
घरंदाज हुंदक्यांचे आर्त स्वर – वंशावळीच्या प्राचीन सरीतून
बाईपणाचा हिरवा गर्भ ठेवणाऱ्या ओसाड पुरुषी माळरानाला अन् काळाच्या पाठीवर अख्खा जन्म सहनशीलतेने सारवून – लिंपून जगण्याचा पापुद्रा धरून आलेल्या बाई कुळाला… अशा गर्भित अर्थाने अर्पण केलेली “वंशावळीच्या प्राचीन सरीतून…” ही नांदगाव जि नाशिक येथील कवयित्री प्रतिभा खैरनार यांची साहित्य काव्य कलाकृती नुकतीच वाचनात आली. स्त्री जीवनाची वास्तवता मांडणारी ही कलाकृती साहित्य जगतात स्त्रीवादी लेखनातील मैलाचा दगड ठरावी इतकी दर्जेदार निर्मिती झाली आहे. या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर स्त्रीचा अर्धा पदराने झाकलेला चेहरा, माथ्यावर चोचीत गवताच्या काड्या घेऊन बसलेली चिमणी, हा संदर्भ पाहूनच स्त्रीच्या शालीनतेचे, सोशिकतेचे, सहनशीलतेचे, कुटुंबवत्सलपणाचे, स्त्रीसंस्कृतीचे दर्शन घडते. महाराष्ट्राचे प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांनी साकारलेल्या मुक्तहस्त चित्रशैलीने कलाकृतीच्या अंतर्गत साहित्याला झळाळी आली आहे. या मुखपृष्ठावरून साहित्य कलाकृतीचे साहित्यिक मूल्य तपासून पाहताना स्त्रीला लाभलेल्या शापित व्यवस्थेचे रूप अधोरेखित होते.
युगानुयुगापासून स्त्रीला नैसर्गिकता: मातृत्वाचे वरदान लाभले आहे, परंपरेने घालून दिलेल्या नियमाने कुटुंब संस्थेत विवाह करून स्त्री घरात आणायची, तिची कूस उजवून अपत्य जन्माला घालायचे… वाढवायचे आणि पुन्हा पुढच्या पिढीला संक्रमित करायचे, पिढी दर पिढी हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वर्ग करायचा यालाच आपण वंशवृद्धी म्हणतो, यालाच आपण वंशावळ म्हणतो.. याच वंशावळीतून कवयित्रीचा जन्म झाला. या जन्माचं कवयित्रीने अत्यंत गर्भित अर्थाने आपल्या कवितेत वर्णन करतांना म्हटले आहे की –
नागरून काढलं खळं पायाच्या टाचांनी ,
भळभळणारी योनी आ वासून
घालू पहात होती पोटात अख्खी सृष्टी…
अन् तेवढ्यात एका कळेसरसी
रक्ताचा पाट वाहू लागला
वंशावळीच्या प्राचीन सरीतून.
स्त्रीचा जन्म म्हणजे सोशिकता, लाचारी, आयुष्यभर अभागीपणाच्या मरणकळा सोसण्यासाठीच झाला आहे असे कवयित्रीला वाटते. समाजातील पुरुषी व्यवस्थेबद्दल त्यांच्या मनात कुठेतरी हलकीशी चीड निर्माण झाली आहे, स्वतःला असहाय, सोशिकतेचा वसा चालविणारी आणि नरांच्या पिढ्या जन्माला घालण्यासाठी, स्त्री अपत्य जन्माला घालते त्यावेळी ज्या मरणकळा भोगाव्या लागतात त्याच मरणकळा भोगण्यासाठी स्त्रीचा जन्म होतो अशी भावना कवयित्रीच्या मनात निर्माण होते आणि म्हणून कवयित्री माझ्या जलमाच्या वेळी या कवितेत म्हणतात की –
आणि पुन्हा एकदा आली जलमाला
सोशिकतेचा वसा चालविणारी एक असहाय मादी
नरांच्या पिढ्या जलमाला घालण्यासाठी.
आयुष्यभराचं अभागीपण कपाळावर गोंदवून
पुन्हा एक ठसठसीत भाग्य आलं उदयाला
मरण कळा सोसण्यासाठी.
“वंशावळीच्या प्राचीन सरीतून…” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर स्त्रीचा अर्धा पदराने झाकलेला चेहरा दाखवला आहे. अतिशय गहन विषयाला स्पर्श करून कवितेला मुखपृष्ठावर साकारले आहे. स्त्री ही स्वतःला जपत असते, तिच्या चारित्र्याला डाग लागू नये म्हणून काळजी घेत असते. काहीही झाले तरी आपला डोक्यावरचा पदर ढळू देत नाही, लाक्षणिक अर्थाने पतीधर्म पाळून समाजाने घालून दिलेल्या बंधनात ती राहत असते. डोक्यावरचा पदर म्हणजे शालीनतेचे, स्त्रीसंस्कृतीचे लक्षण मानले जाते. घराच्या बाहेर पडतांना देखील कुणाच्या नजरेत भरू नये म्हणून ती डोक्यावर पदर घेत असते. विधवा झालेली स्त्रीदेखील पदराचे पावित्र्य जपत असते याच अर्थाने कवयित्री रांडव या कवितेत लिहितात की –
पोटुशी बाईनं जपून टाकलेल्या
पावलासारखंच असतं प्रत्येक विधवेचं पाऊल.
उंबऱ्याबाहेर पडतांना तिरप्या नजरा टाळून
सावरत असते डोक्यावरचा पदर
अन् पायातल्या निऱ्यांचा घोळ.
हल्ली लग्न झाले की गाव खेड्यातल्या मुलींनाही शहराकडे जाण्याचा कल दिसून येतो, मुली एकत्र कुटुंबपद्धती नाकारून विभक्तकुटुंबात राहणे पसंत करीत आहेत, हातभार बांगड्या, लालभडक कुंकु, जोडवी, नथनी, कुडकं अंगावर शोभून दिसणारा सांज नकोसा वाटतो, डोक्यावरचा पदरही या शहरीकरणामुळे खांद्यावर आला आहे. गावखेड्यातला आणि शहरीभागाचा हा विरोधाभास संगम या कवितेतून मांडताना कवयित्री लिहितात की –
गावच्या नदीचा डोक्यावरचा पदर
खांद्यावर उतरून वाहत गेला शहरी नदीच्या प्रवाहात.
एकत्र कुटुंबपद्धती गिळून
प्रायव्हसी नावाची भूक टाकू पाहतेय
गाव नदीच्या पदरात ही शहरी नदी.
“वंशावळीच्या प्राचीन सरीतून…” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर स्त्रीच्या माथ्यावर चोचीत गवताच्या काड्या घेऊन बसलेली चिमणी दाखवली आहे. यावरून स्त्रीचा संसारातील काटकसरीपणा, प्रपंचासाठी लागणारा पैसा थोडा थोडा करून जतन करून ठेवणे हा गुण दिसून येतो. काडी काडी वेचून खोप्यासाठी आपल्या प्रपंचासाठी लागणारी सामुग्री घरी आणून ठेवणे हा संसारातील आर्थिक समतोल राखण्याचे काम स्त्री करीत असते. हीच स्त्री आपल्या लेकीसाठीही तेवढीच चिंता करत असते ती मुलीची जास्त काळजी घेत असते आणि म्हणूनच तडफड या कवितेत ती अगतिकता दाखवतांना कवयित्री लिहतात की –
जरा कुठे तिला वेळ झाला की सैरभैर होतो जीव
तेव्हा कळतं कावळा घिरट्या घालत असतांना
झाडावरच्या घरट्यातील चिमणीची तडफड.
“वंशावळीच्या प्राचीन सरीतून…” या कविता संग्रहात एकूण सदुसष्ट मुक्तछंदातल्या कविता असून पाळी अन् बाई, आयुष्याचा पसारा, वेदना, झळ, बाई आणि चूल, खूण, सोन्याचा मुकुट या आणि अशा सर्व कविता स्त्री मनाच्या आर्त भावना, कुचंबना, अवहेलना अधोरेखित करणाऱ्या आहेत. ओटीपोटावरच्या कोरीव लेण्यांमध्ये घुमणाऱ्या घरंदाज हुंदक्यांचे आर्त स्वर मनोगतात गुंफून कवयित्रीने पुण्याचे परिस पब्लिकेशन या संस्थेकडून प्रकाशन करून वाचकांच्या हवाली केले आहे. सुप्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांच्या कल्पकतेने साकारलेल्या मुखपृष्ठाने वाचकांचे लक्ष वेधून घेतले आहे तर नवी मुंबई येथील साहित्यिक दुर्गेश सोनार यांच्या प्रस्तावनेने कलाकृतीला लौकिकता प्राप्त झाली आहे.

प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क – ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
कलाकृती परिचय:
कलाकृती – वंशावळीच्या प्राचीन सरीतून
साहित्य प्रकार – कवितासंग्रह

कवयित्री – प्रतिभा खैरनार, नांदगाव
संपर्क क्रमांक – ७२१९५ ५१६१४
प्रकाशक : परिस पब्लिकेशन, पुणे
मुखपृष्ठचित्रकार – अरविंद शेलार, कोपरगाव
● हे वाचा – आयुष्याच्या वाटेवर,अनुभव संपन्न कविता संग्रह