सोलापूर : परंडा (जि. उस्मानाबाद) येथे मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील महिलेला पावित्र्य सिद्धतेसाठी पतीने उकळत्या तेलातून पत्नीला नाणे काढण्याचा अघोरी प्रकार करायला भाग पाडले. त्यातून तिचा हात भाजला. या प्रकाराबद्दल संबंधित महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे पोलिसासह दोघाजणांनी संबंधित महिलेला माहेरी सोडण्याचा बहाणा करुन डांबून ठेवून चार दिवस बलात्कार केला.
या प्रकरणी परंडा पोलिस ठाण्याचा पोलिस खुणे, गावातील भगवान धनवे आणि संबंधित महिलेचा पती यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अंधर्शद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट घेऊन महिलेला न्याय देण्याची विनंती केली होती. सातपुते यांच्या आदेशाने सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तो परंडा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.
यासंदर्भात तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले की, उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथे संबंधित महिला पतीसोबत राहते. तिच्या पतीचे पूर्वी तीन विवाह झाले होते.
महिलेच्या पतीला वारंवार विविध गुन्ह्यांसंदर्भात संशयावरून पकडण्यासाठी खुणे हा तिच्या घरी येत असे. त्याच्यासोबत गावातीलच धनवे हा जात असे. यातून संबंधित महिलेचा पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यातून वादही होत असे. पतीने अंधर्शद्धेतून तिला पावित्र्य सिद्ध करण्यास सांगितले. त्यासाठी तिला उकळत्या तेलात पाच रुपयांचे नाणे टाकून ते काढण्यास भाग पाडले. याचा व्हिडिओ प्रसारित झाला आणि ही घटना वार्यासारखी पसरली. त्या महिलेला न्याय देण्यासाठी अंधर्शद्धा निर्मूलनच्या सरिता मोकाशी, निशा भोसले, कुंडलिक मोरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. तिला घेऊन त्यांनी सोमवारी सोलापुरात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट घेतली आणि त्या महिलेने अत्याचाराचा पाढा सातपुते यांच्यासमोर वाचला. या प्रकरणी परंडा पोलिस ठाण्याचा पोलिस खुणे, गावातील भगवान धनवे व महिलेचा पती असे संशयित आरोप आहेत. यासंदर्भात तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024