
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस! ४७१ कोटींची लॉटरी, पण आंदोलनाचं दिवा विझेल?
मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीच गोड बातमी आली आहे. एकीकडे १३ ऑक्टोबरपासून आंदोलनाचा बिगुल फुंकला असतानाच सरकारने ४७१.०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्याचा पगार वेळेत देण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे एसटीच्या तब्बल ८३ हजार कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीपूर्वीच आनंदाची लखलख झळकली आहे.
पगारासोबतच आता महामंडळाने कर्मचाऱ्यांना “सण उत्सव अग्रीम” उचल देण्याची घोषणा केली आहे. या योजनेनुसार इच्छुक कर्मचाऱ्यांना ₹१२,५००/- पर्यंतची उत्सव अग्रीम रक्कम मिळणार आहे. मात्र, यासाठी काही अटी आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ₹४३,४७७/- पेक्षा जास्त आहे, त्यांना ही अग्रीम रक्कम मिळणार नाही. तसेच, ज्यांची सेवानिवृत्ती पुढील १० महिन्यांत होणार आहे, त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
महामंडळाच्या पत्रकानुसार, इच्छुक कर्मचाऱ्यांनी आपले अर्ज आपल्या विभाग नियंत्रकांकडे १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत जमा करायचे आहेत. अर्ज फक्त शाखा प्रमुखामार्फतच पाठवायचे, अन्यथा ते ग्राह्य धरले जाणार नाहीत, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे.
दरम्यान, २१ ऑक्टोबरला येणाऱ्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांना हा दिलासा मिळाल्याने आंदोलनाची तीव्रता काहीशी कमी होईल का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. एका बाजूला आंदोलनाची तयारी आणि दुसऱ्या बाजूला दिवाळीची “गोड लाच” आता कर्मचाऱ्यांचा दिवा सरकारकडे उजळतो का, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी…