अमरावती : अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर सकारात्मक हालचाली होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही याबाबत चर्चा झाली असून, त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. त्यामुळे हे महाविद्यालय होणारच असल्याचा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी नुकतेच याबाबत निवेदन मुख्यमंत्री श्री. ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री. पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना दिले व चर्चाही केली. गत अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातारा, अलिबाग, नंदुरबार व अमरावती या चार जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे. अमरावती जिल्हा हे विभागीय मुख्यालयाचे ठिकाण आहे. जिल्ह्यात मेळघाट व कुपोषणग्रस्त आदिवासीबहुल क्षेत्र बालमृत्यू व मातामृत्यूदर मोठ्या प्रमाणात आहे. अनेक उपचारांसाठी नागपूरला जावे लागते, तसेच कोरोना साथीसारख्या आजारात रुग्णसेवेसाठी लागणारे वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचा-यांची कमतरता आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय होणे आवश्यक आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्याला मंजूर झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधी मंजूर करून काम सुरु करण्याचे निर्देश संबंधितांना देण्याची विनंती पालकमंत्र्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
महाविद्यालयाबाबत कृती समितीकडून पाठपुरावा होत आहे. कृती समितीच्या मान्यवर सदस्यांशीही चर्चा केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत शासन पूर्णत: सकारात्मक असून, वैद्यकीय महाविद्यालयासाठीचा निधी मंजूर करण्यात येईल. अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार याबाबत कुणीही शंका बाळगू नये व कसलाही संभ्रम निर्माण होऊ नये. महाविद्यालयासाठीच्या आवश्यक निधीचा विषय मार्गी लागण्यासाठी वरिष्ठ स्तरावर सकारात्मक हालचाली होत आहेत, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.