महाराष्ट्रातील धुळे, जळगांव, नंदुरबार जिल्हे, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण, कळवण, देवळा तालुके आणि मध्य प्रदेशातील बुऱ्हानपुर ह्या प्रदेशास खानदेश म्हणतात. हा सर्व प्रदेश ब्रिटिश काळात बाॅम्बे प्रेसिडेन्सी या राज्यातील एक जिल्हा होता.
नंतर ब्रिटिश सरकारने १९०६ मध्ये प्रशासनिक सोईसाठी या जिल्ह्याचे विभाजन करून पुर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे दोन जिल्हे बनवले. उर्वरित भागाचा नाशिक जिल्ह्यात समावेश आहे. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेची मागणी होऊ लागली. यामुळे १९६० मध्ये बाॅम्बे प्रेसिडेन्सीचे महाराष्ट्र व गुजरात राज्यात विभाजन झाले. बुऱ्हानपुर वगळता उर्वरित खानदेशचा सर्व भाग महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्यात आला. बुऱ्हानपुरला मध्य प्रदेश राज्यात समाविष्ट करण्यात आले. महाराष्ट्रात सरकारने १९६०-६५ मध्ये खानदेश नाव असलेल्या जिल्ह्यांचे नामकरण केले. या नुसार पश्चिम खानदेश जिल्ह्याचे नामकरण धुळे जिल्हा व पूर्व खानदेश जिल्ह्याचे नामकरण जळगांव जिल्हा असे करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील खानदेश परिसर कसमादे या नावानेही ओळखला जातो. १९९८ मध्ये धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार हा नवा जिल्हा अस्तित्वात आला. हा सर्व परिसर महाराष्ट्र राज्याच्या अती उत्तरेस असल्यामुळे उत्तर महाराष्ट्र म्हणूनही ओळखला जातो.
महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर प्रशासनिक सोयीसाठी महाराष्ट्र राज्यात वेगवेगळे प्रशासकीय विभाग तयार केले गेले. मध्य महाराष्ट्रातून पश्चिम महाराष्ट्र (पुणे विभाग) व उत्तर महाराष्ट्र (नाशिक विभाग) हे दोन विभाग तयार करण्यात आले.आता उत्तर महाराष्ट्र प्रशासकीय विभागात वर्तमान धुळे, जळगांव, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश होतो. म्हणजे खानदेशातील सर्व जिल्हयांचा उत्तर महाराष्ट्र प्रशासकीय विभागात समावेश होतो पण याच विभागातील अहमदनगर जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यातील पश्चिमेकडील भागाचा खानदेश समावेश होत नाही.
म्हणजे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रस खानदेश नाही तर उत्तर महाराष्ट्रातील काही भागास खानदेश म्हणतात. आता या प्रदेशाचे अधिकृत नाव हे खानदेश नाही तर उत्तर महाराष्ट्र व नाशिक विभाग असे आहे.
- – महेंद्र बोरसे
- (छाया : संग्रहित)