मुंबई :कोविड-१९ लसीकरणाचा तिसरा टप्पा आज १ मार्चपासून सुरू होत असून ६० वर्षे पूर्ण केलेले तसेच ४५ वर्षांवरील आजारी लोकांना या टप्प्यात प्राधान्यक्रमाने लस दिली जाईल. याशिवाय, सर्वसामान्यांसाठीही लसीकरण सुरू होत असून को-विन 2.0 (Co-WIN2.0) अॅप/ पोर्टलवर सकाळी ९ वाजता नोंदणी सुरू होईल. तसेच लसीकरण केंद्रांवरही नोंदणी करता येईल. या टप्प्यात १० हजार सरकारी व २० हजार खासगी रुग्णालयांत लसीकरणाची केंद्राची योजना आहे. राज्यात हा टप्पा पालिकांच्या तसेच शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांतूनही राबवला जाईल.महापालिका रुग्णालये तसेच राज्य शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालयांत ही लस विनामूल्य असून इतर खासगी रुग्णालयांत प्रत्येक डोससाठी २५० रुपये शुल्क द्यावे लागेल.
महाराष्ट्र, गुजरातसह 6 राज्यांत रुग्णवाढ : महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात या ६ राज्यांत रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ८६.३७ टक्के नवे रुग्ण याच राज्यांत आढळत आहेत. शिवाय ११३ मृत्यूही झाले आहेत. महाराष्ट्रात सलग सर्वाधिक ८,६२३ नवे रुग्ण आढळले.विदर्भात कोरोनाचे ३३३६ नवे रुग्ण, २२ मृत्यू : पूर्व विदर्भातील ६ आणि पश्चिम विदर्भातील ५ अशा ११ जिल्ह्यांत मिळून रविवारी ३३३६ नवे रुग्ण आढळले, तर २२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. नागपूर ५, वर्धा १, अमरावती जिल्ह्यात ८, यवतमाळ व वाशीम प्रत्येकी ३ तर अकोला आणि बुलडाण्यात प्रत्येकी एक मृत्यू झाला.