत जिल्ह्यात एकूण 15 अर्ज प्राप्त झाले होते. त्यात धामणगाव तालुक्यातून पाच, वरूडमधून चार, अंजनगाव सुर्जी तालुक्यातून तीन व अचलपूर, चांदूर बाजार आणि भातकुली तालुक्यातून प्रत्येकी 1 याप्रमाणे अर्ज प्राप्त झाले. त्यानुसार 15 ठिकाणी फेरमतमोजणी झाली व निकाल जाहीर झाला, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार यांनी दिली.
जिल्ह्यातील 553 ग्रामपंचायतींपैकी 537 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासाठी निवडणूक झाली. जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायती यापूर्वीच पूर्णत: बिनविरोध झाल्या व तीन ग्रामपंचायतींत एकूण जागांपैकी काही जागांसाठी वैध नामनिर्देशन पत्र प्राप्त न झाल्याने, तसेच तेथील उर्वरित जागा बिनविरोध झाल्याने तिथे निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे एकूण 477 जागा बिनविरोध झाल्या आहेत.
उर्वरित 537 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण मतदानाची टक्केवारी 75.05 इतकी होती. आज झालेल्या मतमोजणीनुसार 4 हजार 397 सदस्य निवडून आले. याबाबतची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने 21 तारखेला प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही श्रीमती पवार यांनी सांगितले.
Related Stories
October 9, 2024