यशोगाथा तिच्या संघर्षाची
पाचवीला असल्यापासून ती कष्टाशी भिडत राहिलेली.तिच्या आजी आजोबांसोबत भाजीपाला विकता विकता एम. कॉम. पर्यंत शिक्षण तिने घेतलं.आयुष्याच्या त्याच वळणावर तिचं लग्न माझ्यासारख्या फाटक्या माणसासोबत झालं.त्यावेळी मी वॉचमन होतो.आमचं लग्न झालं खरं परंतु एकमेकांच्या संघर्षाला सोबत घेऊनच आम्ही बोहल्यावर उभे राहिलो. आमच्या दोघांच्या मध्ये असणारा अंतरपाट आजही आठवतो मला.त्या पांढऱ्या वस्त्रावर त्याक्षणाला कदाचित आमच्या दोघांच्या आयुष्याचं ध्येय एकत्र येऊन नटलेलं असावं.
लग्नानंतर तिचं शिक्षण पाहता मी तिला अगदी दुसऱ्या दिवशी म्हणालो सुध्दा, “ दिपाली एम. कॉम.झालेलं आहे. घरात बसून चालणार नाही.पुढं ही शिक आणि नोकरी ही कर.मी सोबत राहीन.” त्यावेळी तिने मला उत्तर दिलेलं. ती म्हणाली होती, “ आयुष्यात नोकरी करायला मला कधीच जमणार नाही.घर, संसार या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून मला ते शक्य ही होणार नाही.. आणि काही करायचं असेल तर मी माझा स्वतःचा छोटा का होईना पण व्यवसाय करीन.”
तिचं बोलणं ऐकून मी हादरून गेलो होतो. कारण कर्ज काढूनच लग्नाचा मंडप मी उभा केलेला होता. व्यवसाय करायला भांडवल लागतं ते आपल्याकडे नाही. ती वेदना घेऊनच दिवस ढकलत गेलो.
एके दिवशी ती मला म्हणाली, ती लग्नाच्या दिवसापासून मला माझं आडनाव घेऊनच बोलते.ती म्हणाली, “ चंदनशिवे मला शिलाई काम शिकायचे आहे. घरी बसून काहीतरी करता येईल मला.” मी फक्त लढ म्हणलं.आणि तिच्या माहेरी पडून असलेली जुनी शिलाई मशीन मी घेऊन आलो.ती जरा दुरुस्त केली. आणि ती मशीनवर शिवायला बसली. तिने एका ठिकाणी क्लास लावला.आणि बघता बघता वर्षाच्या आत तिला ऑर्डर मिळायला लागल्या सुध्दा. याकाळात आम्ही पालक झालो. ती आई आणि मी बाबा झालो.
माझ्या कवितेच्या प्रवासाला माझी नोकरी छळत होती म्हणून मी नोकरी सोडली. ती ही तिच्याच सल्ल्याने. आणि नोकरी सोडली तेव्हा आम्ही पुणे ही सोडले. आणि गावी आलो.
कोरोनाच्या काळात माझे कार्यक्रम बंद झाल्यानंतर फार अडचणी आल्या. पण मी लढलो. मिळेल ती कामे केली आणि त्या ग्रहणातून माझ्या आयुष्याचा उजेड सुरक्षित बाहेर काढला. गावाकडे असल्यामुळे आई वडील सोबत होते. ते आत्मिक समाधान असल्यामुळे लढायला बळ मिळालं. माझा प्रवास पुन्हा सुरू झाला. राज्यभर सुरू असणारा प्रवास जगभर व्हायला सूरवात झाली. या काळात माझी बायको खंबीरपणे सोबत राहिली. पण माझ्यासोबत उभी राहताना ती शांत बसलेली नव्हती..
तिने शिलाई कामाचा व्यवसाय गावी ही सुरू केला.चांगला प्रतिसाद मिळाला. मग बचत गटांचा आधार घेऊन तिने छोटेसे साडी सेंटर सुरू केलं. त्यातही ती यशस्वी झाली. शिलाई आणि साडी सेंटर चांगले सुरू असताना, तिने किराणा दुकान टाकायचे ठरवले.या प्रत्येक निर्णयात तिने मला सोबत घेतले. मी फक्त एकच वाक्य बोलत राहिलो. “तू लढ मी आहे.” कारण मी लढताना तिने मला कधीच थांबा म्हणलेलं आठवत नाही.
बघता बघता किराणा दुकान तिने सुरू केलं. आणि दुकानाला नाव दिलं. ‘संसार किराणा स्टोअर.’ ग्राहकांना ते फार आवडलं.या काळात आम्ही दुसऱ्यांदा पालक झालो. दुसऱ्यावेळी मात्र आमचं स्वप्न पूर्ण झालं नाही. कारण आम्हाला मुलगी हवी होती पण मुलगाच झाला. थोरला निर्भय आणि धाकटा नेल्सन. नेल्सन पोटात असताना ती नेल्सन मंडेला यांचं आत्मचरित्र वाचत होती. त्यामुळे मुलगा झालाय म्हणल्यावर त्याचं नाव तिनेच नेल्सन ठेवलं. मलाही ते फार आवडलं.
किराणा दुकान सुरू असतानाच तिने त्यातच बेकरी सुरू केली. बेकरी होता होता जॅक कंपनीच्या मोठ्या शिलाई मशिनी तिने घेतल्या. ती स्वतः शिवण क्लास घेऊ लागली. म्हणजे शिलाई काम, किराणा दुकान, बेकरी, आणि साडी सेंटर हे एकत्र ती चालवू लागली.
आता मागच्या महिन्यात तिने विषय काढला. आणि मला म्हणाली, “चंदनशिवे इथं पिठाची गिरणी नाहीय जवळ कुठं. लोकांना फार दूर जावे लागते. करूया का प्लॅनिंग.?” नेहमीप्रमाणे मी म्हणलं..लढ.
एक महिन्यानंतर चांगल्या कंपनीची व्यावसायिक असणारी पिठाची गिरणी तिने घेतलीच. आणि पहिल्याच दिवशी ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला. ती गिरणी वर धान्य दळताना मी तिला बघितलं. पांढऱ्या पिठात रंगलेली ती. आमचा सगळा संघर्ष आठवून मला हुंदका आवरता आला नाही. तिने कधी मेहंदी लावलेली आठवत नाही.तिने कधी दागिण्यासाठी हट्ट केलेला आठवत नाही. एक स्त्री म्हणून ती नटलेली ही मी पाहिलं नाही.आम्हाला दोन मुलं झाली. पण डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नाही की कसले फोटो काढले नाहीत. कारण या सगळ्या गोष्टींना वेळच मिळाला नाही.
आज ती गिरणीत धान्य टाकून खुर्चीवर बसलेली असताना त्या गिरणीच्या आवाजात मी तिला जोरात विचारलं, “आता पुढं काय दिपाली..?” तर ती हसत हसत म्हणाली,
“ चंदनशिवे, आता ध्येय एकच आपला स्वतःचा मॉल असेल मोठा.ज्यात सगळ्या वस्तू मिळतील. कपड्यांपासून ते किराणा पर्यंत, चप्पल पासून ते बेकरी पर्यंत सगळं सगळं एकाच जागी आपण उपलब्ध करायचं. असा मॉल उभा करायचा आहे मला..” मी पटकन म्हणलं.. म्हणजे त्या “डी मार्ट सारखं..” ती मान डोलवत म्हणाली “हो अगदी तसाच मॉल..पण त्याचं नाव असेल डी. एन. मार्ट म्हणजे दिपाली नितीन मार्ट.” मी तिचा हळूच फोटो काढत फक्त इतकंच म्हणलं… “ लढ ”
– दंगलकार नितीन चंदनशिवे
कवठेमहांकाळ
सांगली.
070209 09521