
विलासराव माहुरे : गोरगरिबासाठी आशेचा किरण आणि निष्ठावंत शिवसैनिक
एक उत्तुंग अनं कृतिशील व्यक्तिमत्व म्हणून विलासराव माहुरे यांच्या कार्यकर्तुत्वाच्या बाबतीत महाविद्यालयीन जीवनापासून अनुभवले अनं कालांतराने त्यांच्यातील अनेकविध कार्यकर्तुत्वाचे पैलू उलगडत गेले.ग्रामीण भागातील एक सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती आणि एक खंदा अनं समाजाचे दुःख वेचणारा शिवसैनिक म्हणून त्यांच्या जीवन प्रवासाची अनुभूती यायला लागली.शिक्षकी पेशातील शिस्तप्रिय वडिलांच्या तालमीत तयार झालेल्या संस्कारक्षम विलासरावांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाला शिरोधार्य मानून ना मागचा विचार केला ना पुढचा विचार,ना कुटुंबाचा ना वैयक्तिक आयुष्याचा विचार केला.
शिवसेनेची भगवी पताका हाती घेऊन राजकीय सामाजिक व विविधांगी कार्यासाठी शिवधनुष्य खांद्यावर घेतले. सामाजिक, राजकीय परिवर्तन आणि बाळासाहेबांच्या विचाराने पछाडलेल्या ध्येयवेढ्या विलासरावांनी गोरगरिबाच्या सेवेसाठी,महाराष्ट्र धर्म टिकविण्यासाठी,भूमिपुत्राची अस्मिता जपण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केल्याची अनुभूती यायला लागली. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून एक निःस्वार्थ,निष्ठावंत शिवसैनिक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यास यश मिळविले असले तरी त्यांचा हा प्रवास मोठा खडतर,संघर्षमय,सामाजिक कार्याला झोकून देणारा आणि जनसामान्यांना न्याय देण्यासाठी राहिला आहे.त्यासाठी आमच्या वहिनीसाहेब अर्थात विजयाताई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्यात म्हणून विलासरावसाठी खडतर असलेला मार्ग हा सुकर होण्यास मदत झाली हे ही तितकचं खरं आहे.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रेरणास्थानी ठेऊन ऐन उमेदीच्या काळापासूनच त्यांनी नियोजन पूर्वक आपल्या कार्याची दिशा ठरविली आणि आजही तीच दिशा अविरत कायम आहे.
शेंदुरजना खुर्द (तालुका तिवसा जिल्हा अमरावती) या गावी एका सर्वसामान्य कुटुंबात विलास विठ्ठलराव माहूरे यांचा 25 सप्टेंबर 1958 रोजी जन्म झाला.वडील व्यवसायानं शिक्षक.कुटुंबात शैक्षणिक वारसा असतानाही त्यांचा कल मात्र राजकीय व सामाजिक क्षेत्राकडे अधिक राहिला.तसा विलासरावांना भक्कम असा कोणताही राजकीय वारसा लाभला नाही.प्रस्थापित राजकीय स्थितीत अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत त्यांनी आपलं आगळं वेगळं असं दखलपात्र स्थान निर्माण केलं.यशाची एक एक पायरी पादाक्रांत केली. बाळासाहेबांच्याच शब्दात “प्रयत्न करा,यश आज नाही उद्या, उद्या नाही परवा,कधीतरी नक्कीच मिळणार” हे शब्द उराशी बाळगून त्यांनी आपले कार्य अविरत ठेवले.त्यातूनच शिवसेनेचा एक कडवट शिलेदार म्हणून वीस प्रतिशत राजकारण अंशी प्रतिशत समाजकारण या तत्त्वावर आरंभलेले कार्य अनेकांना न्याय देणारे,आपलेसे वाटणारे राहिले आहे.त्यांच्याकडे आलेल्या कार्यकर्त्याचं समाधान झालं नाही असा कार्यकर्ता दुर्मिळच म्हणावा लागेल.म्हणूनच विलासराव अल्पावधीतच सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत बनले.
1980 मध्ये त्यांनी आपल्या मूळ गावी म्हणजे शेंदुरजना खुर्द येथे शिवसेना शाखेची स्थापना केली. नेतृत्व कौशल्याच्या जोरावर ते गाव पातळीवर मर्यादित न राहता काळानुसार त्यांनी त्यांच्या कार्याच्या कक्षाही अधिक रुंदावल्यात.पक्ष संघटना बांधणी बरोबरच सर्व सामान्य व्यक्तीचे हित जोपासणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे असा त्यांचा ध्यास राहिला आहे.विचार,अभ्यास आणि त्यातील सातत्य या-तिसूत्रीवर त्यांच्या संघर्षाचा लढा उभा आहे.लढाऊ बाण्याच्या विलासरावांनी राजकारणाला साध्य न मानता एक साधन म्हणून त्यांनी आपल्या लोक कल्याणकारी आणि न्यायाची जोड दिली असल्याचे त्यांच्या आजवरच्या कार्यावरून सहज लक्षात येतंय.जात, धर्म,पंथ आणि वर्ण या चौकटीच्या बाहेर येऊन कार्यकर्त्यांचं समाधान हेच त्यांनी त्यांच्या कार्याचं सूत्र ठरविलं आहे.म्हणूनच कट्टर हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे विलासराव गैरहिंदू लोकांनाही ते आपलेसे वाटते.
ऐन उमेदीच्या वयात राजकारणात प्रवेश केलेल्या विलासरावाच्या तत्कालीन वेळेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा फार मोठा दबदबा होता.त्यावेळी अन्य पक्षांना राजकारणात फारसा वाव नव्हता.नवख्या शिवसेनेसाठी तर हा काळ अधिक संघर्षाचा होता.कट्टर जातीयवादी पक्ष म्हणून तत्कालीन वेळेस शिवसेना पक्षाची ओळख निर्माण झाली होती.गैर हिंदुत्ववादी लोक शिवसेनेकडे फारसे फिरकत नव्हते.अशावेळी पक्ष विस्तारित करणे वाटते तितके सोपे नव्हते पण विलासरावानी हे आव्हान आनंदाने स्वीकारले.ते प्रबळ आव्हानापासून मागे हटले नाहीत.उलट तितक्यच नेटाने लढलेत.तिवसा तालुका प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर ज्या गावात औषधालाही शिवसेना वा पक्ष कार्यकर्ता नव्हता अशा गावात त्यांनी शिवसेनेच्या शाखा स्थापन करण्याचा धडाका सूरू केला.त्यांच्या आव्हानाला युवकांनी भरभरून प्रतिसाद देत शिवबंधन बांधले.बघता बघता गावागावात शिवसेना शाखा स्थापन झाल्यात.कट्टर आणि प्रामाणिक कार्यकर्ते पक्षाशी जोडले गेलेत.परिणामता कालांतराने ग्रामपंचायती,पंचायत समिती,विविध सहकारी समित्यावर शिवसेनेने शिरकाव केला.ही सर्व किमया विलासरावांनी स्वतःच्या कार्यकर्तृत्वाच्या भरवशावर आणि कार्यकर्त्याच्या पाठबळावर करून दाखविली. म्हणूनच दिवसे दिवस विलासरावाचे नेतृत्व बहरायला लागले आणि विरोधकात धडकी भरायला लागली.सत्ता स्थापनेचा प्रारंभ त्यांनी स्वतःच्या गावाच्या ग्रामपंचायतची सत्ता काबीज करून केली.सरपंच म्हणून त्यांनी गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकला.शासनाच्या अनेक योजना गावात आणल्यात. कार्यकर्तुत्वाच्या भरवशावर एक विश्वासपात्र अनं कर्तव्यतत्पर नेतृत्व म्हणून त्यांनी स्वगावातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आपली स्वतःची एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली.तिवसा पंचायत समिती शिवसेना पक्षाचे पहिले सभापती म्हणून त्यांनी इतिहास रचला.
गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!
शिवसैनिक व अन्य सामाजिक संघटनेच्या माध्यमातून विलासरावानी संघटनात्मक कार्यही तितक्या जोमाने पुढे रेटलेत.जी जबाबदारी त्यांनी अंगा-खांद्यावर घेतली ती त्यांनी लिलया पेललीत.वेळोवेळी आपल्या संघटन कौशल्याची चुणूक दाखवित शिवसेना पक्षाला विलासरावकडे विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात भाग पाडले. त्यातूनच त्यांच्याकडे शाखाप्रमुख,तालुकाप्रमुख, उपजिल्हा प्रमुख अशी नेतृत्वाची चढती कमान त्यांच्याकडे आली.प्राप्त प्रत्येक संधीचे विलासरावनी नेहमीच सोने करून दाखविले.गाव पातळीपासून नेतृत्व करणाऱ्या विलासरावांनी जिल्हा पातळी पर्यंत नेतृत्वाची झेप घेतली. त्यांचा प्राप्तपदाचा उंच आलेख म्हणजे संघटनात्मक कार्यातील त्यांची तपश्चर्याच म्हणावी लागेल.पक्षाच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ नेतृत्वानी दाखविलेल्या विश्वासाला त्यांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. निस्वार्थपणे आणि पोटतिडकिने पक्षाला अनुरूप आवश्यकतेनुसार आंदोलने केलीत,मोर्चे काढलीत, शासनाच्या अन्यायकारक बाबीचा नेहमीच निषेध नोंदविला. धिक्कार केला. आवश्यक मागणीच्या पूर्ततेसाठी व्युहरचना कशी आखायची आणि यश कसे पदरी पाडून घ्यायचे याचे प्रचंड कसब त्यांच्याकडे अनुभवातून आले.म्हणूनच विलासरावच्या नेतृत्वात पक्षाला अपयशाच्या जवळही जाता आले नाही.या सर्वस्व श्रेयास विलासरावचे नेतृत्व कारणीभूत ठरले.तत्कालीन आमदार दिवाकर रावते यांनी काढलेल्या ऐतिहासिक कापूस दिंडी प्रसंगी विलासरावच्या कार्यकर्तुत्वाची दखल खुद बाळासाहेब ठाकरेंनी घेतली आणि कौतुकाची थाप दिली.हा क्षण विलासरावसाठी नक्कीच अविस्मरणीय ठरला आहे.त्यासाठी विलासरावची राजकीय तपश्चर्या,प्रभावी व्यक्तिमत्व/नेतृत्व,त्यांच्यातील आत्मविश्वास,दृढ निश्चय,प्रभावी संवाद कौशल्ये, दूरदृष्टी,सकारात्मक दृष्टिकोन इत्यादी बाबी कारणीभूत ठरल्यात.
जात,धर्म,पंथ आणि वर्णभेदाच्या पलीकडचं विलासरावचं सर्वश्रूत नेतृत्व आहे.विलासरावकडे येणारा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्यासाठी समसमान आहे.गरीब-श्रीमंत, श्रेष्ठ-कनिष्ठ,आपला-परका असा भेद ते कधीच पाळत नाही.राष्ट्रसंतांच्या सर्वधर्मसमभावाच्या शिकवणुकीला अनुसरूनच प्रत्येकाशी व्यवहार करतात.सध्याच्या राजकारणात असं नेतृत्व मिळणं दुर्मिळ आहे.विलासरावनी सर्वांना जपलं. आपलंसं केलं.म्हणूनच विलासरावचं नेतृत्व सर्व व्यापक ठरलं.
सध्यास्थितीत जाती धर्माच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांची संख्या कमी नाही.पण विलासराव त्यास अपवाद आहे.शोषित, पीडित वंचितासाठी त्यांचं कार्य आहे.शिव, फुले, शाहू,आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराचा धागा पकडून ते राजकारणात सक्रिय आहे.वडिलांकडून प्राप्त महापुरुषाच्या ग्रंथ साहित्याचा त्यांनी स्वतः अभ्यास केला.आजही त्यांच्याकडे विविध धर्माचे धर्मग्रंथ आणि अन्य पुस्तके आहेत ते नियमित वाचतात.जगात शांतता नांदावी यासाठी युद्ध नव्हे तर बुद्ध हवे असं त्यांचं मत आहे. महापुरुषांचे हेच विचार सर्वसामान्यात रुजविण्यासाठी, सर्वसामान्याना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीही तितक्याच धुमधडाक्यात साजरी करतात.इतरही महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी साजरी करतात आणि याचा संपूर्ण खर्च विलासराव स्वतः करतात.
- नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

विलासरावानी राजकारणात अनेक चढ उतार पाहिलेत.यश अपयश पचविलेत.सर्वकाही सोचलेत.विरोधकाशी शर्थीने लढलेत.पण ध्येयापासून कधी मागे हटले नाहीत.संघर्ष त्यांचा सखा.अर्थात संघर्षमय जीवनचं त्यांच्या वाट्याला आलं.राजकीय नेतृत्व फुलत असतानाच पितृछत्र हरविलं.थोरल्या मुलाला आजारांनं कवेत घेतलं. अचानक विजया वहिनींनं जगाचा निरोप घेतला. त्यातच प्रकृती अस्वस्थामुळे स्वतः विलासरावांना स्वतःची बायपास सर्जरी करून घ्यावी लागली.यातून सावरत नाहीत तर धाकट्या मुलाला जबर आजारानं घेरलं.एका मागून एक अशी संकटे अनं धक्के विलासरावनी पचवीलेत.सर्व काही सोसले पण विलासराव काही डगमगले नाहीत.याउलट हळवे पण कणखर विलासरावांनी परिस्थितीशी चार हात केले.स्वतः बरोबरच कुटुंबालाही तितक्याच ताकतीने उभे केलेत.त्यांच्यावर परिस्थितीनुसार आलेल्या कौटुंबिक आघाताबाबत विचारणा केली तर “विलासराव तुम्हाला हे कसं काय जमतय,कमालच आहे बा तुमची,त्यावर विलासराव मनातून दुःखी असले तरी स्मित हास्यातच म्हणतात की,आपले कर्तृत्व चांगले ठेवा म्हणजे सर्व काही सुरळीत होईल असे म्हणून स्वतःचे दुःख स्वतःच पचवित इतरांना आनंद देतात” त्यांच्या कणखरपणाचे रहस्य अध्यापही कुणालाच उलगडता आले नाही.एवढं मात्र खरं की,हे सर्व केवळ विलासराव सारखे धुरंधर व्यक्तीच पचवू शकतात.
वास्तविकता विलासरावशी राजकीय व वैचारिक दृष्ट्या काही प्रमाणात मत भिन्नता असली तरी एक व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून विलासराव नेहमीच आपलेसे वाटले आहे.व्यक्तिगत संबंधात विलासरावनी सुद्धा राजकीय व वैचारिक भूमिकेचा शिरकाव कधीच होऊ दिला नाही.याउलट राजकीय भूमिका बाजूला सारून अनेकांना मदतीचा हात देण्यास कधीच आखडता हात घेतला नाहीत.कुणाच्याही कठीण प्रसंगी धावून येण्यास कधी थांबले नाहीत.आवश्यक त्यावेळी गरजूना सहकार्य अनं मदत करण्यास कधीच कचरले नाहीत.मला आजही आठवते की, मी पदवी व पदव्युतर झाल्यानंतर वर्ष 2000 च्या दरम्यान त्यांनी माझ्या नोकरींसाठी कसोशीने प्रयत्न केलेत.त्यात त्यांना यश मिळाले नसलेतरी प्रयत्नात कसर सोडली नाही.शिवाय मी पी. एच. डी. पदवी प्राप्त केली आणि सेट परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर ग्रामीण भागातील एका शेतकरी शेतमजुराचा मुलगा पी.एच.डी.झाला.सेट परीक्षा उत्तीर्ण केली म्हणून माझा पहिला जाहीर सत्कार विलासरावनी त्यांच्या गावी शिवजयंतीच्या पर्ववर घेतला.हा सत्कार माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.अन्य बाबी बाजूला सारून कर्तृतवाला अनं गरजवंतासाठी मदतीला प्राधान्य देणारं नेतृत्व म्हणजे विलासराव होय.विलासरावचे बाबतीत पुढील काव्यरचना तंतोतंत जुळते.
“विश्वबंधुत्वाची जाण, सत्कार्याचे
प्रमाण
समाजाचे भान,ठेवियले अंतरी
तु जाहला पोशिंदा गरजवंताचा
हीच खरी तूझ्या जीवनाची
वैखरी”
बाळासाहेब ठाकरेंनी मोठ्या कष्टानं शिवसेना उभी केली.जून 2022 च्या विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेनी बंडाचे निशाण फडकावत एकसंघ शिवसेना फोडली.शिवसेनेच्या इतिहासातील हे सर्वात मोठं बंड होतं. त्यामुळे शिवसेना पूर्णतः विखुरली.एकनाथराव मुख्यमंत्री झालेत.संधीसाधु आणि सत्तापिपासू राजकारण्यानी शिंदेच्या सेनेची वाट धरली.त्यामुळे उद्धव ठाकरे एकाकी पडलेत.अशा कठीण प्रसंगी विलासराव कुठल्याही राजकीय अमिषाला बळी पडले नाही.बाळासाहेब ठाकरे शेवटच्या सभेत म्हणाले होते की,
“मला सांभाळलं तसं
उद्धवला सांभाळा
आणि आदित्यला सांभाळा
आणि या महाराष्ट्राचा उत्कर्ष करून
घ्यावा”
बाळासाहेबांच्या अखेरच्या शब्दाला शिरोधार्य मानून विलासराव एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून उद्धव ठाकरेची साथ संगत केली. विलासरावाचा हाच लढाऊ अनं निष्ठावंत वारसा त्यांचा धाकटा मुलगा आकाश उर्फ बंटी माहुरे तितक्याच ताकदीने पुढे रेटत आहे हे विशेष!
एक प्रामाणिक,परखड,अभ्यासू व कृतिशील व्यक्तिमत्वाचे धनी आणि जनमनातील बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या विलासरावाच्या कार्यकर्तुत्वासाठी आकाश ठेंगणे पडते! इतकी उंची त्यांच्या कार्याची आहे.त्यांचे नेतृत्व उदयोनमुख नेतृत्वासाठी प्रेरणा आणि गोरगरिबासाठी खऱ्या अर्थाने आशेचा किरण आहे.त्यांची ही दैदिप्यमान वाटचाल निरामय स्वास्थासह सुखी, समृद्ध,ऐश्वर्यसंपन्न होवो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक सदिच्छा..!

प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
अर्थशास्त्र विभाग प्रमुख,श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा
ता. धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती,मोबाईल नंबर- 99709914 64
निष्ठावंत शिवसैनिक सोबत आहेत, ही ‘ बाळासाहेबांची पुण्याई’