
सोनालीचा अर्ज… डोळे पाणावणारी विनंती!
प्रति,
मा. प्राचार्य,
कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,
छ. संभाजीनगर,
विषय- मागील गैरहजेरी माफ करून आणखी विशेष सुट्टी मिळणेबाबत ……
अर्जदार- एस. जी. जाधव,
संगणक शाखा,(तृतीय वर्ष )
सर, मी आपल्या महाविद्यालयातील तृतीय वर्षातील कंप्युटर शाखेतील विद्यार्थिनी आहे. सर, मागच्या आठ- दहा दिवसांपासून मी गावी गेल्यामुळे महाविद्यालयात उपस्थित राहू शकले नाही. तरी माझी आपणास नम्र विनंती आहे की, माझी ही गैरहजेरी मंजूर करावी. तसेच सर आणखी दोन आठवड्यासाठी विशेष सुट्टी मिळावी, हि विनंती.
सर, तुम्हाला माहित आहे की, मागील दोन्ही वर्षात आपल्या महाविद्यालयात संगणक शाखेत मी प्रथम आलेली आहे आणि एका विषयात मला विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळाले आहे.
सर, तृतीय वर्षात शिकत असताना आणि शैक्षणिक सत्राच्या मधेच मी सुट्टी मागत आहे. पण माझा नाईलाज आहे. मला हे सर्व तुमच्यासमोर मांडायचे नव्हते. पण तुमचा स्वभाव मदत करण्यास तत्पर आणि प्रेमळ आहे. म्हणून हे सर्व तुमच्यासमोर मांडूनच सुट्टी मागावी, असा मी विचार केला. सर, मध्यंतरी आठ-दहा दिवस सतत पाऊस चालू होता. गोदावरीच्या काठावर खेडेगावात राहणाऱ्या माझ्या आईवडील आणि बारावीत शिकत असलेल्या माझ्या भावाशी माझा काही केल्या संपर्क होत नव्हता. आणि इथे वर्तमानपत्रात तर पाऊस आणि पुराच्या बातम्या रोज येत होत्या. एकदाचा पाऊस जरा कमी झाला आणि जिथे माझ्या खेडेगावात जिल्हा- तालुका आणि तिथून परत वाहने बदलत गेले तरी तीन तासात पोचता यायचं, तिथं जायला मला आठ तास लागले. सर माझे आईवडील आणि भाऊ माझ्या गावात नव्हतेच. शेजारच्या गावातील एका ओळखीच्या काकांच्या घरी त्यांच्या गोठ्यात ते आठ दिवस राहिले होते. अनेकांना विचारत विचारत मी तिथे पोचले. गोठ्याच्या दारातून आत डोकावताच भिंतीच्या कडेला बसलेली माझी आई धावत पळत आली आणि माझ्या गळ्यात पडून धाय मोकलून रडू लागली. गुढघे मुडपून दोन पायांवर भिंतीला टेकून सून्नपणे बसलेला माझा बाप मला बघताच माझ्या नजरेला नजर न देता डोके दोन्ही गुडघ्यांवर टेकून त्याच्याच डोक्यातल्या टोपीने डोळे पुसत होता. त्याच्या शेजारी बसलेला माझा भाऊ राजू कधी माझ्याकडे कधी आईकडे तर कधी बापाकडे बघत सुन्न नजरेने हे सर्व न्याहाळत होता. आईचे हुंदके थांबत नव्हते. बापाची नजर काय झालं असावं? हे सांगत होती. आई वडिलांना मी शांत केलं. “काय झालं असेल हे होऊ द्या. पण आपण जिवंत आहे ना? मग बघू काय करता येईल ते. पण तुम्ही रडू नका”, असं मी समजावले. तेव्हा कुठे ते शांत झाले. मी काही न बोलता शांत बसून होते. थोडावेळ कुणीच काही बोलले नाही. हळूच माझ्या वडिलांनी म्हणजे दादांनी काय झालं? ते सांगायला सुरुवात केली.
“आक्का, (मला घरी सर्व जण आक्का म्हणतात) काही राहिलं नाही बग आता. सम्दं गमावलं बग. आठ दिस झालं. सकाळच्या पारी दिवस उगायच्या वक्ताला सगळीकडं आरोड उठला. पूर आला रे, पूर आला. पळा. पळा.” बाहेर तुफान पावूस चालू होता. कोण एवढं ओरडतय, म्हणून म्या दारातून डोकावलं, तर समोरचा आपला गोठा दिसत नव्हता. बाजूच्या ओढ्यातलं पुराचं पाणी गोठ्यात शिरून छपरासह आपल्या गोठ्यातली सगळी जनावरं घेऊन चाललं व्हतं. तुझ्या आईला मी मोठ्यानं आवाज दिला. “गोठा पडला रे, गुरं वाहून चालली, उठा लवकर,” असं म्हणून मी गोठ्याकडे पळणार तेवढ्यात आपल्या घराची पण उगवतीची चुलीकडची भिंत पडली. त्या आवाजाने घाबरून आम्ही तिघे पावसात बाहेर पळालो. तर बाहेर मोठा आरडाओरडा ऐकू येत होता. “पळा रे, पळा. गावात पुराचं पाणी घुसलंय.” सगळीकडे नुसता गोंधळ चालू होता. पुढच्या दहा पंधरा मिनिटांत सगळे लोकं जमेल तसे अंगावरच्या कपड्यानिशी जमतील ती जनावरे सोडून देऊन माळावरच्या भवानी आईच्या देवळाकडे पळत सुटली. माणसं वाचली सगळे. पण खूप जनावरं डोळ्यांदेखत वाहून गेली. आपली सोनी गाय आणि तिचं वासरू बी वाहून गेलं.” दादा हुंदका दाबून सांगत होते. तीन चार महिन्याचा सोनी गायीचा पांढराशुभ्र गोऱ्हा होता. आणि या वर्षीच्या पोळ्याला राजुने त्याला खूप छान सजवला होता. “आक्का, काय बी शिल्लक रायलं नायी बग. घर पडून सपाट झालं. गोकुळासारखा भरलेला गोठा जनावरांसह वाहून गेला.” दादांचा आवाज जड झाला होता. डोळ्यांतील पाणी गालांवरून खाली वाहत होते. पण ते न पुसता ते तसेच शांत बसून राहिले. कुणी काही बोलत नव्हते. आईचा आवाज निघत नव्हता. पदर डोळ्यांशी धरून ती तशीच सुन्न नजरेने खाली बघून हे ऐकत होती. मला ही काय बोलावं? सुचत नव्हते. पण दादांच्या जवळ बसून त्यांच्या हातावर हात ठेवून म्हणाले, “दादा, शांत व्हा. आपण सगळे आहोत ना ठीक? मग होईल हळूहळू सर्व ठीक. तुम्ही रडू नका.”
स्वतःला सावरत दादा पुढे सांगू लागले. “काय सांगू आक्का, आपलं ओढ्याच्या काठचं आख्खच्या आख्ख शेत वाहून गेलं बघ. विहीर कुठं होती ती सापडत नाही. आपलं वावार नेमकं कुठं व्हतं? मला सापडायला तासभर लागला. वरच्या कडेला बांधावर एक जुनं बाभळीचं झाड व्हतं. ते उपटून खाली पडलं. पण त्येच्या वरून समाजलं, ह्ये आपलं शेत हाय. आक्का, कपाशी पुरुषभर वाढली होती. औन्दा कापसाचा चांगला पैसा येईन, असं वाटत व्हतं. म्हणलं, तुझ्या आईची गळ्यातली पोत तुझ्या शाळेसाठी मागच्या वर्षी गहाण ठेवली, ती सोडवू. सोसायटीचं कर्ज फेडू. काही पैसं तुला आणि राजुला शाळेला व्हतीन. जमलं तर यंदाच्या साली तुझ्या आईसाठी एक दागिना बी बनवू, असा इचार करत होतो. पण आक्का, सगळं पुरात वाहून गेलं बग. आता मी काय करू? मी पण पुरात वाहून गेलो असतो तर किती बरं झालं असतं. नायतर घराच्या भिंतीखाली मेलो असतो तरी बरं झालं असतं. देवानं ह्ये काय केलं? मी आता काय करू? माज्या लेकरांना कसं जगवू?” असं म्हणून दादा दोन्ही हातांनी त्यांच्या तोंडावर तडातड मारून घ्यायला लागले. मी त्यांचे दोन्ही हात पकडले. आई समजावून सांगायला लागली. आसं रडून कुठं जमेल काय? झालं ते झालं. आपलं एकट्याचं थोडं नुकसान झालं. आलंय आपल्या नशिबाला भोगायला, त्याला आता काय इलाज नायी. देवानी तोंड दिलेय, हात-पाय हायेत कि आपले धटधाकट. कसं बी पॉट भरू. मला काय नको त्यो दागिना. आपली पोरं बी मोठाली हायेत. त्यांना बी सगळे समजतं. शिकतील कशी बी रडत-कढत. आपण हायेत ना सगळे ठीक. असं रडून का कुठं इघ्न जाणार ह्ये का? दुःख कोणाला टळलं ह्ये का? एवढा मोठा राम, त्येला बी वनवास व्हताच की. तसं आपल्या बी वाट्याला कायतरी आलं हाय.” आई समजावून सांगत व्हती. थोड्या वेळानं दादा शांत झाले.
तेवढ्यात आम्ही जिथे थांबलो होतो त्या घरच्या मावशी आल्या. मला बघताच त्यांनी, “कधी आलीस गं सोनाली?” असं विचारलं. “आत्ताच आले, पंधरा वीस मिनिटं झाले.” मी बोलले. आमच्या सर्वांचे चेहरे पाहून त्यांना आमच्या रडारडीचा अंदाज आला होताच. “चला घरी. आपण चहा घेऊ.” त्या बोलल्या. कुणी काही बोलेना, हे पाहून त्या जरा मोठ्या आवाजात बोलल्या, “पावसानं काय फक्त तुम्हालाच तरास दिला, असं नायी. सगळ्या लोकांच्या वाट्याला कमी जास्ती आलंच हाये. तुम्ही जर असं रडत बसलं तर या पोरांनी काय करायचं. चला चहा घेऊ. आता पाऊस थांबला. आपण सम्दे मिळून करू काहीतरी. चला उठा लवकर.” असं म्हणून त्या मावशी आम्हां सर्वांना त्यांच्या घरात घेऊन गेल्या. चहा उकळतच होता. चहा घेता घेता त्या काकांनी माझ्या दादांना समजावून सांगायला सुरुवात केली. “गवरामा, यंदाचं सालंच लय बेकार. आपण जगलो वाचलो त्येच लय झालं. आता पुढं ज्ये आलं त्ये बघायचं. आता धीर धरायचा. त्यो पांडुरंग आपली परीक्षा बघतोय. त्योच आपल्या पाठीशी हाय. पडलं घर तर पुन्हा कसं पण येडं वाकडं बांधू. जमीन गेली वाहून तर नको टेन्शन घेऊ. करू आपण काहीतरी धडपड. यंदाच्या साली माझ्या वावराचा एक तुकडा तू कर. एव्हडं साल तर धकून जाईल.” नाना खाली मान घालून शांतपणे ऐकत होते. मी आणि आई त्या मावशींच्या सोबत त्यांच्या स्वयंपाकाच्या खोलीत बसलो होतो.
मावशी मला हळू आवाजात सांगत होत्या, “सोना, बरं झालं बाई तू आलीस. मी रोज तुझ्या आईबापाला सांगून सांगून थकले. जेवायला बी त्ये नायी म्हणतेत. तू जरा ध्यान ठिव. समजून सांग त्यांना. घ्येतील काही जीवाचं बरंवाईट करून.”
“नाही मावशी, मी ठेवीन लक्ष.” मी असं बोलले खरं, पण माझ्याही काळजात हे ऐकून धस्स झालं.
सर, आणखी दोन दिवस आम्ही तिथे थांबलो. पाऊस पूर्ण थांबला होता त्यामुळे आम्ही पुन्हा आमच्या गावी आलो. घराची अवस्था बघवत नव्हती. सर, भर पावसात आम्हाला भेटायला आलेल्या गोदामाईने आमच्या घराला धडका मारून मारून बेजार केलं होतं आणि तेही शेवटी नाईलाजास्तव तिला शरण गेलं. घराची एका बाजूची भिंत उभी होती. तीन बाजूच्या भिंतींनी धीर सोडला होता. घरात असलेले सगळं साहित्य भिजलं होतं. माझ्या भावाची वह्या- पुस्तकं पाण्याने भिजून आणि गाळाने न्हाऊन निघाली होती. सर, आमचा जीव वाचला, बाकी सर्व आम्ही गमावले आहे. चार दिवस खपून आम्ही दगड, माती, गाळ उचलून काढला. लाकडांच्या खांबांचे टेकू देऊन आणि त्यावर ताडपत्री टाकून सध्यापुरता निवारा केला आहे. सर, शरीराने मी आज छ. संभाजीनगरमध्ये आहे पण मनाने मात्र मी तिथे माझ्या आईवडील आणि भावाच्या सोबत आहे. हे सर्व दृश्य डोळ्यांपुढून काही केल्या जात नाही. मला परवापासून पुन्हा दोन आठवड्यांची विशेष सुट्टी मिळावी, हि विनंती आहे.
सर, चार दिवस थांबून मी पुन्हा महाविद्यालयात आले. पण त्या चार दिवसांत मी पाहिले की, रात्र रात्र माझे आईबाप झोपत नाहीत. सताड डोळे उघडे ठेवून त्या ताडपत्रीच्या निवाऱ्यात पडून असतात. मधूनच रात्री कधी कधी वाऱ्याने फडफड आवाज करणाऱ्या ताडपत्रीच्या आवाजासोबत वडिलांचा मूक हुंदका कानावर येतो. मी माझे आईबाप तर गमावणार नाही ना? अशी शंका मनात राहून राहून येते. या चार दिवसांत मी आईबरोबर बोलून, खूप विचार करून शेवटी एक निर्णय घेतला आहे. कुणाला तो वेडपटपणा वाटेल, कुणी स्वार्थी निर्णय म्हणेल. कुणी हळहळ व्यक्त करतील. पण उरलंसुरलं गमावण्यापूर्वी याला तोंड देण्यासाठी मी स्वतः काहीतरी निर्णय घेणे आवश्यक आहे. आणि मी तो घेतला आहे. मला आपण सहकार्य कराल, अशी अपेक्षा आहे.
सर, ही सर्व परिस्थिती बघून मी किंवा माझ्या भावाने शिक्षण थांबावं, असा आम्ही विचार करत होतो. कारण आमच्यापैकी कुणी ना कुणी घरी असणं आणि आईवडिलांना कामात हातभार लावणं फार आवश्यक आहे. पण कुणाला शाळेतून काढावं? यावर एकमत होईना.
सर, द्वितीय वर्षाचा निकाल मागच्या महिन्यात लागला, त्यानंतर आमच्या शेजारच्या गावातील आणि पुण्यात एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगारावर काम करणाऱ्या एका इंजिनिअर मुलाने माझ्या आईवडिलांकडे माझ्यासाठी मागणी घातली होती. तेव्हा माझ्या आईवडिलांनी मुलगी शिकते आहे, छ. संभाजीनगरमध्ये आहे, तिला विचारावं लागेल. आम्ही नंतर बोलू, असं सांगून वेळ मारून नेली होती. मुलगा मोठ्या पदावर आहे. चांगला पगार आहे, गाडी आहे, गावाकडे घर आहे. सर्व व्यवस्थित आहे. फक्त मुलाचं वय जास्त आहे आणि तो घटस्फोटित आहे. ज्याने हे स्थळ सुचवले होते त्या मध्यस्थाने मुलाकडून तुमच्यासाठी काही पैशांची व्यवस्था मी करायला सांगतो, आणि मुलीचं शिक्षण पुढे चालू ठेवू, असं सांगितलं. इकडे येण्याच्या दोन दिवस अगोदर मला आईने बाजूला एकांतात घेऊन हे सर्व सांगितले. आईबरोबर चर्चा करून मध्यस्थांमार्फत त्यांना विचारलं. तर त्यांनी मुलीला पुढे शिकवू आणि माझ्या आईवडिलांना घर बांधायला व शेताची दुरुस्ती करायला पैसे देऊ, सोसायटीचं कर्ज पण भरू, पुढं मागं माझ्या भावाच्या शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी मदत करू, असं सांगितलं. लग्नासाठी तुम्ही काही खर्च करू नका, असं ते सांगत होते. माझ्या आईशी आणि वडिलांशी चर्चा करून शेवटी मी होकार दिला आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या लग्नासाठीच मला आणखी दोन आठवड्यांची सुट्टी हवी आहे. कारण सध्या तरी मला दुसरा चांगला पर्याय माझ्या डोळ्यांसमोर दिसत नाही.
सर, तीन चार वर्षांपूर्वी कधीतरी एकदा माझी आई माझ्याशी बोलता बोलता म्हणाली होती, “सोनू, माती आणि बाई यांचा जन्मच दुसऱ्यांच्या हातात असतो बग. मशागत करणारा त्याच्या सवडीनं, आवडीनं आणि कलानं कसून मशागत करतो किंवा करत नाही. अपेक्षा मात्र भरभरून फळांची असते. आपलं काम फक्त त्याला देणं. आपल्याला काय पाहिजे, याचं कुणाला ना देणं ना घेणं. पिकता आलं नाही की सम्दा दोष आपल्याच नशिबाचा. माहित नसतं, बाईच्या नशिबात कुणाच्या घरी जाणं असतं. तिनं मात्र आपला विचार नसतो करायचा. दुसऱ्यांचा विचार करते ती खरी बाई.
सर, काय असायचे ते असो. मला माझे आईबाप हवे आहेत. मी ज्या गोष्टीला राजी झाले, त्या शिवाय दुसरा उपाय सध्या तरी मला दिसत नाही. मला नंतर सलग महाविद्यालयात हजर राहता येईल की नाही? माहित नाही. पण मी प्रयत्न करेल. पुढे शिकेल. याकामी तुम्ही मला मदत कराल, अशी आशा आहे.
सर, महाविद्यालयाचा कानोसा घेतला किंवा बाहेरून खेड्यापाड्यांतून शहरात शिकायला आलेल्या मुलींशी बोललं तर लगेच लक्षात येते की, बऱ्याच गरीब घरच्या मुलींचे शिक्षण यावर्षी थांबेल. आठवी, नववी, दहावीत शिकणाऱ्या अनेक जणींचे हात यंदा पिवळे होतील. अनेकींना असं जर काही खर्च न करता लग्नाची मागणी येत असेल तर त्यांची लग्ने होतील. जमिनीला कान लावले तर लक्षात येईल, परिस्थिती भयाण आहे.
तुमच्या अधिकारक्षेत्रात तुम्हाला आम्हां मुलींसाठी आणि आमच्या शिक्षणासाठी काही करता आलं तर बघा.
सर, मी फारच मोठे पत्र लिहिले आहे आणि लहान तोंडी मोठा घास घेतला आहे, त्याबद्दल मी आपली माफी मागते आणि माझ्या या विनंतीचा आपण सकारात्मक विचार कराल, अशी अपेक्षा व्यक्त करते.
तुमची कृपाभिलाषी,
एस. जी. जाधव.
संगणक शाखा तृतीय वर्ष

लेखन – विष्णू औटी (IRS)
आयकर उपायुक्त छ. संभाजीनगर
(लेखक- नाना, मी साह्यब झालो.)
———————–