“आम्ही साखर केव्हाच सोडली “ एक काळ होता साखर म्हणजे प्रतिष्ठेचा गोड पदार्थ. अशा आख्यायिका सुद्धा आहेत की, राजाला खूप मोठे यश मिळाले किंवा आनंद झाला की, हे राजे हत्ती वरून मिरवणूक काढून आपल्या राज्यात प्रजेला साखर वाटायचे. आपला आनंद व्यक्त करायचे. राजाने साखर वाटणे म्हणजे एक प्रतिष्ठा होती. एक काळ हा पण होता की, साखरेचा चहा पिणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण होतं. गुळाचा चहा पिणे म्हणजे दुय्यम लक्षण होतं. अगोदर, पाहुणे म्हणून बाहेर गावी गेले की, पाहुण्यांना चहाला बोलवायचे. त्यात साखरेचा चहा म्हणजे ज्याने आमंत्रण दिले तो म्हणजे खुप श्रीमंत किंवा प्रतिष्ठित व्यक्ती समजायचे. गुळाचा चहा ऑफर करणे म्हणजे गरीब असल्याचे समाजात समजायचे. तेव्हा ह्या दोन गोड पदार्थां मध्ये नकळत स्पर्धा आणि वरिष्ठ-कनिष्ठ असा दर्जा समजल्या जायचा. तेव्हा साखर ही गुळा पेक्षा श्रेष्ठ असल्याचे समजले जायचे. साखरेला सुद्धा खूप अभिमान असायचा. जणू काही साखर गुळाला हिणवायची आणि बघ मी कशी श्रेष्ठ आहे अशी ती मिरवायची. तसे बघितले तर दोघांचा उगम हा ऊसा पासूनच झालेला. दोघेही एकाच मायेचे ( ऊसाचे ) लेकरं. पण नाही त्यातही उजवं, डाव व्हायचं. मीच श्रेष्ठ असा जणू अहंकार साखरेचा असायचा. काय मार्केट होतं सारखेच. काय शेअर वधारलेला होता साखरेचा. सुपर हिट जमाना होता साखरेचा. रेशन दुकानांमध्ये साखरेसाठी रांगच रांग असायची. श्रीमंतांची सुद्धा रेशन कार्ड फक्त साखरेसाठीच असायची. असं म्हणतात ना की प्रत्येकाचे दिवस असतात. हर कुत्ते के भी दिन होते है| साखरेला आपल्या सौंदर्यावर खूपच गर्व होता. जिकडे-तिकडे साखरेचीच मागणी होती व ती पण सगळीकडे मिरवतपण होती. होळी सणाला साखर गाठीच्या रूपात खूपच भाव खाऊन जायची. असे म्हणतात ना परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. परिवर्तन हेच सत्य आहे. परिवर्तनाच्या सोबत राहिला तोच टिकला, अजरामर झाला. आणि हो खरचं दिवस पालटले, साखरेचे मार्केट डाऊन झाले. गर्वाचे घर खाली झाले. आज काय म्हणतात, कमी साखर, कम शक्कर| बिना साखरेचा चहा पाहिजे. अगोदर पेढा पूर्ण खायचे, आता तर मोठ्या कष्टाने अगदी लहान तुकडा तोडून खातात. डॉक्टर म्हणतात साखर बंद करा. नो मोअर शुगर प्लिज. साखरे मध्ये गंधक असतो म्हणे आणि तो मानवाच्या आरोग्याला घातक असतो. आपली प्रकृती सांभाळण्यासाठी साखरेला आता प्रत्येक जण लांबच ठेवायला लागले आहे. आता गुळाला पसंद करायला लागले आहेत. गुळाचे मार्केट वधारले आहे. गुळाचा चहा, काढा पसंद करायला लागले. आमच्या कडे ‘गुळाचा गावरानी चहा मिळेल’ अश्या पाट्या झळकू लागल्या आहेत. साखरेच्या आणि गुळाच्या स्पर्धेत गुळ आपल्या चांगल्या गुणधर्माने कधीच पुढे निघून गेला हे गर्विष्ठ साखरेला कळले सुद्धा नाही. गुळ काळा होता. पण गुणाने फार गोड होता. पाचक होता. आता तर जेवणा नंतर गुळ आवर्जून खाल्ल्या जातो. अशी गुळाची मागणी आहे. काही मुली तर गुळ काळा आहे म्हणून खात नव्हत्या कारण काय तर गुळ खाल्ल्याने काळी होईल म्हणे आणि नवरदेव मिळणार नाही म्हणे. पण गुणवत्तेच्या कसोटीवर शेवटी गुळचं श्रेष्ठ ठरला. सौंदर्यवती साखरेचं सौंदर्य केव्हाच हरवून गेलं. आता साखर दिसायला सौंदर्यवान आहे पण गुणाने मात्र काळी आहे. पण गुळाचे तसे काही गुळ मात्र गुणाने फार गोरा आहे. शांत पण आहे आणि सर्वाना हवा हवासा आहे. हे झालं साखर आणि गुळ ह्या दोन गोड पदार्थाचं. आता आपण माणसाच्या स्वभावाकडे वळूया. काय माणूस होता ? काय जीव लावत होता ? काय दयाळू होता ? काय त्याच्यात माणुसकी होती ? तो एकमेकाला मदत करायचा. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचा. एखाद्याकडे दुःखद घटना घडली की अख्खा गाव हळहळायचा. त्याच्याकडे अन्न शिजायचं नाही. दुसरे शेजारी पाजारी जेऊ घालायचे. नवीन कपडे दिवाळीला आणले की, नवीन कपड्याची घडी मोडायला शेजारी द्यायचे. असा हा जिव्हाळा होता. माणसात तेव्हा जिव्हाळा असायचा. नवीन एखादा पदार्थ झाला की तो शेजारी शेअर केला जायचा. मग तो गोड पदार्थ असो की नाविन्याची भाजी. ह्यात एकप्रकारचा गोडवा होता, साखर होती. आता हल्ली हा गोडवा दिसत नाही, ही साखर केव्हाच संपली. पूर्वी लग्न म्हटलं की, उत्साह असायचा. लग्न घरी बरीच वर्दळ असायची. लग्न घरी मदत करायला सर्वजण आनंदाने धावायचे. शारिरीक श्रम करायचे. धान्य निवडण्या पासून तर दळण्या पर्यंत सर्व सोपस्कार व्हायचे. टीम वर्क असायचे. कामाची वाटणी व्हायची. प्रौढांनी ही तर, मुलांनी ही कामे करायची हे नेमून दिलेलं असायचं. कंटाळा कुठेही नसायचा. सर्व आनंदाने, गोडीने व निस्वार्थी भावनेने व्हायचे. हल्ली माणूस बदललेला आहे. त्याच्यात ठासून ठासून इगो (अहंकार) भरलेला आहे. तो कपटकारस्थानामध्ये रुची घेतो आहे. ह्याचा गेम, त्याचा गेम करतो आहे. त्याला दुसऱ्याचे सुख चांगले बघवत नाही. दुसऱ्याचे चांगले झाले की दुःख होते. जलसीवृत्ती सगळीकडे वाढलेली आहे. एकमेकाला संपविण्याची भाषा करतो आहे, संपवितो आहे. ओठात एक आणि त्याच्या पोटात एक आहे. काल रोहित मिश्किल पणे सूर्यकुमार यादवला म्हटला, तुझ्या हातात झेल बसला, बसला नसता तर, तुला बसविले असते. हे एका खेळाडूने प्रतिक्रिया दिल्या. म्हणजे भाषा संपविण्याची आणि बसविण्याचीच आहे. त्याला प्रतिक्रिया आयोजकांनी दिली की, काही दिवसापूर्वी आम्ही एकाची विकेट काढली. म्हणजे शहाला काटशह हीच वृत्ती आहे. थोडक्यात माणुसकीतील, नात्यातील गोडवा...