नवी दिल्ली :ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघ आता बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. २६ डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर या सामन्याला सुरुवात होणार आहे. कर्णधार विराट कोहली भारतात परतणार असल्यामुळे अजिंक्य रहाणे उर्वरित कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व करेल. बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी सदस्य संजय जगदाळे यांनी टीम इंडियात गेल्या काही वर्षांमध्ये अजिंक्यला योग्य वागणूक मिळत नसल्याचे म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाळा कसोटीत त्याने ज्या पद्धतीने भारताचे नेतृत्व केले ते पाहून मी खरंच प्रभावीत झालो होतो. कुलदीप यादवचा त्याने मोठय़ा खुबीने वापर केला. पण माझ्या मते टीम इंडियात अजिंक्यला योग्य पद्धतीने हाताळण्यात आलेले नाही. भारतीय उपखंडाबाहेर त्याची कामगिरी चांगली आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांच्याविरोधत त्याच्या नावावर शतक जमा आहे. पण दोन सामन्यांत खराब कामगिरी झाल्यानंतर तुम्हाला त्याला संघाबाहेर करता. याला एखाद्या खेळाडूला आत्मविश्वास देणे म्हणत नाहीत. अशाने तुम्ही खेळाडूच्या मनात शंका निर्माण करता. जगदाळे एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
खेळाडू म्हटले की तुम्ही कधी ना कधी अपयशी होणार हे ठरलेलेच आहे. २0१४ साली इंग्लंड दौर्यात कोहलीही अपयशी ठरला होता. पण त्याने यामधून स्वत:ला सावरत सिद्ध केले असं म्हणत जगदाळे यांनी अजिंक्य रहाणेला आपला पाठींबा दर्शवला. त्यामुळे विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य भारतीय संघाचे कसे नेतृत्व करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
Related Stories
December 7, 2023