अमरावती : कोरोना साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामपंचायत निवडणूकीसाठी विविध सुविधा उभारण्याचे निर्देश व मार्गदर्शक सूचना राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली
जिल्ह्यातील 553 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीच्या अनुषंगाने 15 जानेवारीला मतदान होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रचार मोहिमांसाठी, तसेच मतदान केंद्राच्या रचनेसाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार संबंधित अधिका-यांनी कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिका-यांनी दिले आहेत. कोविड-19 च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून उमेदवारांसह पाच लोकांचा गट घरोघरी जाऊन प्रचार करण्याची परवानगी आहे. फेस मास्क, सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक आहे.
मतदान केंद्राची जागा व साहित्य मतदानाच्या एक दिवस आधी सॅनिटाईझ करावे, प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग करावे, मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर मतदान कर्मचारी किंवा पॅरा वैद्यकीय कर्मचारी किंवा आशा कर्मचारी यांच्याद्वारे मतदारांच्या तापमानाची तपासणी करावी आदी निर्देश आयोगाने दिले आहेत.
मतदाराचे तापमान पहिल्या वाचनात निर्धारित निकषापेक्षा जास्त असेल तर दोनदा तपासूनही कायम राहिल्यास त्या मतदाराला टोकन दिले जावे व मतदान संपण्याच्या वेळेच्या अर्धा तास अगोदर मतदानासाठी येण्यास सांगावे. त्यांच्यासाठी विलगीकरण कक्षही असेल. मतदान संपेपर्यंत कोविड-19 शी संबंधित प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोरपणे पालन करून मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रथम येणा-या मतदारांना टोकन वाटण्यासाठी हेल्प डेस्कची व्यवस्था करावी जेणेकरून मतदारांना रांगेत थांबावे लागणार नाही. सामाजिक अंतर राखण्यासाठी रांगेत ठराविक अंतरावर उभे राहण्यासाठी जागा वर्तुळ काढून चिन्हांकित करावी. जागेच्या उपलब्धतेनुसार रांगेत उभ्या असलेल्या मतदारांसाठी किमान दोन फूट अंतरावर 15 ते 20 व्यक्तींसाठी इअरमार्किंग सर्कल तयार करावीत. पुरुष, महिला व दिव्यांग, गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी प्रत्येकी तीन रांगा असाव्यात. सोशल डिस्टन्स पाळले जावे म्हणून बीएलओ, स्वयंसेवकांच्या सेवा घ्याव्यात, असेही निर्देश आहेत.
मतदारांना सुरक्षितरीत्या मतदान करण्यासाठी मतदान केंद्राच्या आवारात सावलीची, तसेच प्रतीक्षेसाठी महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करून बसण्यासाठी खुर्च्या व आसनांची व्यवस्था करावी. शक्य असेल तेथे मतदान केंद्रावर बूथ ॲपचा वापर करावा. प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेश किंवा बाहेर जाण्याच्या ठिकाणी सॅनिटायझर, साबण, पाणी आदी व्यवस्था असावी. दर्शनी ठिकाणी कोरोना दक्षतेबाबतचे फलक लावावेत. मतदान केंद्रात मतदान कर्मचारी व मतदान प्रतिनिधी यांची बैठक व्यवस्था अंतर राखून असावी. मतदान किंवा मतमोजणी प्रतिनिधीचे तापमान जादा आढळल्यास राखीव एजंटला काम देण्यात येईल. मतदाराची ओळख पटविण्यासाठी आवश्यकतेनुसार अत्यंत कमी कालावधीसाठी फेसमास्क बाजूला करावा लागेल. सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी मतदान केंद्रातील अधिका-यासमोर एकच मतदार उभा राहू शकेल, असेही मार्गदर्शक सूचनांत नमूद आहे.
मतदार नोंदणीसाठी सही करण्यासाठी व ईव्हीएमचे बटण दाबण्यासाटी मतदारांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था केली जावी. मतदारांच्या वापरासाठी स्पष्ट दिशानिर्देश देऊन सॅनिटायझर ठेवले जावे. विलगीकरण कक्षात ठेवलेल्या कोविड-19 बाधित रूग्णांना आरोग्य पथकाच्या देखरेखीखाली मतदानाची वेळ संपण्याच्या आधी अर्धा तास प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान करता येईल. याबाबतचा समन्वय ठेवण्याची जबाबदारी झोनल ऑफिसरवर टाकण्यात आली आहे. मतदान केंद्रावर कार्यरत अधिकारी व कर्मचा-यांना फेसमास्क, सॅनिटायझर, फेस-शील्डसह ग्लोव्हज् साहित्य देण्याचे निर्देश आहेत.
Related Stories
October 10, 2024