हिंगणघाट : अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणात एका प्रत्यक्षदश्री साक्षीदारासह सोमवारी आठजणांची साक्ष पूर्ण झाली. त्याचप्रमाणे मंगळवार, १६ फेब्रुवारी रोजी अंकितावर उपचार करणारे डॉक्टर आणि तिच्या महाविद्यालयातील सहशिक्षिकेची साक्ष सरकारी पक्षातर्फे नोंदविली जाणार आहे, अशी माहिती या प्रकरणातील प्रसिद्ध विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.
अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणाचे कामकाज सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.एन. माजगावकर यांच्यासमोर सुरू झाले. हे कामकाज दिवसभर चालले. खटल्याच्या सुरुवातीला या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे आरोपीची ओळखपरेड घेणारे कार्यकारी दंडाधिकारी नायब तहसीलदार विजय पवार यांचा मागील तारखेला अपूर्ण राहिलेला उलटतपास पूर्ण झाला. बचाव पक्षाच्या वकिलांनी दोन तास त्यांची उलटतपासणी घेतली. त्यानंतर सरकारी पक्षातर्फे या प्रकरणातील दुसरा महत्त्वाचा प्रत्यक्षदश्री साक्षीदार सागर गायकवाड यांची साक्ष नोंदविण्यात आली.
या तपासात सागर गायकवाड यांनी जळीत घटना कशी घडली तसेच आरोपीने विकेश ऊर्फ विक्की नगराळे याने पीडितेच्या अंगावर कसे पेट्रोल टाकले, याबाबतची घटना कोर्टासमोर कथन केली. बचाव पक्षाच्या वकिलांनी त्यांची अडीच तास उलटतपासणी घेतली. सरकारी पक्षातर्फे या प्रकरणात सोमवारी झालेल्या दोन साक्षीदाराशिवाय मागील तारखांना प्रत्यक्षदश्री साक्षीदार अभय तळवेकर, मृतक अंकिताचे वडील अरुण नागोराव पिसुड्डे, आई संगीता, शव परीक्षण पंचनाम्याच्या पंच साक्षीदार नागपूरच्या श्रीमती देशमुख, मातोश्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर, घटनास्थळवरील पंच सचिन बुटले असे एकूण आठ जणांची साक्ष नोंदविण्यात आलेली आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण ७७ साक्षीदार आहेत. त्यातील आवश्यक साक्ष सरकारी पक्षातर्फे नोंदविल्या जाणार आहे. सरकारी पक्षातर्फे प्रसिद्ध विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी भाग घेतला. त्यांना सरकारी वकील अँड. वैद्य यांनी सहकार्य केले तर बचाव पक्षातर्फे भूपेंद्र सोने यांनी भाग घेतला. कामकाजादरम्यान या प्रकरणाच्या तपास अधिकारी पोलिस उपविभागीय अधिकारी तृप्ती जाधव या उपस्थित होत्या. न्यायालयीन परिसरात आरोपी विक्कीच्या पत्नीसह कुटुंबीयही उपस्थित होते.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024