अलिकडच्या काळात हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.निकटवर्तीयांचे खून करून स्वत:ला संपवण्याच्या घटनाही समोर येत असून त्या चिंता वाढवणार्या ठरत आहेत. खरं तर स्वत:ला इजा करून घेणं हा एक मानसिक आजार आहे. याला सेल्फ इंजुरी डिसऑर्डर असं म्हणतात. गंभीर अवस्थेत हा रुग्ण निकटवर्तीयांचा जीव घेण्यासही मागेपुढे पहात नाही. रुग्णाची मानसिक अवस्था प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीनं त्याच्या स्वास्थ्यावर विपरीत प्रभाव टाकत असते. बरेचदा रुग्णाचं स्वत:वरील नियंत्रण संपतं आणि तो आतताई कृती करतो. या मनोविज्ञानाशी संबंधित आजारावर औषधोपचार आणि समुपदेशन याद्वारे उपचार होऊ शकतात. मात्र या अवस्थेतील रुग्णांना सतत सोबतीची आवश्यकता असते. स्ट्रेस थेरपी, बिहेविअर थेरपी, सायको थेरपी, फॅमिली थेरपी या वेगवेगळ्या पद्धतीनं रुग्णावर उपचार शक्य होतात.
या व्यक्ती आवेगात कोणतीही जीवघेणी कृती करू शकतात. त्यामुळे रुग्णांवर लक्ष ठेवणं, त्यांच्या आजूबाजूला जिवास धोका पोहोचू शकतील अशा वस्तू न ठेवणं, आजूबाजूला सकारात्मक वातावरण निर्माण करणं, रुग्णाशी गप्पा मारणं आणि त्याला जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठी प्रवृत्त करणं याद्वारे त्याला या अवस्थेतून बाहेर काढणं शक्य आहे. या व्यक्ती कळत नकळत स्वत:ला इजा पोहोचवून घेत असतात. धारदार सुरीनं शरीरावर जखमा करणं, जाळून घेणं, हातपायाला चावे घेणं, डोळे जोरजोरात दाबणं, विष खाणं, गरम वस्तूंना स्पर्श करणं, जखमांवरच्या खपल्या काढून त्या भळभळत्या ठेवणं, शरीरावर प्रमाणाबाहेर पिअर्संग करून घेणं, भिंतीवर डोकं आपटून घेणं, एखाद्या जड वस्तूनं अंगावर प्रहार करून घेणं आदी मार्गानं हे रुग्ण स्वत:ला इजा करून घेत असतात. विशेषत पौगांडावस्थेतील मुला-मुलींमध्ये हा मानसिक आजार मोठय़ा प्रमाणावर पहायला मिळतो. बालवयामध्ये झालेलं लैंगिक शोषण, कुटुंबामध्ये सततची भांडणं, मारहाण, अवहेलना आदी कारणांमुळे रुग्णाची ही दशा होते. काही वेळा जेनेटिक कारणांमुळेही ही अवस्था उत्पन्न होऊ शकते. मात्र कारणं काहीही असली तरी परिणाम भयंकर असतात. म्हणूनच या रुग्णांची डोळ्यात तेल घालून काळजी घ्यायला हवी. मुख्य म्हणजे तात्काळ उपचार सुरू व्हायला हवेत.
Related Stories
September 3, 2024