- ‘जिच्यामंधी आमुची मायबोली वसे
- ती आम्ही वऱ्हाडीच बोलू कौतिके’
*’ढंगरी बुढी’*…हो….’ढंगरी बुढी’च.काहुन कां सारं गांव तिले ढंगरी बुढीच मने.कोन्तई काम सांगतलं कां तिचे बायने ठरलेलेच राह्ये.तिचं खरं नांव फक्त तिच्या घरच्या लोकाईलेच माईत असंन,पन तिच्या घरचेई तिले ‘ढंगरी बुढी’ ह्याच नावानं हाका मारे. भोकरबड्डीचं माहेर असलेली हे बुढी लगंन हुन श्यापुरात आली ताहापासून तिनं माहेराचं तोंड पाह्यलं नाई असं गावचे जुने जानते लोक मनतेत.त्याले तिच्यापाशी कारनंई तसंच सबय हाये.लगंन झालं ताहा मायनं लगनात आलेल्या सबंन वऱ्हाड्याईम्होरं सांगतलं व्होतं मने,बाई लडू नोको,आता ‘थेच तुयं माहेर अन् थेच तुयं सासर’.हेच वाक्य तिनं मनामंधी गोंदून ठिवलं व्होतं.ना पह्यल्या अखाळीले गेली ना पयल्या दिवाईले.सासरी जे येटोयी मारुन बसली थे आजतागायत.तं अशी हे ढंगरी बुढी.
लगंन झाल्याझाल्या पयले चार पाच वर्स असेच गेले.गोया घिवू घिवू तिनं लेकरं हुच नाई देल्ले.लय करा लागे म्हने लेकराईचं,नीरा ढंगरेच करे.सासु लयच मांग लागली ताहा कुठं तिनं गोया घेनं बंद केलं.मंग सहाव्या वर्सी तिले लेकरु झालं नावं ठिवलं रामराव,दोन वर्साच्या अंतरानं गुंफा अन त्याच्याबास्ता झाला थो श्यामराव.नांव ठिवन्यामांगंई तिचं सोताचं लॉजिक व्होत़.रामायन पयले झालं न मंग माभारत घळलं असं थे म्हने.अन गुंफी वं बुढे…? त बुढी म्हने तव्हा मीनं ‘दुर्गासप्तशती’चा पाठ लावला व्होता तव्हाच झाली गुंफा.
ढंगरी बुढी अन नथ्थु बुढा जरी अडानी व्होते तरी तेयच्यावर शाहू,फुले,आंबेडकर येयच्या चळवळीचा पगडा असल्याच्यानं दोघानंई आपल्या तिन्ही लेकराईले उच्ची शिक्षन देल्लं.गुंफीसयित सबंन चांगल्या हुद्यावर कामाले लागले.गुंफी मुंबईत मंत्रालयात.रामराव-शामराव सूरत अन गुवाहाटीत केंद्र सरकारात दिवटीवर लागले.पखं फुटल्यावर पाखराचे पिल्ले जसे फानोफान व्होते तसं झालं.सासू-सासरे देवाघरी गेलेले.घरी आता दोघं बुढाबुढीच.
बुढीच्या मानानं नथ्थु बुढा लवकर थकला,वावराची जिम्मेदारी ढंगरी बुढीनं हाती घेतली.सनावाराले घरी येनारे लेकरं लगंन झाल्यानंतर वर्सा दोन वर्सानं श्यापुरात याले लागले.तेयचं येनं कमी झालं.आता त चार-चार पाच-पाच वर्स हुन जाते तरी येत नाई,थे मस्त रमले संसारात. गुंफीनं तं बुढीचे सारे गुन घेतले,थे यिवूनंई पात नाई श्यापुरात.
संसाराचे चटके यालेच मनंत असंन काय.ज्याले बसते त्यालेच माईत पडते.संसारात लय परकारचे चटके बसतेत पन हाई येक चटकाच हाये असं मले वाटते.तुमाले काय वाटते थे तुमच्यापाशीच ठिवा. तं आता संसार,गावगाळा म्हतलं कां लगनयेव आलेच.अशाच येका लगनाले नथ्थू बुढा उमरावतीत गेला.यष्टीनंच जावू बा अन् सानच्या वखताले घरी यिवू असं त्यानं ठरोलं व्होतं.श्यापुरातले दोन सोपतीई संग व्होते.श्यापुरात यष्ट्या थांबत नसल्यानं तिघंई याट्योनं वरुडातल्या यष्टी स्ट्यानवर गेले अन मंग तिथून उमरावतीत.
उमरावतीत उतरल्यावर सबंन जन बडनेरा रोडवरच्या मंगल कार्यालयात गेले.लगंन लागल्यावर.’जेवन तयार हाये,कोनीई जेवल्याबिगर जावू नोये’ असं माईकरुन कोनंतरी सांगतलं. बुढा सोपत्याईले म्हने चाला आता जेवन करून घिवू मले लय भूक लागली,तसा तं मावला जेवन कराचा टाईम निंघूंन गेला पन उलीकसं पोटात टाकून घेतो.
सोपत्याईपैकी रावताच्या गनेसनं बुढ्याले बुफेतून पिलेट भरुन आनून देल्ली.’जेवा मने बावजी अरामात’ तसा बुढा खाली पालखट मांडून जेवाले बसला.बुढ्याबाढ्याईले मदत कराचे संस्कार आपल्या वऱ्हाडामंधी अजुनंई कायम हायेत. नथ्थू बुढ्याले पिलेट भरुन देल्यावर हे दोघं सोपती जे सटकले थे लय वाळखोपावतर मंगल कार्यालयात आलेच नाई, तेयनं बाहीर जावून आपली भट्टी ज्यमोली असंन.आजकाल ह्या जवान पोट्याईचे लगनयेवात,तेरवीत अशी भट्टी ज्यमवाचे परकार लय वाढले.बम्म ढोसून रायते लेकाचे.लगनात नागीन ड्यांस करतेत अन तेरवीत लडतेत.
सोपत्यायची वाट पाहू पाहू बुढा थकला अन आखरीले येकटाच मेनरोडवर यिवून यष्टी स्ट्यानच्या याट्योत बसला,याट्योत पयलेच तीघं जनं बसले व्होते,मांगचा येक जन डायवर सीटवर यिवून बसला,त्यानं बुढ्याले मांगच्या सीटवर जागा करुन देल्ली.(इथंई वऱ्हाडी संस्कृती कायम असलेली दिसते) राज्यापेठीच्या पुलावर येत नाई तं याट्योचे ब्रेक फेल झाले.याट्यो दुसऱ्या याट्योवर जावून दनकन आदयला.डायवरसयित याट्योतले तीन गंभीर आन् बुढा जागेवरच.गंभीर जखमी झालेल्याईले लोकायनं बाजूच्या दवाखान्यात नेल.तवरीक पोलीस आले.तेयनं जागेवरच बुढ्याचा पंचनामा करुन मढं इर्विन दवाखान्यातल्या चीरफाड घरात नेलं.
लगनासाठी आलेल्या सोपत्याईनं बुढ्याले मंगल कार्यालयात लय लय धुंडलं,संडास,बाथरुम उघडून पायले.पन बुढ्याचा काई पत्ता नाई.बुढा तरासून निंघून गेला असंन बा ;मनुन थेई येष्टी स्ट्यानवर आले,तिथून वरुडात अन मंग श्यापुरात.ढंगरी बुढी तेयले पुसे पन हे चीळीचुप.बुढा आमच्या पयलेच निंघून आला येवळंच सांगे.दोन तिन दिवस झाले तरी बुढा आलाच नाई.मंग बुढीनं पोलीस पाटलाच्या सल्ल्यानं कोतवालाले सोपतीले घिवून वरुडातल्या पोलीस टेसनात रिपोट देल्ला,पोलीस गावात चवकशीले आले,दोई सोपत्याईले टेसनात निवून बाजीरावनं बम्म धुतलं,पन कोनालेच काई माईत नोतं तं सांगन काय?
मंग वरुडातल्या पोलीसायनं उमरावतीच्या पोलीस मुख्यालयाले इचारपूस केली.ताहा येक वयस्कर मानुस याट्योच्या याक्सीडनमंधी मेला,त्याची वयखपायख न पटल्यानं त्याले इर्वीनच्या चीरफाड घरात ठिवलं हाये असं समजलं.असं कयल्यावर बुढा गेल्याची गावात येकच बोंब झाली.गोठ बुढीपावतर गेली.बुढीनं खानंपेनं बंद केलं.
निरपं गेल्यानं रामराव सुरतहुन,शामराव गुवाहाटी,गुंफी मुंबईवून लेकराबाकरासयित ईवानानं नागपुरात अन तिथून पेशल गाळ्या करुन श्यापुरात आले.बुढ्याले आनाले रामराव अन शामराव उमरावतीच्या पोलीस टेसनात गेले,तिथून येकापोलीसाले घिवून इर्विन दवाखान्यात आले.पोस्ट मार्टम डाकरनं पयलेच उरकोलं व्होतं.फक्त तिथून बुढ्याले न्याचंच काम बाकी व्होतं.बुढ्याले आनासाठी इर्विन दवाखान्यापाशी उभ्या राह्यत असलेल्या अँबुलन्स गाळ्यापैकी येक गाळी ठरोली.
अँबुलन्स चिरफाड घराच्या गेटजोळ उभी केली.
सबंन जन अंदर गेले,चिरफाट घरातल्या दोन शीतपेट्यात दोनच बॉड्या होत्या.बाकीच्या पेट्या रिकाम्या व्होत्या.पोलीसानं तिच्च्या कर्मचाऱ्याले इशारा केला.थो अन त्याचा साथीदार वाटरप्रुफ कपळ्यात गुंडायलेली बुढ्याची बॉडी घिवून बाहीर आले,सर्वायनं हातभार लावून मढं अँम्बुलन्समंधी टाकलं.रामरावनं गुंफीले फोन केला निंघालो म्हनुन.
बॉडी श्यापुरात आनली,घरात रडारड सुरु झाली,बुढीले समजल्याबरब्बर थे बुढ्याच्या मढ्यापाशी धावतच आली अन तिले काय वाटलं त माईत नाई,करंट लागल्यावानी येकदम सरकली.ह्या नोये माहा बुढा…ह्या नोये माह्या बुढा…थो जीताच हाये.तिनं येकच रेटा लावला ह्या नोये माहा बुढा…ह्या नोये माहा बुढा…बुढी सांगू सांगू काची पळ्ली पन तिचं कोनी आयकेच ना.
जमलेले लोकं म्हने बुढीचा ढंगरेपना अजुन काई गेला नाई..आताई ढंगरेच करून रायली,बुढा मेल्याच्यानं तिच्या डोकशात फरक पळ्ला असंन म्हने.पन बुढीनं काई आपला हेका सोळला नाई,ह्या नोयेच म्हने माह्या बुढा,ह्या नोहेच माह्या बुढा…पन तिच्या बोलन्याकळं कोनं लक्षच देल्लं नाई. ‘येकखेप लगनाची अक्षता पळ्ली कां येका झाळावर कलम बांधल्यावर झाळं जसे येकजीव व्होते तसे हे दोन जीव येकजीव झाले असल्यानं बुढीनं वाऱ्याच्या लहरीतूनंच वयखलं कां ह्या आपला बुढा नाई म्हनुन.’
रामराम-श्यामरावनं बुढ्याले आंगनात खुरचीवर बसोलं,गुंफीनं अन् सुनाईनं गरम पान्यानं अंघोय घातली.बॉडी पॅकबंद असल्यानं फक्त वरच्या कपळ्यालेच अंघोय झाली.अंघोय झाल्यावर कोनंतरी मतलं का बा बुढ्याले आखरीचं पानी पाजा लागते.मंग कोनंतरी पॅकबंद असलेलं तोंड कपळा फाळून उघळं केलं.बुढ्याचं वय झाल्याच्यानं चेयरा लय चिमला व्होता.चेयरा उघळल्यावर वास येत असल्याकारनानं बुढ्याले वयखाच्या भानगळीत काई कोनी पळ्लं नाई.दोई पोराईनं,गुंफीनं बुढ्याच्या तोंडात वरतूनंच आंगठ्यानं पानी सोळलं.
बुढीले बलावलं पानी पाजाले पन थे काई ये नाई.मंग पाटलाच्या सुनीनं जबरदस्तीनं तिले ओढतच बुढ्यापाशी आनलं.बुढीच्या हातावर पानी देल्लं, बुढीचा हात बुढ्याच्या तोंडाजोळ नेला अन बुढी तिथंच हबकली,ह्या नोहे ना रे म्हने बुहाऱ्याईहो माहा बुढा,कोनाले घिवून आले म्हने अथीसा.हातावरचं पानी तिनं झटक्यानंच खाली फेकलं.बुढीनं लय लय गरबडगोंडा केला.
जमावात कुजबुज सुरु झाली.बुढी ढंगरे करुन रायली म्हने,चयली म्हने थे आता म्हतारपनात…लय वास सुटला,बांधा बुढ्याले तिरडीवर,उचला बुढ्याले लौकर,लय टाईम झाला आता.जमावातून अवाज यिवू लागले. बुढ्याले तिरडीवर बांधलं,हारतुरे झाले..बुढीचं बोंबलनं थांबाचं नांव नाई, ह्या नोये माहा बुढा थो जीताच असंन.
जमलेले लोकं गरबड करत असल्यानं चौघा जनानं बुढ्याले खांदा देल्ला… बुढ्याले न्यावं रे बा तं…तेवळ्यात जोऱ्यानं हार्न वाजोत घरापाशी येक अँबुलन्स यिवून थांबली,तेच्यातून येक पोलीस अन येक मानुस उतरला.थांबा$$$$…पोलीस अँबुलन्सच्या केबीनीतून जोऱ्यानं वरडला.अरे बावा…लय गरबड झाली.थे तुमची बॉडी नोहे;तुमची बॉडी ह्या अँबुलन्स मंधून आनली हाये.दोई बॉड्या म्हताऱ्या मानसाईच्या असल्यानं दवाखान्यातून उचलतांनी गरबड झाली.तुम्ही आनली थे बॉडी ह्या मानसाच्या बापाची हाये. झालं बा,मंग केली अदलाबदल.ताहा कुठं ढंगरी बुढीच्या जीवात जीव आला.
- -आबासाहेब कडू
- ९५११८४५८३७
- टीप:- कथानक काल्पनिक हाये.नाव-गांव-ठिकान जुयलच तं थो फक्तं योगायोग समजावा.
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- – बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–