क्षय अथवा टीबी हा अतिशय गंभीर आजार असून भारतात दर दिवशी ४0 हजारांपेक्षा अधिक लोकांना याचा संसर्ग होतो हे वास्तव भयावह आहे. यापैकी पाच हजारांहून अधिक लोकांनी क्षयाची लागण होते असं एका आकडेवारीवरुन दिसून येतं. क्षयाने मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण दर दीड मिनिटाला एक रूग्ण असं आहे.
जागतिक आरोग्य संस्थेच्या अंदाजानुसार २0२0 मध्ये जगातील अंदाजे एक अब्ज जनसंख्या क्षयरोगाने ग्रस्त असेल. १९९२ मध्ये शासनस्तरावर राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला असून २00५ पर्यंत हा कार्यक्रम संपूर्ण देशात राबवण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. १८८२ मध्ये डॉ. रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जवाणूंचा शोध लावला. जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत या संबंधीचा प्रबंध मांडला आणि २४ मार्च रोजी त्याला मान्यता मिळाली. म्हणूनच दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो. क्षयरोग (टीबी) झालेला रुग्ण बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे त्या निरोगी व्यक्तीलाही क्षय जंतूचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना लगेचच क्षयरोगाची लागण होते.