जत्रा.!
कार्तिक महिना उजाडला म्हणजे गावाकडं चांगली कडाक्याची थंडी पडायची.सगळीकडे गारठा जाणवायचा. लोकांची गहू हरभरा रब्बीची पेरणी सुरू व्हायची.कापसाचं शितादही पूजन करून, सगळीकडे दहीभाताचं बोणं शिंपडून चांगल्या पीकाची आशा केली जायची. वेचणाऱ्या बाया सांगुन पहिला नवा वेचा काढल्या जायचा. शेतकऱ्यांच्या या पहिल्या घरात येणाऱ्या लक्ष्मीचं स्वागत केल्या जायचं. शेतात खाण्या लायक अंबाडीची भाजी, बारीक टमाटी, वायकं,शेंगा, भेंडी,गवारांच्या शेंगा,बरबटीच्या शेंगा खायला व भाजीला भरपूर उपलब्ध असायचं.आमचे आबा शेतात गेली म्हणजे धोतराच्या घोयात भरपूर काकड्या,वायकं,बोरं,चिंचा काहीना काही खायला हमखास आणायचे. सग्या, सोयऱ्यांनाही उडीद, भुईमूग, सुर्यफुलाचे बिया नवं म्हणून पायली भर सोबत बांधून द्यायचे. आदानप्रदान संस्कृती होती. पोरीच्या घरी बाप रिकाम्या हातानं कधी जायचा नाही.नवीन निघालेले काही ना काही सोबत लेकीकडे बांधून न्यायचा.
तसा हा महिना म्हणजे गुलाबी थंडीचा येथूनच गाव खेड्यातील यात्रा, जत्रांची सुरूवात व्हायची.गावातील सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण,भागवत, हरीपाठ सामुदायिक प्रार्थना,काकडा आरती,भजन कीर्तन रामधून,सडा,समार्जन, रांगोळी सारा गाव दणाणून जायचा. भक्तीमय वातावरणाची निर्मिती व्हायची.आमचे आबा बाजूच्या खेडयावर तुकाराम गाथा पारायणासाठी आठ, आठ दिवस सोबत अंथरूण पांघरूण पोथी,चंदन,आरसा, अष्टगंध, बुक्का एका कापडानं शिवलेल्या पुरचुंडीत बांधून न्यायचे.कधीकधी आबासोबत आम्ही पण जायचो.तो संस्कार ती शिदोरी मी अजूनही जशीच्या तशी जपली आहे.हे त्याचच फळ आहे. आमच्या दोन पिढ्या माळकरी निघणं बहुत सुकृताची जोडी म्हणावी लागेल. अजूनही जिथं धार्मिक कार्यक्रम होतात.तिकडे नकळत माझे पाय वळतात.हा आजोबांनी शिकवलेला वारसा आहे.
लोकांची एकमेकांच्या ओट्यावर सुखादुखाची मैफिल जमायची. पानसुपारी कात,चुना, तंबाखू आदरानं खिशातून हात घालून काढून द्यायचं.
याच दिवसात नवरात्राची चाहूल लागायची.गावात मोठमोठ्या आसामी, खटल्यात लोकांकडे नवरात्र बसायचं.गावरान ज्वारीच्या कडब्याची पाच धांडे, पुजेसाठी घट मांडणी नऊ दिवस नवरात्र बसायचं. अगदी भल्या पहाटे लोकं झोपेत असतांना गावातील डफळं वाजवणारा घट बसलेल्या घरोघरी जाऊन घरापरीस वाद्य वाजवायचा. गडीमाणसं हरखुन जायची.मन प्रसन्न व्हायचं. डफळ्याचा आवाज कानावर आल्यानं गल्लीबोळातील लेकरं बिना हातपाय, तोंड धुवायची डफळं वाजवणाऱ्या संग कुतुहल म्हणून उघडी,बोडखी निकाल सारा गाव फिरुन यायची. अशावेळी त्यांना आंग,तोंड धुवायचं भान नसायचं.डफळं वाजवणारा नऊ दिवस वाजवून दसऱ्याला त्याला त्या मोबदल्यात बिदागी म्हणून धान्य,पैसाअडका, सणासुदीच्या दिवसांत गोडधोड पुरणपोळी लाडू ,चिवडा,भजे कुरोळया वडयांचा पाहूणचार भेटायचा. त्याची सोबत आणलेली पाटी शिगोर भरून जायची. त्यामधे त्याची व त्याच्या कुटुंबातील लोकांची गुजराण व्हायची. अडल्या, नडल्याला उसनं,पासनं दिलं जायच. या कडाक्याच्या थंडीत मस्त चुलीवर गरम च्या पिऊन दवळीत रातची उरलेली शिळी भाकर असली,नसली ताटलीत मोडून च्या नाही तर बाबानं गोठयातून दोऊन आणलेल्या तवलीतल्या गाईच्या दुधासोबत खायची. थंडीच्या दिवसात आंघोळ करणं म्हणजे एक अग्निदिव्यच असायचं.रातची शेकोटी पेटवून साऱ्या एटायातली माणसं आंग शेकायची.अशावेळेस एखाद्याच्या छावन्याई वरच्या चोरून तुराटया, पऱ्याटया आणून शेकोटी पेटवायची.अशा वेळेस माहिती पडलं म्हणजे घरमालक चांगलं धरून हाणायचा.नाही तर कमरेखालचं बोलायचा. तेव्हा लाज, शरम सोडून खाली मान घालून आयकण्या शिवाय पर्याय नसायचा. इलेक्ट्ररीक बहुधा मोठ्या लोकांकडेच असायची. तेव्हा ना मोबाईल ना टिव्ही असलाच तर एखाद्या कडं तर ब्लॅक अँड व्हाइट फडताळ सारखे दोन झाकणं लागणारा असायचा. पारंपरिक खेळ डाबडुबळी,लगोरी, रेस्टीप,लंगळी, गील्ली दांडू,घोडी कित्तेकी,चोर पोलिस, लप्प्पन छिप्पन,गाराटया गोया,काचाळया गोया ज्या नळाजोळच्या मुलतान शेठ मारवाडयाच्या दूकानावर भेटायच्या. गारांच्या गोया ढोपरतांना ढोपरं फूटून रक्तबंबाळ व्हायचे. लगोरीचा चेंडू घरच्या पोतेरासाठी काढलेल्या कपड्याईचा बनविल्या जायचा. तो बरोबर पाठकोईत बसला म्हणजे तब्येत बरोबर व्हायची.असे सगळे खेळ असायचे.मोठी गंमत असायची.
आजूबाजूच्या परिसरातील गावखेडयातील यात्रा जत्रा सुरू झाल्या म्हणजे बैलगाड्या भरून बाया माणसं लेकरंबाकरासहीत देवदर्शनाले जायची. बैलगाडीत सुती तडवाची गोण्या बांधून, बसायला गोधड्या आथरून संग बैलजोडीला कडबा कुटार घेऊन परशराम महाराजांच्या जत्रेत पिंपळोदला जायची. तर लखमाजी महाराज संस्थान रंभापूर, बाग,सोमवतीत रामतिर्थ या ठिकाणी प्राचीन मोठं राममंदिर पाहण्याजोघं आहे.मंदिराच्या तेवढ्याच मोठी पुर्णानदी पुर्वीकडे वाहते. तीच्या पात्रात माणसं आंघोळी करत,गाई म्हशी पाणी पीत. आजुबाजुचा परिसर सुजलाम सुफलाम करण्यामागं पुर्णामायचं मोठं योगदान आहे.अशा ठिकाणी लोकं लहान मुलांना घेऊन जावळे काढायला बैलगाड्या घेऊन बायामाणसं जात.देवाला दहीभात,गोडधोडाचा नैवेद्य दाखवून स्वयंपाकपाणी बनवून सोबत बसून खात.वेळेस रस्त्यानं कल्ला, हल्ला करत बैलजोड्या उधळत रस्त्यानं गाडवाटेनं धुळळा उडवत बैलगाड्या निघायच्या. त्या धुळ्ळयानं आजूबाजूच्या शेतातलं पीक ही झाकाळून जायचं. रस्त्या लगतची लहान लहान हिव्याची झाडं चांकाची वंगणं लागून काळी पडून जत्रेतील पाऊलखुणा मागं सोडायची. कच्च्या रस्त्यानं व त्या धुरानं बैलगाड्यात मागच्या बगाळात बसलेली माणसं पावडर लावल्यासारखी पांढरीढरक होऊन जायची.त्यांच्या त्या जाण्याच्या आवाजानं कापुस वेचणाऱ्या बाया माणसं थबकायची व कामधंदा सोडून जत्रेत जाणाऱ्या बैलगाड्या न्याहारीत बसत मनातून हरखून जायची. त्यांनाही मग जत्रेचे वेध लागायचे.
‘मायबाई वं जत्रीले चालले वाटते सारे’
असे आपापसात कुजबुजायचे.व पुन्हा आंगमेहनतीच्या कामाले लागायचे. जत्रेला जाणाऱ्या बैलगाड्यांच्या आवाजानं दूर बाबुयच्या झाडावर मावच्यावर बसलेला रखवालीही शेतातील हरभरा कोणी उपडू नये म्हणून दोन शिट्टया जास्तीच्याच वाजवून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायचा. त्या आवाजानं लहान लहान पोरं पोलिस समजून चिडीचूप व्हायची.
जतरेत पोहचल्यावर मंदिराच्या परिसरात आजूबाजूच्या खाली झालेल्या शेताच नदीच्या काठावर बैलबंडया विश्रांती घ्यायच्या.नंतर बैलांना नदीवर पाणी पाजून चारा,पाणी करून मंदिर परिसरातील नळावर हातपाय धुवून पायातल्या चपला आपापल्या जबाबदारीवर ठेवून देवदर्शनासाठी रांगेत लागायची.लाहया फुटाण्यांचा प्रसाद वाटायची.देवाले नारळ फोडून अंगारा घेऊन लहान मुलांच्या अंगावरून ‘सुखाशी ठेव’ म्हणून उतरायची. नंतर तिकडून आल्यावर टाकीवर असलेल्या नळावर हातपाय धुवून संग बांधून आणलेल्या ताकातलं चून, भाकरीच्या शिदोऱ्या सोडायची.कोणी कोणी तर रोडगे जेवणाचा बेत ठेऊन आपले भावकीतली चार, दोन घरं,आजूबाजूच्या परिसरातील सोयरे, धायरेही बलाऊन घ्यायचा. नदीच्या पात्रात रेतीवर तडव टाकून घरून सोबत बांधून आणलेल्या साहित्याची चाचपणी करून चार, दोन बाया सयपाकाले सुरवात करायची. घरातली माणसं जगरं पेटवायची. सगळीकडं धुरच धूर दिसायचा. दोनचार बादल्या पाणी आणून देवाले नैवेद्य दाखवून
‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे,सहजवन होते नाम घेता फुकाचे.जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म.पंढरीनाथ भगवान की जय म्हणत
अंगत,पंगत बसायची. ज्यांच्या जवळ ही व्यवस्था नव्हती त्यांना काल्याचं किर्तन झाल्यावर मंदिरातच महाप्रसादाची व्यवस्था होती. मंदिराच्या परिसरात मोठमोठ्या पंगता बसायच्या.तरणीताठी पोरं कंबरेले दुप्पटे अडसून हातात पत्रावळी व भाजीच्या वरणाच्या बकेटा घेऊन भराभर वाढायची.चारपाच पंगतीत सम्पूर्ण भंडारा हाताखाली यायचा.जेवचं आटोपली की पानसुपारी चुना तंबाखू खाकरीची चिलिम यांची देवाणघेवाण व्हायची.सोयरीक समंदाच्या गोष्टी बाता व्हायच्या. लगनाले काढलेल्या पोरीसोरी चारचौघांना घरच्या बाया माणसांना दिसायच्या. त्याईचा स्वभाव,रहनसहन, रितीरिवाज,शिक्षणपाणी समजायचे.कोणताही बायोडाटा न देता तेथेच पोरीसोरी पास करायच्या.हे या लोकांच अफलातून मानसशास्त्र होतं. निरक्षर असूनही त्यांच्यातल्या उपजत व्यवहार ज्ञानाचा अनुभव दांडगा होता. म्हणूनच त्यांना आजच्या सारखे विवाह मेळावे भरवण्याची गरज नव्हती. त्यांची ही पद्धत म्हणजे आजचे सुटाबुटात,टाय, कोटात वावरणाऱ्या आधुनिक काळातील मेळाव्याचं आयोजन करणाऱ्या विद्वानांना झणझणीत चपराकच होती.
साऱ्याईची जेवणं झाली म्हणजे बाहेरगावाहून दूरूनदूरून आलेल्या आकाश पाळणे, जलसे ,तमाशे,मौत का कुऑ, टुरींग टॉकीज वाला मोठमोठ्यानं चला सुरू होत आहे चालू होत आहे म्हणून माईक वरून बोंबलायचा. सारा गजबजाट रहायचा. गर्दी एवढी की मायले लेकरू घेणं भारी असायचं. चोरा,चिलटांचा,पाकीटमारांचा बंदोबस्त करण्यासाठी गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पोलिसांच्या राहुट्या तंबु ठोकून पंधरा तीन हप्ते रहायच्या. दुकानांमधून कपडेलत्ते, स्वयंपाकाची भांडी खलबत्ते,कढई,गंज,पाटे, वरवंटे,झ्यारे,चमचे,सराटे, वाट्या,प्लेटा कपडे, लत्ते,स्वेटर, मफलर लहान मुलांना खेळण्याचं साहित्य डमरू,भोंगे, पुंग्या, रंगीबेरंगी चष्मे, पायातल्या चपला, शेवचिवडा मुरमुरे, चिरंजीचे दाणे, पोंगापंडीत विकत घेऊन द्यायची. एखादं लहान पोरगं मनाजोगं ईकत घेऊन नाही दिलं म्हणजे हातपाय आपटून खाली जमिनीवर लोंटागन घ्यायचं. त्याले घरची बाई समजावून, समजावून थकून जाऊन शेवटी साजरे पाठीवर धपाटे लावायची. पोट्टं लाय शेबुंड एक करून दम चोरून शांत व्हायचं.अशी तं गंमत होती.जतरा फिरून झाल्यावर लोकं कळसाले हात जोडून प्रसाद घेऊन आपापल्या गावी निघून जायची.व आपापल्या नेहमीच्या कामाधंदयाले लागायची. वर्षभर राबराब राबून आंबून गेलेल्या जीवाला या जत्रा,यात्रा निमित्त नवीन उर्जा मिळावी त्यासाठी ही सण,जत्रा, यात्रा ही परंपरा आपल्या पूर्वजांनी लावून दिली होती.तोच रितीरिवाज लोकं नेमानं पाडायची.दिवस डुबायला लागला म्हणजे बैलजोड्या आवराआवर होऊन खांद्यावर दिल्या जायच्या.निघतांना अंधार पडायचा. गावच्या नाल्यातून , नदीतून पाण्यातून बैलजोडी काढतांना चुबूक,डूबूक आवाज यायचा.पोरंसोरं उभी राहून खुटाळयांना हातात धरून जोरजोराने कल्लोळ करायची. रस्त्याचा थंडगार वारा सुटला म्हणजे जीव गारेगार होऊन जायचा.
एकदाचे बोरांगन ओलांडलं म्हणजे दूरून गावची लाईटं काजव्यां सारखी चमकायची. नंतर गोदरीजवळ हवेच्या झोकानं गाव जवळ आल्याची चाहूल लागली की लहान लहान लेकरं चेकाळायची. मोठमोठ्यानं किंचाळायची त्यांच्या त्या आवाजानं गावात अस्मानी सुलतानी संकट आल्याचं पाहून रस्त्यावर बसलेली कुत्री भुंकत सारा गाव दणाणून सोडायची. गावातील लेकरं कोणाच्या बैलजोड्या आल्या म्हणून घराच्या ओट्यावर उभं राहून उत्सूकतेने बघायची.घर आल्यावर पटापट उड्या टाकून हातपाय धुवून जतरील्या आणलेल्या सामानाची फेरतपासणी व्हायची. बैलगाडीच्या झटक्यानं एक दोन खेळण्याची चाकं निखळून पडायची. अशावेळी खेयणं तोडलं म्हणून घरातलं पोट्टं ऐनवेळेवर तिथंच भोंगा पसरवायचं. ऐकलं नाही म्हणजे अशावेळेस एखाद्या वेळी मोठ्या माणसाकडून चांगली बदकाडणीही बसायची. माणसं थकलेल्या बैलांना चारापाणी करायची.व बाया मंडळी जत्रीतून ईकत आणलेल्या भाजीपाल्याची थैली काढून सोबत आणलेल्या सामानाची निसनास व्हायची. शक्यतो चुलीवरच्या खमंग भाकरी व वांग्याचं भरीत संभार व हिरव्या कांद्याची पात टाकून फसकलास लागायचा. किरकिर रातकिड्यांच्या सोबतीला मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात साऱ्यांची जेवणं खावणं आटोपली म्हणजे आंगातली थंडी पळवण्यासाठी आंगणात शेकोटी पेटवली जायची.व चौफेर बसून चंद्राच्या लख्ख उजेडात लोकांच्या गप्पाटप्पा व्हायच्या. दिवसभराच्या थकव्यानं गोठ्यात बैलं डोये लाऊन निवांत रवंथ करत बसायची.चंद्र जसाजसा वर चढला म्हणजे तसतशी रात्र चढायची.झोपेसाठी आथरून पांघरूण सारवलेल्या ओसरीतच तडव आथरला जायचा.सारी मंडळी थकून भागून अंगावर पांघरून घेऊन कंदिलाच्या धुसर प्रकाशात मस्त झोपी जायची.खुप सोनेरी दिवस होते ते.
–विजय जयसिंगपुरे
अमरावती
भ्रमणध्वनी -९८५०४४७६१९