एसटीतील प्रवासाचे दिवस..!
पूर्वी गावाकडे कच्चे रस्ते असायचे.1990 पर्यंत कडधे गावापर्यंत डांबरी रस्ता होता. यापुढे भोरगिरी पर्यंत कच्चा खडीचा रस्ता असायचा. त्यावेळी हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच एसटी बस होत्या.लाल धुराळा उधळीत एसटी यायची.एसटीच्या पाठीमागे धुराचा डोंगर तयार व्हायचा. या धुराळ्यात मागचे काहीच दिसत नसायचे.एसटी आल्यावर आम्ही वाऱ्याची दिशा बघून एसटीचा धुरळा चुकवायचा प्रयत्न करायचो.
त्याकाळी रस्ते झाले नव्हते.त्यामुळे ठराविक ठिकाणीच एसटीची सेवा उपलब्ध होती.तेही कच्चे रस्ते होते.अनेक लोक एसटी पकडण्यासाठी घरातून तासभर आधीच पायवाटेने, राना माळातून, डोंगर वाटेने पायी चालत एसटीच्या स्टॉप जवळ येत असत.कधी कधी आधीच एसटी निघून जाई.नाईलाजाने मग लोक पायी चालत. मी सुद्धा अनेक वेळी असा प्रवास केला आहे.
त्यावेळी वाहतूकही तूरळक असायची.राजगुरूनगर – डेहणे ही एसटी सकाळी दहा वाजता डेहण्याला यायची. या गाडीत प्रामुख्याने शाळेचे शिक्षक,सरकारी कर्मचारी आणि ठराविक गावाकडचे प्रवासी असायचे.याच गाडीत सकाळ वर्तमान पत्र, पावच्या लाद्या आणि बटर खेड वरून पाठवत असत.पूर्वी 90 % लोकांकडे घड्याळे नसायची. ही गाडी आली म्हणजे दहा वाजले असे लोक बिनधास्त समजायचे.आणि त्या प्रमाणे कामाचे नियोजन करायचे.काही दिवसानंतर ही गाडी बंद झाली.
समस्थ पश्चिम पट्ट्याची आणि मुंबईकरांची आवडती गाडी म्हणजे परेल -भोरगिरी ही होय.सकाळी 9.40 वाजता ही गाडी डेहण्याच्या स्टॉप वर उभी असे. या गाडीला त्यावेळी प्रचंड गर्दी असायची.शनिवारी आमची शाळा सकाळी 9.30 वा. सुटायची.बऱ्याच मुलामुलींचा लोंढा डेहण्याच्या स्टॉपला जमा व्हायचा.त्या वेळी डेहणे ते शिरगांव तिकीट होती 75 पैसे. तर हापतिकीट होती 40 पैसे. बऱ्याच मुलांकडे हे पैसेही नसायचे. त्यामुळे बरीच मुले पायीच प्रवास करत असत.
काही लोकांना मुंबईला जायचं असल्यामुळे व होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता बसण्यासाठी जागा मिळावी म्हणून वाळद आव्हाट, खरोशी व डेहण्यावरून या गाडीने मुंबईकर प्रवासी भोरगिरीला जात. व येताना मुंबईचे तिकीट काढत असत.
अनेक लोक सणावाराला,यात्रेला,लग्नकार्याला व सुट्टीला बायकामुलांसह गावी येत.मुंबईकरांच्या मुलांची कपड्यांची फॅशन,पायातील बूट किंवा चपला आणि बोलण्याची स्टाईल खुपच रुबाबदार असे.परंतु गावाकडच्या पोरांना त्यांचे कधीच आकर्षण वाटायचे नाही.खाकी चड्डी, पांढरा शर्ट व बिगर चप्पलेचे कोठेही रानोमाळ भटकणे,ओढ्यात किंवा नदीत पोहणे, गोटया, विटीदांडू व क्रिकेट खेळणे,आंबे करवंदे, जांभळे खायला रानात भटकणे हाच त्यांचा खरा आनंद व समाधान होते.हे मुंबईकर पोरांना जमत नसे. त्यांना गावच्या पोरांचा हेवा वाटे.
गावची यात्रा असेल त्या दिवशी सारा गाव एसटी स्टॉपवर येऊन आतुरतेने परेल – भोरगिरी गाडीची वाट पाहायचा. मुंबईकर येताना देवासाठी हरतुरे, देवाच्या रंगीत मखमली छत्र्या, छात्र चामरे व हारतुरे घेऊन येत असत.लोकांच्या दृष्टीक्षेपात गाडी येताच सनई,चौघडे ही वाद्य वाजत्री वाजू लागत.स्टॉप वर गाडी उभी राहताच गाडी भोवती गर्दी जमा होई.साहित्य गाडीतून बाहेर काढले जाई. मुंबईकरांची सुट्टी संपल्यावर त्यांना गाडीत बसवून देण्यासाठी निम्मा गाव स्टॉपपर्यंत जात असे.
त्याही पूर्वी तळेगाव – टोकवडे ही गाडी तळेगाव येथून 7.30 वाजता तर खेड येथून सव्वानऊ वाजता निघत असे.तर डेहाण्याला आकरा वाजता येत असे. या गाडीत पोस्ट ऑफिसच्या पत्राची पार्सल येत असत..ही गाडी सर्वात आधी म्हणजे साधारण 1975 ला सुरु झाली.आणि त्यानंतर मग इतर दुसऱ्या.निवांतपणाने जगणारे लोक या गाडीने प्रवास करत असत.