अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी लस उपलब्ध होणार असून लसीकरणाचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. लसीकरणासाठी आवश्यक साधनसामग्री व मनुष्यबळ आदी यंत्रणा उभारण्याचे निर्देश टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, लसीकरण मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी डिप फ्रिजर, आईसलाईन रेफ्रिजेरेटर, शित साखळी केंद्रे, व्हॅक्सीन कॅरीअर, कोल्ड बॉक्स पॅक आदी साधनसामग्री सज्ज ठेवावी. तसेच आरोग्य यंत्रणा व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी कुशल मनुष्यबळ नेमून पथके तयार करावीत. कोरोना प्रतिबंधक दोन लसींचा डोस आहे. पहिली लस टोचल्यानंतर एक महिन्याने दुसरी लस टोचली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्करला लस टोचली जाणार आहे. शासकीय, निमशासकीय आरोग्य यंत्रणा, खाजगी आरोग्य यंत्रणेकडील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण होणार आहे. त्यानुसार लसीकरण केंद्राची ठिकाणे निश्चित करावी. लसीकरण पथके तयार करावीत व त्यांना प्रशिक्षण द्यावेत आदी निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयासह 59 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 14 ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये, एक वैद्यकीय महाविद्यालय, 13 नागरी आरोग्य केंद्रे या ठिकाणी लसीकरण केंद्रे उघडण्यात येतील. जिल्ह्यात 4 हजार 481 व्हॅक्सीन कॅरीअर, 134 डीप फ्रिजर, 133 आईसलाईन रेफ्रिजेरेटर, 255 कोल्ड बॉक्स आदी साधने सज्ज ठेवण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणमले यांनी दिली.
लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात सामान्य नागरीकांना लस टोचली जाणार आहे. त्यासाठी वेबसाईट व ॲपवर लसीकरणासाठी नाव नोंदणी करण्यात येणार आहे. नाव, पत्ता, आधारकार्ड अपलोड केल्यानंतर मोबाईल नंबरवर मॅसेज येणार आहे. लसीकरणाची तारीख, वेळ व ठिकाण कळविले जाणार आहे.
Related Stories
October 9, 2024