मानवी उत्क्रांतीचा इतिहास अभ्यास करायचं ठरवलं तर असे लक्षात येईल की, एकेकाळी मानवाच्या दोनंच जाती होत्या. त्या दोन जाती म्हणजे नर आणि मादी. याच दोन जातीचे विस्तारीकरण, वर्गीकरण आणि रुढीकरण झाले आणि बहुजन वंचित अशी एक जात आणि अभिजन संचितांची दुसरी जात निर्माण झाली. या वंचितांना मिळणारी वागणूक आणि करावा लागलेला ‘जीवन संघर्ष’ मोगलांच्या राज्यातही होता. शिवशाहीत कमी होतो आहे असे वाटताना पेशवाईत त्याला उभारी मिळाली. इंग्रजांच्या गुलामगिरीतही वंचितांना हाल-आपेष्टाच भोगाव्या लागल्या. अभिजनांनी इंग्रजी पोषाखासह इंग्रजी खाण्या-पिण्याच्या सवयी आत्मसात केल्या. पण स्वकीयांच्यावर होणारे जातीय अत्याचार बंद केले नाहीत. या गुलामगिरीतून भारत देश 1947 साली मुक्त झाला असे इतिहासकार जरी लिहीत आणि सांगत असले तरी परीस्थिती आज एकविसाव्या शतकातही संपूर्ण बदलली आहे असे म्हणणे आणि मानणे धाडसाचे होईल.
गावकुसात राहणारे आणि गावकुसाबाहेर राहणारे असे नवे वर्गीकरण जातिव्यवस्थेने निर्माण केले. गावकुसाबाहेर निर्माण होणारा आक्रोश कधीच गावातल्या चावडीवर बसणाऱ्यांना ऐकू आला नाही. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महामानवाने हा आक्रोश केवळ चावडीवर मांडलाच नाही तर संविधानाच्या रूपाने गावाच्या वेशीवरच कोरून ठेवला. तेव्हापासून त्यांच्या विचारांच्या वारसदारांनी आपापल्या परीने गावकुसाबाहेरचा संघर्ष चावडीवर मांडण्याचा आटोकाट प्रयत्न चालविला आहे. कोणी गीतांच्या माध्यमातून तर कधी मतांच्या माध्यमातून, कोणी कथांच्या माध्यमातून तर कोणी व्यथांच्या माध्यमातून, कोणी चित्रांच्या माध्यमातून तर कोणी मित्रांच्या माध्यमातून हा संघर्ष गावकुसात आणत गेले. असाच एक सुरेख, सहज आणि सुलभ प्रयत्न यशस्वीपणे पेलला आहे नवनाथ रणखांबे नावाच्या एका भीमसैनिकांने. नवनाथ रणखांबे यांनी त्यांच्या मनातल्या वेदनांना ‘जीवन संघर्ष’ नावाच्या एका काव्यसंग्रहाच्या रूपाने वाट मोकळी करून दिली आहे.
सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील गौरगाव नावाच्या एका खेड्यात जन्म आणि बालपण गेलेल्या नवनाथने मुंबईतल्या मायानगरीत जीवन संघर्ष केला आणि त्यातूनच निर्माण झालेली काव्यप्रतिभा शब्दात उतरली आहे. आपल्या पहिल्याच ‘ऋण’ नावाच्या कवितेची सुरुवात करताना ते म्हणतात, “जीवनाला माझ्या आभाळाची माया…” आणि शेवट करताना म्हणतात “सांगा मी फेडू कसे?… न फिटणारे ऋण असे…” आभाळाच्या मायेने समृद्ध झालेले जीवन फुलाला, फळाला आले ते केवळ बुद्धांच्या तत्वज्ञानी शिकवणीमुळे. या शिकवणीचा उपकार झाला आहे, ते ऋण माझ्यावर आहे आणि त्यातून ते ऋण फीटणार कसे? याची विवंचना नवनाथ करतो आहे. ‘माय तुला मी पाहिले’ नावाच्या कवितेच्या वाचनानंतर बहिणाबाईच्या “अरे खोप्यामध्ये खोपा, खोपा सुगरणीचा चांगला” या कवितेची आठवण झाल्याविना राहत नाही. ‘तुझी काया मोलमजुरीने दररोज झिजत होती…, गरीबीची श्रीमंत स्वप्ने कष्टातून फुलली होती…’ या शब्दातून मांडलेल्या वेदना आणि त्या वेदनातुन उमलणारा नवा आशावाद प्रकटतो आहे. ‘मानवतेला डाग’ नावाच्या कवितेत नवनाथ लिहितो ‘समाज व्यवस्थेला तडा, रक्ताच्या सड्यांनी राडा’. शोषण ही बाब किती क्रूरपणे मानवतेला डाग लावते आहे याचे भान विसाव्या शतकातही अनेकवेळा आले होते. पण त्या पूर्वीच्या किती पिढ्या? किती शतके? यात भरडली गेली याची गणती कोणी आणि कशी करायची? हा सरळ आणि साधा प्रश्न कवीला शांत बसू देत नाही. अनेक ठिकाणी त्यांच्या शब्दांना धार आल्याची आणि साळसूदपणाची धुळ फेकून वास्तवाला सरळ सरळ भिडण्याची भाषा निर्माण झाली आहे. वेदनेला संस्कार, संहार, शृंगार आणि लज्जा यांचा स्पर्श होत नाही. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जी व्यक्त होते ती वेदना मानवी हृदयाचा ठाव घेते. ‘दाहकता’ नावाच्या कवितेत कवी लिहितो ‘दिवसाढवळ्या मानवतेची नग्न धिंड…, हसतात बलात्कारी हैवानी षंढ’. शब्दांच्या फुलोऱ्यात अडकून प्रतिभेचा बाजार मांडणाऱ्या कवींना बाजूला सारून वास्तवाची दाहकता कोणत्या पातळीवरची असते याची कल्पना नवनाथच्या अनेक रचनातून साकारली आहे. हे कार्य करताना काव्यशास्त्र, प्रतिमा, प्रतीके, प्रतिभा यांची कोणतीही प्रलोभने कवीला आकृष्ट करू शकले नाहीत. ‘दलित’ या शब्दालाच जाळण्याची भाषा कवीच्या तोंडी येताना पाहून त्यांना पूर्वजांचा इतिहास आणि संघर्ष विसरायचा नाही.
अनेक काव्यसंमेलनातून आणि सभातून आपल्या बहारदार काव्यरचना सादर करणार्या नवनाथ रणखांबे यांच्या या काव्यसंग्रहाला दामोदर मोरे यांनी ब्लर्ब लिहिला असून या कल्याणच्या साकेत महाविद्यालयातील डॉ. शहाजी कांबळे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. पर्यावरण, निसर्ग, पाऊस, दुष्काळ यासारख्या निसर्गनिर्मित संकटानाही शब्दात बांधणाऱ्या नवनाथने अर्पण पत्रिका मोठी केली असली तरी जिद्द आणि चिकाटीचे प्रेरणास्थान असणाऱ्या फीनिक्स पक्षाला केलेले अर्पण वाचकांचे मन हेलावणारे आहे. अशा पद्धतीचा अर्पणविचार मी तरी प्रथमच पाहतो आहे. काव्यसंग्रहाच्या शेवटी सिताराम गायकवाड या ‘दलित मित्र’ आणि ’शाहू-फुले-आंबेडकर’ पुरस्काराचे मानकरी याने मारलेली कौतुकाची थाप, बौद्ध साहित्य परिषदेचे अध्यक्ष शुक्राचार्य गायकवाड यांचे गौरवोद्गार, संजय थोरात, डी. एल. कांबळे यांच्या शुभेच्छामुळे कवीच्या व्यक्तिगत कक्षा अधिक समर्थपणे उलघडल्या गेल्या आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असणारा नावीन्यपूर्ण प्रयोगशीलता हा एक महत्त्वाचा गुण मला भावला. विशेषता त्यांनी नाशिक ते ठाणे या चालत्या बसमध्ये दिनांक 22 जुलै 2018 रोजी सायंकाळी पहिले साहित्य संमेलन घेतले. चालत्या बसमध्ये संमेलन घेणे ही कल्पनाच मुळी कविमन असणाऱ्या माणसाव्यतिरिक्त इतर कोणी करू शकत नाही. याला प्रवासी साहित्य संमेलन म्हणायचे? की हलते, चालते, वाहते साहित्यसंमेलन म्हणायचे? असा मला आजही प्रश्न पडतो आहे. याला पहिले झुलते साहित्य संमेलन म्हणायला हरकत नाही. कारण रस्त्यावरच्या खड्यांनी अनेकांना झुलवले असणार तर कवितेच्या हास्यकल्लोळात अनेकजण झुलत असणार. काहीच झाले नसेल तर सायंकाळचा प्रवास असल्याने तरी काही जण झुलले असणार हे मात्र नक्की. या सर्वांना झुलवणारा कवी नवनाथ रणखांबे यांच्या अनेक साहित्यकृती भविष्यात मराठी वाचकांना झुलवत रहाव्यात याच शुभेच्छा देताना प्रा. संतोष राणे यांच्या शारदा प्रकाशनचेही केवळ 80 रुपयात स्वागत मूल्य ठेवून सुमारे पन्नास कवितांची 80 पाणी काव्यसंग्रह रसिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दलज्ञश ऋण व्यक्त केले पाहिजे.
ता. जत,