अमरावती : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातर्फे ‘सावित्री उत्सव’ साजरा करण्यात आला. ‘सावित्री दिंडी’, व्याख्याने, विविध स्पर्धा, ‘मी सावित्री बोलतेय’चा अप्रतिम एकपात्री प्रयोग असे विविध कार्यक्रम असलेल्या ‘सावित्रीच्या लेकीं’च्या या विचारजागरात अनेक क्षेत्रातील महिलाभगिनी सहभागी झाल्या होत्या.
‘माविम’तर्फे आयोजित या उत्सवाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे होत्या. कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ. प्रणिता कडू, सामाजिक कार्यकर्त्या सुचिता बर्वे, रोजगार व कौशल्य विकास सहायक संचालक प्रफुल्ल शेळके, महापालिका उपायुक्त नरेंद्र वानखडे, महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे आदी उपस्थित होते.
उत्सवाच्या प्रारंभी विचारक्रांतीची मशाल हाती घेऊन सावित्रीमाईच्या नावाचा जयजयकार करत ‘सावित्री दिंडी’ काढण्यात आली. त्यानंतर मयुरी बिसने या विद्यार्थिनीने ‘मी सावित्री बोलतेय’ हा अप्रतिम एकपात्री प्रयोग सादर करून क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या संघर्ष, विचार व जीवनकार्याची ओळख सर्वांना करून दिली. ‘माविम’तर्फे आयोजित राज्यस्तरीय उखाणे स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. उखाणे स्पर्धेतील विजेत्यांनी यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर उखाणे सादर करून उपस्थितांना जिंकून घेतले. विविध खेळ व गीतेही यावेळी सादर करण्यात आले. सावित्रीमाईच्या विचारांचे व जीवनकार्याचे संस्मरण करून देणारा हा उत्सव ‘सावित्रीच्या लेकीं’नी समरसून साजरा केला.
जिल्हा समन्वय अधिकारी श्री. सोसे यांनी सावित्री उत्सव साजरा करण्याची भूमिका विशद केली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विविध मान्यवरांनी महिलांनी रोजगार, स्वयंरोजगाराकडे सक्षमपणे वाटचाल करावी, असे आवाहन केले.
श्रीमती अर्चना खांडेकर यांनी सूत्र संचालन केले. समन्वय अधिकारी राम शाहू सहा, ऋषिकेश घ्यार ,प्रकाश टाके,श्रीमती मिनाक्षी शेंडे, सौरभ गुप्ता, अंजू गणवीर श्री. महाजन, श्रीमती राउत यांनी कार्यक्रम यशस्वितेकरिता परिश्रम घेतले. यावेळी बचत गटातील महिला सदस्य उपस्थित होत्या.
Related Stories
September 14, 2024
September 8, 2024