नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या ९८ व्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा मानाचा ‘जीवनव्रती’ पुरस्कार प्रसिद्ध कवी व विचारवंत यशवंत मनोहर यांनी ऐन वेळी नाकारला. पुरस्कार वितरण समारंभात सरस्वतीची प्रतिमा ठेवू नये. त्याऐवजी सावित्रीबाई फुले, फातिमा शेख किंवा ताराबाई शिंदे यांची प्रतिमा ठेवावी, अशी विनंती त्यांनी विदर्भ साहित्य संघाला केली होती; परंतु विदर्भ साहित्य संघाने या विनंतीला प्रतिसाद न दिल्याने त्यांनी हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतला.
विदर्भ साहित्य संघातर्फे मराठी साहित्यविश्वात आपली वेगळी छाप उमटवणाऱ्या विदर्भातील साहित्यिकाला कै. ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या नावाने ‘जीवनव्रती’ हा पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार प्रसिद्ध विचारवंत व आंबेडकरी साहित्यिक यशवंत मनोहर यांना याआधीच जाहीर झाला होता. आज १४ जानेवारी रोजी विदर्भ साहित्य संघाच्या ९८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार यशवंत मनोहर यांना प्रदान करण्यात येणार होता; परंतु या कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवणार असल्याचे कळल्यावर त्यांनी विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्याला संदेश पाठवून सरस्वतीची प्रतिमा न ठेवण्याची विनंती केली. स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना शिक्षणबंदी आणि ज्ञानबंदी करणाऱ्या शोषणसत्ताकाची प्रतीके मी आयुष्यभर नाकारली आहेत. मग, आता या प्रतीकांची प्रतिष्ठा मी का वाढवू, असा सवालही त्यांनी या संदेशात उपस्थित केला; परंतु प्रत्यक्ष कार्यक्रमाची वेळ होत आली तरी विदर्भ साहित्य संघाने त्यांच्या या संदेशाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी हा पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय विदर्भ साहित्य संघाला कळवला. त्यांच्या या निर्णयाने साहित्यविश्वात मोठी खळबळ उडाली. इतर सत्कारमूर्तीबरोबर मंचावर यशवंत मनोहर न दिसल्याने त्यांच्याबाबत विचारणा सुरू झाली. खरे कारण कळल्यावर कार्यक्रमस्थळाचा नूरच बदलला. यशवंत मनोहरांच्या नकाराची छाया कार्यक्रमस्थळी स्पष्ट जाणवायला लागली. विदर्भ साहित्य संघाने मात्र अद्याप याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Related Stories
December 7, 2023