आज आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही आपण नुकताच साजरा केला आहे. जसजसा काळ बदलला तसतसा जीवन जगण्याच्या पद्धतीत आमुलाग्र बदल व्हायला लागला. संयुक्त कुटुंब पद्धतीत शांततामय आणि आरामात जीवन जगणारा माणूस विभक्त कुटुंब पद्धतीच्या तडाख्यात सापडून कुटूंबाची मुळ चौकटच मोडीत काढायला निघाला. आचारविचार बदलले. माणसाची विचार करण्याची पद्धत बदलायला लागली. जीवन जगण्याची वैचारिक बैठक मोडकळीस आली. संयमाचा बांध फुटायला लागला. समाजाने घालून दिलेले नियम पायदळी तुडवल्या जावू लागले. नव्या कल्पना आणि नव्या विचारांचे वारे सुसाट वेगाने ओसंडून वाहत असताना जुन्या धाटीतील शांत आणि संयमी दिव्याची ज्योत कशी तेवत ठेवावी अशा द्विधा मनस्थितीत असतांनाच संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या अमूल्य विचारांचा ठेवा आठवल्या शिवाय राहत नाही. शेकडो वर्षांपूर्वी विज्ञानवादाचा स्पर्शही जेमतेम झाला असावा अशा वैज्ञानिक दृष्टिकोनाचे देणे देणारा संतश्रेष्ठ सेवालाल बापू स्मृतीत यावा यात नवल ते कोणते? निसर्गवादाचा पुरस्कार करुन निसर्गाच्या समवेत मुक्त जीवन जगण्याचा मंत्र आपल्या समाजाला शिकवणारे निसर्गावर निस्सीम श्रद्धा असणारे संत सेवालाल महाराज न आठवावे असे कधी होणारच नाही.
अशा महान संत सेवालाल महाराजांच्या विचारांची पेरणी करून सकल रान हिरवे करुन हिरवीगार वनराई निर्माण करु पाहणारा गोर शब्द सैनिक म्हणजे खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओचे संचालक आदरणीय एकनाथ गोफणे सर यांच्या बंजारा भाषेतील एका कवितेचा परामर्श घेणे क्रमप्राप्त ठरावे. ज्या कवितेचे शिर्षक आहे. ‘वैचारिक स्फोट घडावा’ इतकी वर्षे लोटल्यानंतर ही ‘जाणजो,छाणजो पचच माणजो’ असा मोलाचा सल्ला आपल्या समाजाला एकूणच मानव जातीला देऊन भविष्यातील धोक्याची पूर्वसूचना देणारा संतश्रेष्ठ विरळाच म्हणावा लागेल.
- कोयी छेनी कम भिया
- कोयी छेनी जादा
- सेवाभाया करगोतो
- एकतारो वादा
वरील कवितेत कवी एकनाथ गोफणे संत सेवालाल महाराजांच्या मौल्यवान विचारांचा ठेवा उलगडून सांगतात. या जगात कोणी कोणापेक्षा कमी नाही, कोणी कोणापेक्षा जास्त नाही. कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. कोणी उच्च निच नाही. आपण सर्व एकसमान आहोत. आपण सर्व एका आईची लेकरे आहोत. आपण सर्व एकाच निसर्गाची निर्मिती आहोत. चेहरा मोहरा जरी वेगवेगळा असला तरी मानवी जीवन जगत असताना निसर्गाची निर्मिती मात्र एक आहे. सर्व समसमान आहे.
पुढे कवी म्हणतात संत सेवालाल महाराज संपूर्ण समाजाला एकत्र राहण्याचा आणि एकसंध राहून जीवन जगण्याचा मंत्र दिला होता. कारण एकतेत बळ असते आणि विखुरलेला समाज एकीची उर्जा निर्माण करु शकत नाही हा मोलाचा संदेश कवी एकनाथ गोफणे सर संत सेवालाल महाराजांच्या वैचारिक साक्षीने देण्यास विसरत नाहीत.
- कोयी छेनी नानकिया
- कोयी छेनी मोठो
- सेरे एक जुगेती
- समाज बढियं आंगं
- पडं कोनी होटो
एकच विचार वेगवेगळ्या शब्द शैलीत वर्णन करण्यात कवीची प्रतिभा मग्न असल्याची साक्ष पदोपदी येते. शब्दांची वेगवेगळी रूपे वापरून महाराजाचे विचार ठामपणे मांडण्यात कवीचा हातखंडा आहे. कोणी कोणापेक्षा लहान नाही, कोणी कोणापेक्षा मोठा नाही. सर्वांनी एकजुटीने राहावे. दिवसेंदिवस समाज, जमाना झपाट्याने बदलत आहे. प्रत्येक समाज आपापल्या समाजाला एकत्र करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. एकीचे बळ मोठे असते. समाजाला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर एकत्र येऊन,एकजुट करुन विकासाचा मार्ग अवलंबावा लागेल. आजच्या स्पर्धेच्या युगात आपण आपल्या समाजाला मागे राहू न देणे ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. हा संत सेवालाल महाराजांचा कृतिशील विचार कवी ठामपणे मांडायला विसरत नाहीत.
- भेदभाव दूर करेरो
- हेतो विचार भायारो
- एक जुगेती संघटन
- करो समाजेरो
लहान मोठा, श्रेष्ठ कनिष्ठ, उच्च निच, स्त्रीपुरूष असा कुठलाही भेदाभेद संत सेवालाल महाराजांना अभिप्रेत नव्हता. समाजाला एकसंध ठेवा. संघटन शक्ती वाढवा. संघटनेत ताकद आणि बळ निर्माण करा. हा विचार संत सेवालाल महाराज सांगून गेले; पण आज आपण पाहतो आहोत त्या विरुद्ध. संतश्रेष्ठ सेवालाल महाराजांचे विचार घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या संघटना हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या बाकी आहेत.एकीचे तोंड पूर्वेला तर दुसरीचे पश्चिमेला अशी आजची समाज संघटनेची वास्तविक स्थिती आहे. याला कुठेतरी विराम मिळावा आणि संत सेवालाल महाराज यांचे विचार संघटनेने अंगी बाणावेत असे कवीला मनोमन वाटत आहे.
- निसर्गैरो विचारच
- सेवाभिया जगो
- माणुसकीरच धागा
- आपणे संविधानेम आवगो
कवी एकनाथ गोफणे संत सेवालाल महाराजांचा निसर्गवादाचा विचार मांडताना म्हणतात स्वच्छंदी निसर्गाप्रमाणे संत सेवालाल महाराज आयुष्यभर जगले आणि समाजाला सुध्दा निसर्गवादी विचारसरणी अंगीकारायला सांगितली. सोबतच ‘सेनं साई वेस’ या मानवतावादी विचाराचा उगम नंतर कालांतराने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान रुपाने जगासमोर मांडला. जीवजंतू, किडा मुंगी, पशुपक्षी, स्त्रीपुरूष,गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव संत सेवालाल महाराजांना मान्य नव्हता. ‘सेनं साई वेस’ या आपल्या प्रेमळ आणि प्रांजळ वाणीने हा विचार जगासमोर मांडला ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. केवढा उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून संत सेवालाल महाराजांनी अखंड मानव जातीचाच नव्हे तर ज्यांच्या ज्यांच्या मध्ये जीव आहे इतकेच नव्हे तर निसर्गवाद समोर ठेवून सुध्दा त्यांच्या त्यांच्यासाठी प्रार्थना केली. हे संत सेवालाल महाराजांचे विचार अगदीच कमी शब्दात कवी एकनाथ गोफणे सर मोठा अर्थ सांगून जातात.
- एकमेकेनं देन हात
- बढावा आंगं
- समाज विघातक शक्तीती
- छेद दा आबं आंगं
आजच्या काळात समाजात अनेक समाज विघातक शक्तींचा शिरकाव, मुक्त संचार चालू झाला आहे. समाजाला एकसंध न ठेवता, तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींना वेळीच आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा समाज विघातक शक्तींशी समोरासमोर येऊन दोन हात करण्याची वेळ आज समाजावर येऊन ठेपली आहे. अशा समाज विघातक शक्तींना आळा घालून समाजाला पुढे नेण्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे असे कवी एकनाथ गोफणे सर जीव तोडून सांगायला विसरत नाहीत.
- बंजारा ये केंद्रबिंदूर
- ताकद आबं बढावा
- गोर,ढाढी,सनार न्हावी
- आसे से बहुजन
- एक जागं आंवा
बंजारा समाजाला केंद्रबिंदू ठेवून या समाजातील ताकद वाढवण्याची गरज आज निर्माण झाली आहे. त्याशिवाय कोणताही पर्याय आज उरलेला नाही. गोर, ढाढी, सनार, न्हावी आणि इतरही अनेक जाती उपजातींनी विभागलेल्या बंजारा समाजाला संत सेवालाल महाराजांच्या श्वेत ध्वजाखाली, एका छताखाली एकत्र येऊन संपूर्ण समाजाची वज्रमूठ बांधण्याची तसेच सर्व बहुजनांना सोबत घेऊन प्रचंड मोठा लढा उभारण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. ही कवीची आंतरिक तळमळ कवीला शांत बसू देत नाही.
- वसंत विचार लेन
- एकतारे ताकतेती
- वैचारिक स्फोट घडावा
- समृद्ध देश बणावा
हरित क्रांतीचे प्रणेते,माजी मुख्यमंत्री, महानायक वसंतरावजी नाईक यांच्या विचारांची एकतेच्या ताकदीची शिदोरी जोडीला घेऊन एकता निर्माण करुयात. एकमेकांची ताकद वाढवून शक्तिशाली, समृद्ध, प्रगतीशील समाज आणि देश घडवण्यासाठी संतश्रेष्ठ सेवालाल महाराजांचा क्रांतिकारी विचारांच्या ठेव्याची खाण उघडून बलशाली बंजारा समाज एकसंध करुन बलवान भारत देश बनवण्याचा मौलिक विचार कवी एकनाथ गोफणे सर कवितेतून मांडतात. म्हणून चला उठा बंधू भगिनींनो निसर्ग वादी, मानवतावादी, विज्ञानवादी आणि क्रांतिकारी संत शिरोमणी सेवालाल महाराजांच्या स्वप्नातील समाज घडविण्यासाठी आपण सारे सान थोर एकत्रित येऊन कामाला लागाल अशी अपेक्षा करुयात. धन्यवाद.!
- -पी के पवार
- सोनाळा बुलढाणा
- भ्रमणध्वनी: ९४२१४९०७३१
- (Images Credit : Jagan Rathod, गुगल वरून)