भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ज्या १0 कुटुंबीयांनी आपली बाळं गमावली, त्यापैकी सर्वात दु:खद कहाणी भानारकर कुटुंबाची आहे. हिरालाल आणि हिरकन्या भानारकर यांचे १४ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तेव्हापासून दोघांनी त्यांच्या घरी मूल जन्माला येईल, असे स्वप्न पाहिले होते. मात्र, चारवेळा गरोदर राहून देखील हिरकन्या कधीच जिवंत बाळाला जन्म देऊ शकल्या नाहीत. चारही वेळेला त्यांनी मृत बाळाला जन्म दिला.
यंदा वयाच्या ३९ व्या वर्षी त्या पाचव्यांदा गरोदर राहिल्या. यंदा काहीही करून आपला बाळ जगला पाहिजे असा त्यांनी निर्धार केला होता. परिस्थिती गरीब, हातावर पोट असूनही या दाम्पत्याने खाजगी रुग्णालयात उपचार केले. महागडी औषधी घेतली.
त्यानंतर सहा जानेवारीला साकोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात हिरकन्या यांनी गोंडस मुलीला जन्म दिला. पहिल्यांदा त्यांनी जिवंत बाळाला जन्म दिल्याने सर्व आनंदित होते. मात्र जन्माला आलेली मुलगी अवघ्या एक किलो वजनाची होती. परिणामी तिला लगेच भंडार्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील दाखल करण्यात आले.
तिथे ती दोन दिवस राहिली आणि आठ तारखेच्या रात्री लागलेल्या आगीत हिरकन्या आणि हिरालाल यांची मुलगी होरपळून मृत्युमुखी पडली. आधीचे चार वाईट अनुभव गाठीशी असलेल्या हिरकन्या आणि हिरालाल यांनी यंदा त्यांच्या घरी लहान मूल हसेल, खेळेल असे स्वप्न पाहिले होते. मात्र, शासकीय आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारात त्यांनी आपले सर्वस्व गमावले. या वेळेला बाळंतपणाच्या सातव्या महिन्यातच हिरकन्या यांची प्रसूती झाली होती. त्यालाही एक दुर्दैवी घटना कारणीभूत ठरली होती. हिरकन्या यांच्या घरी शौचालय नव्हते. काही दिवसांपूर्वी बाहेर शौचास जाताना त्या पडल्या आणि त्यांच्या गर्भाशयाला मार बसला. त्यामुळे त्यांची प्रसूती लवकर करावी लागली आणि असे दुर्दैव घडले.
Related Stories
December 4, 2023
December 4, 2023