नवी दिल्ली : कोरोनामुळे शाळा बंद.. ऑनलाइन शाळा आहेत पण त्या काही वेळापुरत्या, प्रत्यक्षातील शाळांप्रमाणे जास्त तास सुरू राहत नाही.. लहान मुलांची काय बाबा मज्जाच आहे. असेच वर्क फ्रॉम होम करत असतानाही ऑफिसच्या कामाचा प्रचंड ताण असणार्या प्रत्येक मोठ्या व्यक्तीला वाटत असावे. पण कोरोनाच्या महासाथीत चिमुकल्या मुलांची नेमकी काय अवस्था आहे, हे युनिसेफच्या अहवालातून स्पष्ट होते. कोरोना महासाथीचा चिमुरड्यांवर गंभीर परिणाम होत असल्याचे आढळून आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
कोरोनामुळे जगभरात अनेक घटकांवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा थेट परिणाम जसा शारीरिक आरोग्यावर होत आहे, तसाच काहीसा परिणाम मानसिक आरोग्यावरदेखील होत आहे. कोरोना महासाथीचा भारतातील मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम झाल्याचे युनिसेफने स्पष्ट केले आहे. शाळा बंद झाल्याने मुलांना शिक्षण मिळणे तसेच समवयस्क किंवा मित्र-मैत्रिणींसोबत थेट संवाद साधण्यात मयार्दा येत आहेत. कोरोनामुळे मुलांची काळजी घेणं आणि त्यांना सातत्याने कोणत्या तरी गोष्टींमध्ये गुंतवून ठेवणे हे पालक तसेच मुलांची काळजी घेणार्यांसाठी जिकिरीचे ठरत असल्याचं युनिसेफच्या सूत्रांनी सांगितले. जागतिक संस्थेच्या मते, कोरोना साथीपूर्वी भारतातील अंदाजे ५0 दशलक्ष मुलांना मानसिक आरोग्याच्या अनुषंगाने त्रास होत होता. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर देशभरात किमान नऊ महिने घरीच राहा असं धोरण अवलंबण्यात आलं. त्यामुळे सातपैकी एक किंवा जगभराचा विचार केला तर सुमारे ३३२ दशलक्ष मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे.युनिसेफने चाईल्डलाईनच्या सहकार्याने पालक, केअरगिव्हर्स, मुले तसेच किशोरवयीन मुलांसाठी एक पुस्तिका तयार केली आहे. या पुस्तिकेत कोरोना काळात काय काळजी घ्यावी, तसेच साथीच्या परिस्थितीत ताणतणाव आणि चिंता या समस्यांचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
साथीच्या आजारामुळे निर्माण होणारा तणाव, मुलांचे मानसिक आरोग्य आणि कल्याण ही गंभीर चिंतेची बाब आहे. यासाठी त्यांना शिक्षक, केअरगिव्हर्स आणि पालकांकडून मानसिक- सामाजिक आधार प्राधान्याने मिळणे गरजेचे आहे. मुले आणि केअरगिव्हर्स यांना ताणतणाव, भीती आणि चिंतेचं व्यवस्थापन करण्यासाठी मदत करणारी सहाय्यक संरचना आणि कृती अधिक मजबूत करणे आवश्यक आहे.